कशी साखर- साखर लागतेय गोड, माझ्या बापाच्या- बापाच्या हाताला फोड!

कशी साखर- साखर लागतेय गोड, माझ्या बापाच्या- बापाच्या हाताला फोड!! हे प्रसिद्ध लोकगीत तुम्ही ऐकलंय का? आपल्या आयुष्यात मधुरता आणणारी साखर, पण तिच्या निर्मितीची प्रक्रिया मात्र प्रचंड कष्टदायक असते. ऊसतोडणी कामगारांचे आयुष्य सहा- सहा महिने घरापासून दूर, भल्या पहाटे उठून जीवतोड मेहनत करण्याचे असते. एकेकाळी ऊसतोडणी कामगार म्हणून काम केलेल्या पत्रकार सूर्यकांत नेटके यांच्याशी या विषयासंदर्भात तसेच यातल्या बालमजुरीच्या पैलूबाबत संवाद साधला. बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातलं कोळेवाडी हे त्यांचं गाव. बीडपासून ४५ किमी तर नगरपासून ९० किमी.वरचं त्यांचं हे गाव. अतिशय कष्टानं शिकूनसवरून पत्रकारितेत यशस्वी कारकीर्द घडवलेल्या नेटके यांनी बालमजुरीच्या समस्येबाबत केलेलं विवेचन.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना पत्रकार आणि नवी उमेद अहमदनगर प्रतिनिधी सूर्यकांत नेटके

“सप्टेंबर महिना सुरू झाला की ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतराला सुरुवात होते. मी चौथीत असताना म्हणजे जेमतेम दहा वर्षांचा असताना माझ्या आईवडिलांनी ऊसतोडणीचं काम सुरू केलं आणि नंतर मीही शाळेला सुट्टी असताना हे काम करायला जायचो. माझ्या आईवडिलांनी पंचवीसेक वर्ष हे काम केलंय. तेव्हा म्हणजे तीसबत्तीस वर्षांपूर्वी ऊसतोडणी, वीटभट्टी यासाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातल्या मुलांची, बालमजुरांची जी समस्या होती ती आजही आहे.”

”महाराष्ट्रात साधारण २०० साखर कारखाने आहेत आणि १२ ते १५ लाख ऊसतोडणी कामगार. सर्वाधिक ७ ते ८ लाख कामगार बीडमध्ये आहेत. त्या पाठोपाठ अहमदनगर,नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेडचा काही भाग, उस्मानाबाद या जिल्ह्यातून कामगार स्थलांतरित होतात. ऊसतोडणीचा हंगाम  साधारण सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो ते मार्च एप्रिलपर्यंत सुरू राहतो. अनेक कामगार पूर्ण कुटुंबासकट स्थलांतर करतात. कष्टकरी, शेतकरी, भटक्या समूहातील  दरवर्षी साधारण ३० ते ४० % मुलं कुटुंबासोबत ऊसतोडणीसाठी जातात. उसतोडणीतला बालकामगार हा गंभीर विषय.”

“ऊसतोडणीचं काम पहाटे ३-४ वाजता काम सुरू होतं. कारखान्याच्या कामगारांसाठी पहिला भोंगा पहाटे तीनला होतो, साडेतीन आणि  मग चारला होतो. घरचं कसंबसं आवरून मुलाबाळांसकट कामगार ऊसतोडणीला लागतात.  ऊस तोडल्यावर वाडे शिल्लक राहतात, हे काढण्याचं तुलनेनं सोपं काम मुलं करतात. हे सगळं काम धोकादायक असतं. ऊसतोडणीचा कोयता, ऊसाची धारदार पानं लागल्यानं, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना ऊसतोडणी कामगारांचे, त्यांच्या मुलांचे  अनेक अपघात होतात. आई- बाप मुख्य ऊसतोडणी करत असताना, पोरं कुठंतरी झाडाजवळ थांबतात. थोडी  मोठी भावंडं छोट्या भावंडांना सांभाळतात. अंधारात, हिंस्त्र प्राण्याच्या हल्यात, सर्पदंशानं कितीतरी मुलं दगावली आहेत. अहमदनगरमधील अकोले, संगमनेर, राहाता तालुक्यात कित्येकदा उसतोडणी कामगारांची लहान मुलं बिबट्याने उचलून नेली आहेत, असे अनेक प्रकार घडले आहेत. अश्या दुर्घटनांची साधी दखलही क्वचितच घेतली जाते.”

ऊसतोडणीा कामगार आईबापांसोबत आलेलं लेकरू- तेही बालकामगार बनतं

“सगळ्यात वाईट म्हणजे ऊसतोडणी कामगारांसोबत गेलेल्या त्यांच्या मुलांचा बुडालेला अभ्यास. कितीतरी मुलांची शाळा कायमची सुटते. अभ्यास करण्यात उत्साह राहत नाही. काही मुलं मात्र आईबाबांसोबत न जाता, गावातच एखाद्या नातेवाईकाकडे राहतात. आई- वडील, चांगले शिक्षक किंवा एखाद्या नातेवाईकाचं लक्ष असेल तरच त्यांचंही शिक्षण सुरू राहतं. कोवळ्या वयात सहा- सात महिने आईवडील भेटत नाहीत. यातल्या काही मुलांना गावात शाळा नसेल तर जवळच्या गावात जाऊन कुठे तरी काम करून शिकावं लागतं. वर सांगितलं तसं, मी साधारण चौथीत असताना माझ्या वडिलांनी उसतोडणीच्या कामाला सुरूवात केली. आई- वडील पंचवीसेक वर्षं उसतोडणीचं काम करत होते, अगदी माझ्या लग्नानंतरही उसतोडणीचं घरातलं काम सुरूच होतं. तो काळ तर असा होता की, फोनची सुविधा उपलब्ध नव्हती. दसरा- दिवाळीनंतर गेलेले पालक थेट गुढीपाडव्यालाच दिसायचे. आतातरी किमान मोबाईलच्या सुविधेमुळे कधी-कधी आई- वडिलांशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर बोलता येतं.”

“मलाही वडिलांनी तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे मित्र हॉटेलमालक अशोक भांडेकर यांच्याकडे ठेवले होते. माझं शिक्षण चालू राहावं, म्हणून मी त्यांच्याकडे फावल्या वेळात काम करावं आणि शिकावं, अशी वडिलांची इच्छा होती. त्या काळी शाळा सुरू होण्याआधी सकाळी तीनेक तास आणि शाळा संपल्यावर संध्याकाळी चार तास मी त्यांच्या हॉटेलात काम करायचो. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने हे काम पूर्णवेळ असायचं. मुख्यत्वे आजूबाजूचे मोठे व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक अशा भल्या माणसांकडे मी घरपोच चहा न्यायचो. सुदैवाने मला चांगली माणसं भेटली. घडण्याच्या वयात  चांगल्या माणसांच्या संपर्कात राहिल्याचा खूप फायदा झाला. हॉटेलमालकही भला माणूस, त्यांनी मला जपलं. कधीकधी एखादं गिऱ्हाईक डाफरून बोलायचं, कोणी सिगरेट विडी आण, असं विचित्र काम सांगायचं, पण मालक लगेच मध्ये पडून सांगायचे, ‘त्याला असलं काही काम सांगू नका.’ पण असं पूरक वातावरण, भली माणसं लाभणारे माझ्यासारखे बालकामगार हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असावेत.”

“मूल जिथे काम करत आहेत, तो परिसर, संपर्कात येणारी माणसं, त्यांनी दिलेली वागणूक यावर बरंच काही अवलंबून असतं. आज  गुन्हेगारी क्षेत्रात जे लोक आहेत त्यातले बहुतांश जण आधी  बालमजुरीचा अनुभव घेतलेले असतात.  बसथांबे, ढाबा अशा ठिकाणी जर मूल काम करत असेल तर त्याला  वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात.  दोन- पाच रूपये का होईना, पण स्वत:च्या हाती आलेल्या पैश्यांचा विनियोग कसा करायचा हे अजाणत्या वयात समजत नाही. आईवडील सोबत असतील, त्यांनी हिशोब विचारला तर ठीक.  नाही तर मूल बिघडायला वेळ लागत नाही. बालवयात तो मारामारी बघतो, अन्याय झेलतो, मग प्रतिकार करायला लागतो. हाती आलेल्या पैश्यातून तंबाखू, विडी, मग दारूचं व्यसन, क्वचित प्रसंगी ड्रग्ज, छोटी चोरीमारी याचंच  रूपांतर पुढे गुन्हेगारीत होतं. बालकामगाराची  गुन्हेगारी क्षेत्राकडे  वाटचाल आपसूकच होते.”

बालमजुरी थांबत नाही, त्यामुळे गुन्हेगारीही थांबत नाही. जर आपल्याला गुन्हेगारी रोखायची असेल तर सर्वप्रथम बालमजुरीला पायबंद घालणं आवश्यक आहे.

“मग याचा अर्थ असा होतो का, की सगळेच बालमजूर गुन्हेगार होतात? तर तसं नाही. खडतर परिस्थितीवर मात करून, लहान वयात बालमजुरी करूनही यशस्वी झालेले सदगुणी लोकही आहेत. वेळप्रसंगानुसार कुटुंबाची परिस्थिती जाणत, समजूतदारपणानं वागणारी मुलं आहेत. आपल्याकडे आलेल्या पैश्यांचा विनियोग चांगल्या कामासाठी करण्याची समज मुलांना हवी, आईवडिलांचं किंवा शिक्षकांचं लक्ष हवं. दिवसा काम करूनस रात्रशाळेत शिकून करिअर घडवलेली मुलंही आहेतच की ! काम करताकरता शिकणं आव्हानात्मक  असतं. पण या मुलांच्या अभ्यासाकडे किती लक्ष पुरवलं जातं? नगर-बीड जिल्ह्यातल्या मुलांसाठी नव्वदच्या दशकात सामाजिक संस्थांनी साखरशाळा काढल्या. शिक्षण हक्क कायद्यानंतर २०११ मध्ये  या मुलांच्या शिकण्याचा प्रश्न सरकारदरबारी आला.”

ऊसतोडणीत कष्टाचं काम करणाऱ्या महिला कामगार

“साखरशाळांसाठी दरवर्षी सर्वेक्षण करायचं असतं. किती मजूर स्थलांतरित झाले? त्यांच्यासोबत किती मुलं आहेत? ती साखरशाळेत दाखल झाली आहेत का? पण दुर्दैवानं हे सगळं कागदावर आहे. सर्वेक्षणं नीट होतच नाहीत. निम्मी सर्वेक्षणं खोटी आहेत. वसतिगृहांची संकल्पनाही राजकीयच. शासनाचा निधी खर्च होतो, पण गरजू मुलांना प्रत्यक्षात त्याचा किती फायदा होतो?  किती साखरशाळा सुरू आहेत, खरोखर किती मुलं प्रत्यक्ष साखरशाळेत गेली? किती मुलं  शिकली…. हा संशोधनाचा विषय आहे. वीटभट्टी किंवा इतर कामांसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांच्या मुलांची नोंद कुठे असते?”

“बालमजुरीची समस्या दूर न होण्याचं कारण म्हणजे त्यावरच्या उपाययोजनांकडेच मुळात गांभीर्यानं पाहिलं जात नाही. ‘शिक्षण हक्क कायदा’ प्रत्येक मुलाला मोफत आणि हक्काचं शिक्षण देणारा आहे, पण प्रत्यक्षात त्याची गांभीर्याने अंमलबजावणी हवी. काही शिक्षक निश्चितच तसा प्रयत्न करत आहेत. पण याची जाण वाढली, तरच बालमजुरी थांबेल, शेवटी शिक्षण आणि जनजागृती हाच या समस्येवर मात करण्याचा उपाय आहे.”

लेखन: सोनाली काकडे, संपर्क- नवी उमेद, मुंबई

Leave a Reply