गोष्ट कमलेशच्या यंत्रांची
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातलं माळमाथा भागातलं देवारपाडे. मालेगावपासून साधारण २० किलोमीटरवर. साधारण ६०५ घरांची वस्ती. इथला कमलेश घुमरे. त्याची वडिलोपार्जित शेती. विज्ञान शाखेचा पदवीधर कमलेश वडिलांसोबत शेतात काम करताना विचार करायचा, वडिलांचे कष्ट कमी कसे करता येतील? पारंपरिक पद्धतींना पर्याय कसा शोधता येईल?
उपलब्ध साहित्यातूनच प्रयोग सुरू झाले आणि दोन वर्षांपूर्वी कमलेशचं पहिलं यंत्र तयार झालं. त्यासाठी भंगारातील तीनचाकी सायकल आणि अन्य काही साहित्य. या एका यंत्रानं नांगरणी, पेरणी, कोळपणी आणि फवारणी अशी चारही कामे केली जातात. या यंत्रामुळे कामे कमी वेळात आणि कमी श्रमात अधिकाधिक होतात. त्याच्या या यंत्राची दखल महाविद्याालयापासून ते विद्याापीठापर्यंत घेतली गेली. अनेक कंपन्यांनी त्याच्याकडे या यंत्राविषयी विचारणा देखील केली.
नुकताच या यंत्रात बदल करत त्यानं दुसरं यंत्र तयार केलं.भंगारातील वस्तूपासून कपाशी, मका लागवड करणारं हे यंत्र आहे. कमी खर्चात, वजनाला हलके आणि करायला सहजसोपे. यासाठी एक दोन फुटाचा पाईप, बी टाकण्यासाठी पाण्याची रिकामी बाटली,वायर इत्यादी साहित्य लागतं. हे साहित्य प्रत्येक शेतकऱ्याकडे असतं. त्यामुळे कोणीही हे यंत्र सहज बनवू शकतो. कपाशी, मका लागवड करताना पाठदुखी, कंबर, गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. परंतु, या यंत्रामुळे या त्रासापासून मुक्तता मिळते. शिवाय कामाचा वेग वाढीस लागून कमी कष्टात अधिक काम साध्य होते.
कमलेशने याआधीही शेतीपयोगी अशा विविध यंत्रांची निर्मिती केली आहे. कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ त्याच्या संपर्कात असतात. कमलेशच्या या उद्योगांमुळे माळमाथ्यावरील लोक त्याला जुगाडू कमलेश याच नावाने ओळखतात. कमलेशला वेल्डिंगही जमतं. त्याने ट्रॅक्टरमध्येही बदल केला आहे. शेतात काम करताना ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून बचाव होईल, असा हा ट्रॅक्टर आहे. त्याला या कामात पुतण्या विजय घुमरे याची मदत होते.
जिद्द, चिकाटी असली तर मनुष्य काहीही करू शकतो हे कमलेशनं सिद्ध केलं आहे.
-प्राची उन्मेष, ता. मालेगाव, जि. नाशिक

Leave a Reply