कर्जतमधल्या अनेक संस्थांचा आधार कुर्ल्याचे जोशी दाम्पत्य
‘’सध्याच्या परिस्थितीत लाखो मुले शिक्षणापासून दूर जाण्याच्या मार्गावर आहेत. यातली बहुतांश आदिवासी, वंचित घटकातली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवायचे असेल तर खाऊ, नव्या पेन्सिली, वह्या वगैरे साहित्य अशा प्रोत्साहनांची गरज आहे.’’ श्रीपाद जोशी सांगत होते. श्रीपाद आणि वासंती जोशी, मुंबईतल्या कुर्ला इथे राहणारे.
जोशी दाम्पत्याने रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील नेरळजवळचे माणगाववाडी, डोंगरपाडा आणि शिरसे या ठिकाणी श्री गजानन अभ्यासिका सुरू केली आहे. जोशी यांनी मित्राच्या स्मरणार्थ गेल्या नोव्हेंबरपासून हा उपक्रम सुरू केला. या प्रत्येक ठिकाणी एक स्थानिक शिक्षिका, शिकलेली आणि शिकवू शकेल अशी व्यक्ती. ‘’शहरी मुलांनाही ऑनलाइन शिक्षण जड जाते. या मुलांना तर अभ्यासात घरून मदत करणारे कोणी क्वचितच. विषयाच्या आकलनासाठी त्यांना व्यक्तिशः कोणी तरी शिकवणारे लागते.’’
आजूबाजूच्या ८-१० पाड्यावरची मुले इथे येतात. शिक्षिका या मुलांच्या अभ्यासतल्या अडचणी दूर करायला मदत करते. प्रत्येक शिक्षिकेला महिन्याला तीन हजार रुपये. असा ५४ हजार रुपयांचा खर्च गेल्या वर्षी जोशी यांनी उचलला आहे. याशिवाय इतर मदत.
या सगळ्यात मित्र, नातलगांचा हातभारही लागत असल्याचे जोशी सांगतात. गेली १० वर्ष इथल्या २५ हून अधिक शाळांना, विविध संस्थांना ते वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहेत,मिळवून देत आहेत. जोशी यांचे काम आणि त्यांच्यावरच्या विश्वासामुळे कोणाला साहाय्य करावे, याची विचारणा करणारेही अनेक आहेत. गेल्या वर्षी कुर्ल्यातल्या एका मंडळाने ३००० वह्या, इतर साहित्य जमा केले खरे. पण त्याचे काय करावे समजेना. ते जोशींकडे आले आणि एका दिवसात रायगडमधल्या ९ शाळांना या साहित्याचे वाटप केल्याचे समाधान त्यांना मिळाले. या कामात अभिनव विद्यामंदिरचे निवृत्त अध्यापक नंदकुमार मणेर सरांचे मोठे साहाय्य लाभत असल्याचे जोशी सांगतात.
याशिवाय कुर्ल्यात २५ -३० मुलांचा शिक्षणाचा खर्च जोशी करतात. ‘’मुंबईसारख्या ठिकाणीही अगदी वर्षाची जेमतेम २००-३०० रुपये फी न परवडू शकणारी अनेक मुले आहेत.’’ वासंती सांगतात. ‘’आपण घराबाहेर पडलो की समाजाची, खरी ओळख होते. लोकांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या माणसांची ओळख होते. त्यांच्यापासून प्रेरणा मिळते.’’
-सोनाली काकडे

Leave a Reply