कानडी खुर्दच्या बचतगटांची कमाल
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कानडी खुर्द गाव. जिल्हा मुख्यालयापासून साधारण ८० किलोमीटरवर. जवळच्या मेहकरी प्रकल्पामुळे मेहकरी या नावानंही ओळखलं जातं. इथले १२ बचतगट इथे बदल घडवत आहेत. कोविड काळात तर हे बचतगट इथल्या महिलांचा विशेषतः गरीब, एकल, विधवा महिलांचा आधार ठरले.
बचतगटाच्या समूह संसाधन व्यक्ती, जैबूनबी उस्मानखान पठाण सांगतात, ”सुरुवात नोव्हेंबर २०१७ मध्ये झाली. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाच्या उमेद अभियानातून. गावात बारा बचतगट असून त्यांचं नियंत्रण विकास महिला ग्रामसंघ करतो. बारा बचतगटांचे अध्यक्ष आणि सचिव विकास संघात संचालक आहेत . सुनीता गव्हाणे या अध्यक्ष , प्रियांका साके सचिव आणि अर्चना बनसोडे या कार्याध्यक्ष आहेत. प्रत्येक बचतगटाकडे १५ हजाराचा फिरता निधी , ६० हजाराचा समूह गुंतवणूक निधी आणि बँकेनं मंजूर केलेलं एक लाख रुपये याप्रमाणे भागभांडवल. यातूनच छोट्या व्यवसायासाठी महिलांना कर्ज दिलं जातं. ”
शेळीपालन , कोंबडीपालन , दुग्ध व्यवसाय , गिरणी , किराणा दुकान यासारख्या व्यवसायाच्या वाढीसाठी ही कर्ज उपयोगी पडली. २ टक्के दरात मिळणारी ही कर्ज महिला तीन महिन्यात चुकती करतात.
कानडी खुर्दच्या बचतगट संघाने जुलै २०२० मध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना १७ टन खते बांधावर उपलब्ध करून दिली. कोरोना काळात बचतगटातील प्रत्येक महिलेची मोफत आरोग्य तपासणी केली. गावात मास्क आणि गरजू महिलांना धान्य वाटलं. इथल्या महिलांनी जैबूनबी यांच्या शेतात चार गुंठ्याची परसबाग केली असून त्यात सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतलं जातं.
एकमेकीची साथ मिळाली तर विकास तर साधता येतोच, शिवाय कोरोनासारख्या आव्हानांपुढे तग धरण्याचा धीरही मिळतो, हेच या महिलांनी दाखवून दिलं आहे.
– राजेश राऊत, ता. आष्टी, जि. बीड

Leave a Reply