।। कथा कोरोनाच्या, व्यथा कुटुंबाच्या ।।

मार्च २०२०…. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना जागतिक महामारी घोषित केली. कल्पनेपलीकडील अभूतपूर्व स्थिती जगभरात निर्माण झाली. कोरोना विषाणूनं प्रत्येकाच्या आयुष्यात उलथापालथ घडवली. यात लाखो कुटुंब भरडली गेली. कर्त्या पुरुषाच्या निधनामुळे अनेक स्त्रियांची झालेली ससेहोलपट…. तीन वर्ष उलटल्यावर तरी त्यांच्या स्थितीत बदल घडलाय का ?

”माझा माणूस गेला, पैसेही गेले,करायचं काय?

नाशिकच्या शीतल सानप सांगतात, ”कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माझ्या नवऱ्याला सर्दी, खोकला झाला. खरं तर ते कराटे प्रशिक्षक असल्यानं त्यांचा व्यायामावर भर होता. सुरूवातीला ते घरातील एका खोलीत झोपून रहायचे, ऑक्सीमीटरवर ऑक्सिजनची पातळी पाहत डॉक्टरांनी दिलेल्या सल्लानुसार औषधं सुरू होती. एचआरसीटीमध्ये तो स्कोर केवळ ३ वर होता. तब्येतीत फरक पडत नसल्यानं डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिला. कुटूंबातील सदस्यांना काही त्रास नको म्हणून हे दवाखान्यात अ’डमिट झाले. तीनवर असलेला स्कोअर सहावर पोहचला. तीनच दिवसात ऑक्सिजनची पातळी कमी होत गेली. डॉक्टर काही आैषध देत नाही, पाहत नाही, घरी घेऊन चल, असं ते सांगत होते. पण वेडी आशा .. अवघ्या चार ते पाच दिवसात त्यांची तब्येत खालावली आणि काही कळायच्या आत ते आम्हाला सोडून गेले. तोपर्यंत हॉस्पिटलचं बिल झालं होतं नऊ लाख रुपये. माझा माणूस गेला पण हातात असलेले पैसेही गेले आता करायचं काय?” हा शीतल यांचा प्रश्न करोना काळात वैद्यकीय सेवेमुळे डोक्यावर चढलेल्या कर्जाच्या डोंगराची भीषणता ठळकपणे समोर आणतो.
कोरोना या तीन अक्षरी शब्दानं जग अक्षरक्ष: ढवळून निघालं. दैनंदिन व्यवहार ठप्प होत असताना अर्थचक्र बिघडलं. जगण्याचा संघर्ष सुरू असताना मानवी नात्यांची वीण मात्र उसवत गेली.
कोण आपलं कोण परकं, या विचाराच्या गर्तेत सर्वजण अडकले असताना या काळात आरोग्य विभागानं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी वैद्यकिय वर्तुळात शर्थीचे प्रयत्न होत होते. पण कोरोनाच्या पहिल्या दाेन लाटेत झालेली मनुष्यहानी कधीही भरून न येणारी आहे. प्रत्येकाचं कोणी ना कोणी दगावल्याची खूण आजही अनेकांच्या घरात तस्वीर स्वरूपात आहे. या मनुष्यहानीमुळे प्रश्नांची मालिका समोर ठाकली. यातील एक म्हणजे कोरोना काळात पती गमावलेल्या स्त्रियांचे प्रश्न आजही कायम आहेत. सरकारी योजना तोकड्या पडत असताना हक्काच्या माणसांनीही साथ सोडल्यानं या महिलांसमोर पुढे काय? हा प्रश्न आ वासून उभा आहे. कोरोना काळात महिलांनी आपला जोडीदार गमावला तसा गाठीशी बांधलेला पैसाही. आता केवळ डोक्यावर कर्ज आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये या महिलांचे आयुष्य हेलकावत आहे.
करोनाची पहिली लाट राज्यात मार्च २०२० मध्ये धडकली. नाशिक जिल्हाही त्यास अपवाद ठरला नाही. या काळात उपचाराअभावी मृत्यू होण्यासोबतच भीती, निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत काहींनी आत्महत्येचे पाऊल उचलले. नाशिक, मालेगाव, निफाड, येवला, सिन्नर परिसरात हे प्रमाण अधिक होते. या मनुष्यहानीत पुरूषांचे प्रमाण अधिक राहिले. कोरोना काळात आरोग्य सेवेची मागणी वाढली तशी ती सेवा देणाऱ्या खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवेचे दरही वाढवले. मुखपट्टी, रेमडेसीवीरसह अन्य काही आैषधांचे दर दुप्पट-तिप्पट वाढत गेले. काही ठिकाणी तर या सर्वांचा काळाबाजार होत गेला. याचा फटका कोरोनाग्रस्त रुग्णांना बसला. राज्य सरकारकडून ही परिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत पाऊले उचलली असली तरी खाजगी रुग्णालयांची नफेखोरी रुग्णांसाठी मारक ठरली.
नाशिक जिल्हाचा विचार केला तर शीतल सानप, यास्मिन खाटीक यांना जोडणारा धागा समान. कोरोना काळात पतीचं निधन. त्यांच्या पश्चात जगायचं कसं हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत आहे. घरातील कर्त्या पुरूषाचा जीव वाचवण्यासाठी या महिलांनी जीवाची बाजी लावली. उपचार सुरू असताना त्याच्यासोबत राहत त्याची काळजी घेणं सुरू असताना आपले दागिने, अडीनडीला बाजूला ठेवलेले पैसे, जवळच्या नातेवाईकांकडून पैशांची उचल घेत त्यांनी हा खर्च पेलायचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न फोल ठरले आणि कर्जाचा डोंगर मात्र वाढत गेला.
यास्मिन सांगते, ”कोरोना काळात पतीच्या उपचारावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च झाले. मिस्टर रिक्षाचालक होते. करोना काळात त्यांचा स्कोर २४ झाला. ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्या काळात त्यांना बरे वाटावे म्हणून तीन -चार दवाखाने बदलले. पण त्यांच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता. बारा लाख खर्च झाला पण त्यांना आम्ही वाचवू शकलो नाही. आज ते आमच्यात नाही पण डोक्यावर कर्ज आहे. हा खर्च माहेरच्यांनी केला. सासरच्यांनी ”तुझं तू पहा” अशी भूमिका घेतल्यानं मुलांचं कसं होणार ? मुलांचं शिक्षण सुटेल अशी भीती वाटत आहे. सध्या भाऊ खर्च करत आहे. हातभार म्हणून घरातल्या घरात पार्लर सुरू आहे. पण पैसे येतील तसे भावाचे कर्ज नक्की फेडेन.”
घर परत उभं राहिल का?
राज्यात करोनाकाळात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकू ण १ लाख ४० हजार ३१४ इतके मृत्यू झाले. पैशांअभावी ज्यांना घरात बसणे परवडणारे नव्हते, असे अनेक असंघटित कामगार या मध्ये मोठ्या प्रमाणावर भरडले गेले. सुरूवातीच्या काळात ‘विमा सुरक्षा कवच या गोंडस नावाखाली विमा कंपन्यांनी काही भरपाई दिली. मात्र वाढणारी रुग्ण संख्या आणि मृत्यू पाहून अनेक विमा कंपन्यांनी करोना हा आजार आपल्या यादीतून काढून टाकला. करोना लाटेत दगावलेल्यांच्या जोडीदारांना, एकल पालक असणाऱ्यांना, आई-बाबा दोघेही दगावल्याने मायेचे छत्र हरपलेल्या बालकांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा आधार घेत आर्थिक स्थैर्य, तसेच सुरक्षित निवारा देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवरून होत असतांना करोनाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या प्रत्येक कुटुंबाची व्यथा वेगळीच आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने दोन वेळच्या जेवणासह डोक्यावरचे छप्पर कायम राहावे, यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबांच्या अडचणी वेगळ्या आहेत. करोनामुळे पती गमावलेल्या स्त्रियांचे प्रश्न आर्थिक, सामाजिक, मानसिक पातळीवर येऊन थांबतात.
करोना काळात रुग्णालयात दाखल असलेल्या पतीच्या उपचारांसाठी अनेकांना भरमसाठ बिले भरावी लागली. त्यामुळे कुटुंबच्या कुटुंब कर्जबाजारी झाले. ही तजवीज करतांना जवळच्या नातेवाईकांकडून उधार-उसनवार, खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेणे, दागिने-घर गहाण ठेवणे, जनावरे विकत पैसे जमा करत राहिले. रुग्णालयाच्या खर्चा व्यतिरिक्त औषधांवरही मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत राहिला. ज्यांनी कुटुंबाचा कमावता आधार गमावला, त्यांच्या शिरावर आता उपचारावर झालेल्या खर्चामुळे कर्ज फेडण्याची जबाबदारी पडली. ती एकहाती पेलताना ‘जगायचे कसे’ हा यक्षप्रश्न आहे. उपचार कर्जासह मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते या
कचाट्यात त्या सापडल्या आहेत. ही दाहकता संगमनेर येथील सीमा भागवत यांच्या स्थितीवरून समोर येते. सीमा यांचे पती आणि त्या औषध दुकान चालवत होत्या. करोनाकाळात काम करताना त्यांच्या पतीला करोनाची लागण झाली. त्यांना आधी संगमनेर आणि नंतर नाशिकला उपचारासाठी नेले. उपचाराने बरे होत असताना ते म्युकरमायकोसिसचे बळी ठरले. या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्याकडून होणारी लूटमार, बेफिकिरीमुळे त्या संतप्त झाल्या. ३८ दिवसांत १७ लाख रुपयांचे बिल आले होते. ते फेडताना भागवत यांनी करोनाविषयक
उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. करोना रुग्णांना दिले जाणारे उपचार अनेक ठिकाणी पाककृतीसारखे झाले. उपचारांसाठी दिशा ठरलेली नसताना केवळ प्रयोग होत राहिले. यामुळे पतीला जिवाला मुकावे लागल्याचे त्या सांगतात.
निफाडच्या तन्वीर कुटुंबाची व्यथाच वेगळी. चिकनचे दुकान चालवणारे हे एकत्र कुटुंब. दुसऱ्या लाटेत आठहून अधिक सदस्य असलेल्या या कुटुंबाला करोनाचा विळखा पडला. फक्त मोठ्या भावाची पत्नी आणि धाकट्या भावाचा मुलगा सोडला, तर घरातील सहा व्यक्ती दवाखान्यात दाखल झाल्या. इतरांचे उपचार तीन लाख रुपयांत झाले, पण आई आणि धाकटा भाऊ अमजद यांना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करावे लागले. दोघांचे २० लाख रुपयांचे बिल झाले.
उपचारांसाठी एक सदनिका, दागिने विकले. सर्व बचत उपचारात गेल्यानंतर नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले. मात्र उपचार सुरू असताना अमजद यांचा मृत्यू झाला. पैसा गेला, यापेक्षा आपला माणूस गेला ही ठसठसणारी वेदना आता कायम राहणार आहे. आता कुटुंबाची सर्व जबाबदारी मोठ्या मुलावर आली असून भाऊ असता तर कर्जाचा डोंगर हलका झाला असता, असे त्यांना वाटते. अमजदच्या पत्नीसमोर पतीच्या उपचारावर झालेला खर्च फेडायचा कसा, हा प्रश्न आहे.
रिद्धी क्षीरसागर, यांनाही करोनाचा विळखा पडलाच. त्या सांगतात, की करोना उपचार रुग्णालयांनी चुकीच्या पद्धतीने हाताळले असा आमचा अनुभव आहे. खासगी दवाखान्यात तर करोना रुग्णांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली. रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘रेमडेसिविर’सह अन्य औषधे दिली गेली. ती खरेदी करण्यासाठी नातेवाईकांना रांगेत उभे राहावे लागले. तिथेही वाटपात दुजाभाव झाला. आस्थापना-प्रशासन वाद घातला गेला. पैसे जमवण्यासाठी धावपळ करावी लागली; पण उपयोग काही झाला नाही. या काळात घरखरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. ते फेडणे, मुलांचे शिक्षण, बँकेचे कर्ज ठीक, पण नातेवाईकांकडून घेतलेल्या पैशांचे काय, हा प्रश्न अस्वस्थ करून जातो. करोना साथीमुळे हतबल झालेल्या कुटुंबात नवीन प्रश्न निर्माण झाले.
अहमदनगरच्या एका स्त्रीने तिची स्थिती मांडली. तिला तीन मुली आहेत. तिघींची लग्न झाली आहेत.करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांच्या उपचारासाठी इतका खर्च झाला की डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आजारपणात खर्चासाठी खासगी बँकेकडून पैसे कर्जाऊ घेतले
होते. त्यांना दर आठवड्याला ७०० रुपये द्यावे लागतात. मुळात उत्पन्नाचा कुठल्याही स्रोत नसताना दैनंदिन खर्च भागवताना नाकीनऊ येतात. अशा परिस्थितीत ७०० रुपये आणायचे कोठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सावकाराच्या तगाद्याने जवळच्या शेळ्या विकून त्या नागपूरला मुलींकडेनिघून गेल्या आहेत, जेणेकरून हे लोक तिथे तरी तगादा लावणार नाहीत, असे त्या सांगतात; पण हे काही कायमस्वरूपी उत्तर होऊ शकत नाही ही अगतिकता त्या व्यक्त करतात. हीच व्यथा कल्याणच्या एका ताईंची. त्यांच्या कुटुंबाने कर्ज काढून स्वत:चे घर घेतले; पण करोनामुळे पतीचे निधन झाले. मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते अशा अडचणी समोर असताना बँकवाले हप्त्यांसाठी तगादा लावत होते. घरावर जप्ती आली. मग त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. घरातील सर्व सामान विकत मोजक्या काही गोष्टी नातलगांच्या घरी नेऊन ठेवल्या. आज त्या नातेवाईकांकडे थोडाफार खर्च देत आश्रितासारख्या राहात आहेत. घरातले साहित्य विकून आलेले पैसे त्यांनी बँकेत भरले. जप्ती टाळण्यासाठी त्यांनी आपले घर भाड्याने दिले असून यातून मिळणाऱ्या पैशांतून बँकेचे शक्य तसे हप्ते भरले जात आहेत.
करोनाकाळात पतीचे निधन झालेल्या स्त्रियांसाठी शासनाने ‘वात्सल्य अभियान’ ही योजना सुरू केली. या माध्यमातून करोनाकाळात पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकट्या राहिलेल्या स्त्रियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समिती काम करणार आहे. यासाठी तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, विधि सेवा प्राधिकरण, कृषी अधिकारी अशा वेगवेगळ्या आस्थापनांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करत प्रश्नांची सोडवणूक होणार आहे. यासाठी
समिती गठित करत त्या समित्यांच्या नियमित बैठका होणे अपेक्षित होते. मात्र राज्यातील केवळ १०० तालुक्यांमध्ये ही समिती गठित झाली. काही बैठका झाल्या. अन्य तालुक्यांमध्ये या समितीचे अस्तित्व कागदोपत्री राहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांसाठी कुठल्या योजना आहेत याविषयी त्या अनभिज्ञ आहेत. राज्यातील आणि देशातील करोनामुळे विधवा झालेल्या स्त्रियांची
संख्या निश्चितच अधिक आहे. मात्र त्यांच्यापुढील प्रश्न थोड्याफार फरकाने हातातोंडाची गाठ घालत कर्जे कशी फेडायची आणि घर कसे चालवायचे’ या प्रश्नाजवळ येऊन थांबततात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करणे आवश्यक असताना त्यांना गरज आहे ती खंबीर आधाराची.
आर्थिक अडचणी आणि प्रथापरंपराही
दागिने घालावे/ घालू नये, कुंकू/टिकली लावावं/लावू नये, इतर साजशृंगार हा खरे तर वैयक्तिक प्रश्न. पण अजूनही यावरून अनेक बाऊ केले जातात, प्रथा-परंपरांचा आधार घेऊन स्त्रीचा अपमान केला जातो. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक स्त्रिया आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. त्याचसोबत या काळात काही जणींना अनिष्ट प्रथांनाही सामोरं जावं लागलं. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांच्या अंगावरचं स्त्रीधन काढण्यात आलं.
ही अनिष्ट प्रथा बंद करून पतीच्या माघारी स्त्रीला सन्मानानं जगता यावं, यासाठी विधवा सन्मान आणि संरक्षण कायदा शासनानं करावा, अशी मागणी पुरोगामी संघटनांनी केली. या मागणीचा पाठपुरावा सुरू असताना विधवा हक्क अभियानाचा आरंभ झाला. करोनामध्ये पती गेलेल्या स्त्रियांचा या अभियानाच्या प्रयत्नांतून पुर्नविवाहही झाला.
नाशिक येथील प्रेम बहुउद्देशीय संस्था आणि राज्यातील अन्य समविचारी संघटना या अभियानाच्या निमित्तानं एकत्र आल्या. अभियानाचे मुख्य राज्य समन्वयक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे तथा बाबा (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची पार्श्वभूमी आणि त्यामागील भूमिका याविषयी प्रबोधन करण्यात आलं. महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी कुठलीही प्रथा-परंपरा म्हणजे महिलांवरील अत्याचारच. या विचारांचे राजू शिरसाठ, कालिंदी पाटील, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार हेही प्रमोद यांच्यासोबत अभियानात सहभागी झाले. विधवा महिला सन्मान आणि संरक्षण कायदा किती महत्त्वपूर्ण आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यशाळा, पथनाट्य असा आधार घेण्यात आला.
स्त्रीचे हक्क, सन्मान यांचा तिच्या वैवाहिक स्थितीशी काहीही संबंध नाही, ती स्वतंत्र व्यक्ती असून भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या समान अधिकाराप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी राज्यभर चळवळ उभारताना पतीचं निधन झालेल्या स्त्रीची नेमकी स्थिती काय आहे, त्यांच्याविषयीच्या अनिष्ट रूढींसंदर्भात गांभीर्याने दखल घेण्यात आली. पतीचं निधन झालेल्या स्त्रीला समाजात अपमानास्पद, दुय्यम वागणूक दिली जाते. तसेच तिच्याकडे वाईट नजरेनं बघितलं जातं. एवढंच नव्हे तर वडिलांना अग्नी देता येत नाही. शिवाय मुलाला किंवा मुलीला विधवा असल्यानं हळद लावता येत नाही. अशा अनेक समस्यांवर विचारमंथन झालं.
अभियानाचा हा प्रवास सोपा नव्हता. प्रमोद झिंजाडे सांगतात,” कोरोनाच्या लाटेत ओळखीतल्या एका तरुणाचं निधन झालं तेव्हा त्याच्या घरी गेलो होतो. त्याच्या ३०-३५ वर्षाच्या बायकोचं कुंकू पुसलं जात होतं. कुणी तिचं मंगळसूत्र काढत होतं. तर काहींना तिच्या बांगड्या फोडण्याचं पडलं होतं. या साऱ्या गदारोळात ती मात्र, “हे सारं राहू द्या, हा माझा आधार आहे”, असं ओरडून सांगत होती. पण त्याकडे लक्ष द्यावं असं कोणालाच वाटत नव्हतं. हाच प्रसंग मला अस्वस्थ करून गेला. यातूनच पती गेलेल्या स्त्रीच्या आत्मसन्मान मोहिमेचा आरंभ झाला.”
खरं तर विवाहित महिलेच्या अंगावरील दागिने हा स्त्रीधनाचा भाग. नवऱ्याच्या पश्चातही तिचा त्यावर अधिकार हवा. मात्र तिचा हक्क अनेकदा काढून घेतला जातो. या विरोधात झिंजाडे यांनी आवाज उठवला. या अभियानाविषयी माहिती व्हावी यासाठी ग्रामसभेचा आधार घेण्यात आला. राज्यस्तरीय कार्यशाळेतून याविषयी सातत्यानं प्रबोधन करण्यात आलं.
या हक्क अभियानातून नुकताच एका महिलेचा पुनर्विवाह झाला. पुणे इथल्या अभियानाच्या करोनामध्ये पती गेलेल्या एका स्त्रीसाठी वरसंशोधनास सुरूवात केली. त्याचवेळी पुणे इथला त्यांच्या ओळखीतला युवक लग्नासाठी मुली पाहत होता. त्याला ओझर इथल्या २७ वर्षाच्या महिलेचं स्थळ सुचवण्यात आलं. तिला दोन वर्षाची मुलगी असून करोनात तिच्या पतीचं निधन झालं. तशी माहिती संबंधित युवकास देण्यात आली. युवकाचं पहिलं लग्न असतानाही त्यानं तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला. दोन्ही कुटूंबातील सदस्यांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना पसंत केलं. त्र्यंबकेश्वर इथं दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. सुखी संसाराच्या आणाभाका घेतल्या.
वैवाहिक स्थिती विचारात न घेता स्त्रियांचा सन्मान राखता आला पाहिजे, त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे, त्यांच्या भावनांचा आदर करा, यासाठी समाजानं बदल घडवावा, असं आवाहन झिंजाडे सातत्याने करत आहे.
कठिण समय येता…
करोना काळात खालावलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर
प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ करोना एकल विधवांना मिळावा याकरता शासनाने मिशन वात्सल्यच्या माध्यमातून पुढाकार घेतला. नाशिक जिल्हात चार हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यातील तरूणांचे प्रमाण अधिक असतांना त्यांच्या मागे राहिलेल्या पत्नीला यातून सावरण्यासाठी शासनाने मिशन वात्सल्यच्या माध्यमातून पुढाकार घेतला.
नाशिक जिल्हाचा विचार केला तर एक हजारांहून अधिक महिलांच्या पतीचा मृत्यू हा कोविडमुळे झाला. या महिलांची नोंद करणे, त्यांच्या आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक गरजांचा विचार करता त्या कुठल्या शासकीय योजनेस पात्र ठरतात यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने काम सुरू केले. मिशन वात्सल्य अंतर्गत महिलांना त्यांचा वारस हक्क मिळावा, पतीच्या संपत्तीवर हक्क सांगता यावा यासाठी प्रयत्न सुरू असताना शासकीय कागदपत्रांची कमतरता प्रकर्षाने समोर आली. यामध्ये शिधा पत्रिका, वारस प्रमाणपत्र, एल.आय.सी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, बँक खाते, आधार कार्ड, जन्म मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ता विषयक हक्क, कौशल्य विकास, कुटुंब निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आदींचा लाभ कसा मिळेल यावर भर दिला. या विषयी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अजय फडोळ यांनी सांगितले, की करोना काळात महिलांचा प्रश्न समोर आला. यातील बहुतांश महिलांना त्यांच्या हक्काची माहिती नाही. त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाही. या कागदपत्रांची पूर्तता करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास विभागासोबत चर्चा करत त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. मात्र या महिला शिवणकाम, पार्लर किंवा खाणावळ या कामाला पसंती देत आहेत. याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्यांचाही प्रश्न त्यांच्या समोर आहे.
सामाजिक कार्यकर्त्या नलिनी सोनवणे यांनी म्हणाल्या, नाशिक जिल्हात करोना बाधित विधवांची संख्या राज्याच्या तुलनेत लक्षणीय आहे. या महिलांचे संगठण करण्याचे आवाहन समोर आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे घरातल्या घरात काय काम करता येईल याकडे त्यांचा कल आहे. अनेकांना मुली आहेत. त्यांची जबाबदारी कोणावर सोपवावी हा प्रश्न आहे. टाटा सामाजिक संस्थेच्या वतीने शहरात प्रायोगिक तत्वावर कृषी विषयक प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार होते. मात्र या महिला एकत्रित न आल्याने प्रशिक्षणासाठी आवश्यक संख्या तयार होऊ शकली नाही. या मुळे हे प्रशिक्षण वर्ग रखडले.
आत्मजा ग्रुपच्या यशश्री रहाळकर यांनी सांगितले, की करोनामुळे पतीचं निधन झालेल्या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी आत्मजाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधत त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केला. मात्र यामध्ये थेट महिलांना आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे या करता वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली. महिलांना मदत आर्थिक स्वरूपात अपेक्षित असल्याचे जाणवले. त्यामुळे खूप थोड्या महिला अशा स्वरूपाच्या मदतीसाठी पुढे आल्या. पण ज्या आल्या त्यांना खानावळीसाठी लागणारी भांडी, शिवण मशीन आदी साहित्य पुरवले.
या महिलांसमोरील प्रश्नांची मालिका न संपणारी आहे. डोक्यावरील कर्ज, कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा, आर्थिक गरजा पूर्तता करण्यासाठी होणारी दमछाक यामध्ये या महिला भरडल्या जात आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना गरज आहे भक्कम आधाराची.
दुष्टचक्र भेदताना
“कोविडच्या पहिल्या लाटेत नवरा गेला… नऊ महिन्याच्या आत सासू गेली… आता आधार केवळ मोठ्या दिराचा पण त्यांच्याही घरात बायको नसल्याने दोन मुलांना घेऊन ते संसार रेटत आहेत. माहेरून मदत मिळेल अशी स्थिती नाही. पदरात १३ वर्षाची मुलगी. तिचं पुढं कसं होणार या विवंचनेत मला प्रचंड नैराश्य आलं. आत्ता पर्यंत माझ्यावर उपचार सुरू होते. आता कुठे मी वास्तव स्वीकारत जगण्याची वाट शोधत आहे. पण मुलीला सोबत करू काय असा प्रश्न मला सतावत आहे”, ही नाशिकच्या सीमा राऊत त्यांची व्यथा व्यक्त करत होत्या.
करोना काळात झालेली मनुष्यहानी कधीही भरून न निघण्यासारखी आहे. राज्यात प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा मृत्यू झाल्याने. सारेच होरपळले जात असताना नात्यांची वीण मात्र उसवत गेली. नात्यांकडे पाहण्याची संवेदना, भावना हरवल्याने तटस्थता आली. याचा सर्वाधिक फटका बसला तो कोरोनामुळे पती गमावलेल्या स्त्रियांना. घरातील कर्ता पुरूष गेल्याने एकट्या पडलेल्या महिलांना सासर व माहेरच्या लोकांनी अपवाद वगळता ‘तुझं तू बघ’ असं सांगून अंग काढून घेतल्याने या महिलांची परिस्थिती दयनीय झाली. आर्थिक, मानसिक, शारीरिक व भावनिक आधार हरवलेल्या महिला ही परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याने यातील बहुतांश महिला या नैराश्यात ढकलल्या गेल्या आहेत. सीमा या पैकी एक. सीमा यांचे पती एचएएल कंपनीमध्ये कामाला होते. घरी शेती आणि कुटुंबातील मोठा भाऊ असल्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडतांना आर्थिक स्थैर्य तसे थोडे उशीराने आले. साधारणत: सहा वर्षापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून त्यांनी कर्ज काढून घर घेतले. घर खर्च तसेच अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे बचत फारशी झाली नाही. करोनाच्या पहिल्या लाटेत करोना झाला. उपचार सुरू असताना बिल दहा लाखांपेक्षा जास्त झाले. उधार उसनवारी घेत दवाखान्याचे बिल भरलेही गेले. पण हे प्रयत्न अपुरे ठरले. सीमा यांच्या पतीचा मृत्यू झाला. हा धक्का पचण्यासारखा नव्हता. त्यांच्या निधनानंतर काही दिवसात कंपनीने त्यांचा भविष्य निर्वाह निधी यासह अन्य काही रक्कम हाती दिली. तोच बँकेचे वसुली पथक दारात उभे. बँकेकडून कर्ज वसुलीसाठी सातत्याने तगादा लावल्याने सीमा यांच्या नैराश्यात भर पडली. सासूबाईंचंही निधन झालं. यामुळे त्या अधिकच खचल्या. अखेर काही नातेवाईकांच्या मदतीने बँकेशी सेटलमेंट करत पतीची जमापुंजी, दागिने, मुलीच्या भविष्यासाठी ठेवलेली तरतूद अशी एकत्र रक्कम उभी करत बँकेचा तगादा थांबवला. कारण ताटात अन्न नसले तरी डोक्यावर छप्पर महत्वाचे होते. मात्र हातातोंडाची हीच लढाई सीमा यांच्यातील न्यूनगंडात भर घालणारी ठरली. त्या नैराश्याच्या गर्तेत लोटल्या गेल्या. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी उपचार सुरू झाले. आता त्या बऱ्या होऊ लागल्या आहेत. सीमा सांगतात माझा नवरा गेला हे मी स्वीकारलं आहे. मदत फारशी कोणाकडून नाही. या विषयी माझी तक्रार नाही. पण सरकारने किमान काही कर्ज माफ केलं असतं तर मुलीसाठी काही पैसे साठवू शकले असते. आता १३ वर्षाच्या मुलीला घरी ठेवून काम करू शकत नाही. कोणाकडे ठेवावे ही हिंमत माझ्यात नाही. त्यामुळे घरात राहुन खानावळ चालू केली आहे पण तेही जड पडते असे त्या सांगतात.
याविषयी करोना विधवा एकल समितीचे हेरंब कुलकर्णी सांगतात, करोना बाधित विधवा आणि इतर विधवा यांच्यात फरक आहे. ग्रामीण भागात करोनाबाधित विधवांची स्थिती दयनीय आहे. माहेरच्या मंडळींनी काही दिवसांसाठी त्यांना घरी नेले. त्यानंतर तुमचे तुम्ही पहा हे अप्रत्यक्ष सुचवले. शहरात महिला गृह कर्ज किंवा अन्य कर्जाखाली दबल्या गेल्या. यातील महिला ३० ते ५० वयोगटातील आहे. त्यांच्या पुनर्विवाहाचा विचार कुठेच झाला नाही. आजही त्यांना त्यांच्या मालमत्तेच्या हक्काविषयी बोलता येत नाही. त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजांचा विचार होत नाही. खूपशा महिलांनी हे वास्तव न स्वीकारल्याने त्यांना नैराश्य आले. न्यूनगंड बळावला आहे. काहींनी हे दृष्ट चक्र भेदले पण आजही या महिला नव माध्यमांवर आपल्या नवऱ्याचे फोटो शेअर करतात, डीपी ठेवतात. त्याच्या आठवणीत रमायला आवडते.
आपली लढाई आपणच लढावी लागते
पुण्याच्या वनिता हजारे यांच्याही पतीचं कोविडमुळे निधन झालं. करोना महामारीच्या काळात नागरीकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला. या काळात कोरोनामुळे पतीच्या मागे एकट्या राहिलेल्या महिलांचे प्रश्न प्रामुख्याने समोर आले. या महिलांची साथ काही ठिकाणी माहेरच्या व सासरच्या लोकांनी सोडल्याने या महिला वेगळ्याच दृष्टचक्रात अडकल्या. हे दृष्टचक्र भेदण्यासाठी काही महिलांनी पुढाकार घेतला. पुणे येथील वनिता हजारे या पैकी एक. त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. मात्र हे काम करताना येणाऱ्या अडचणी पाहता त्यांनी नव माध्यमांवर एक समूह तयार करत या सगळ्या महिलांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांना कुठल्या शासनाच्या योजनेचा लाभ घेता येईल, कोणती कागदपत्रे सादर करावीत याची माहिती मिळवून दिली. पुढील टप्पात अन्य काही सामाजिक संस्थांशी चर्चा करत या महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले. ३० ते ३५ महिलांना एकत्र करत बचत गट सुरू केले. या महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे या करता सामाजिक संस्था, मित्र परिवारातील लोकांशी चर्चा करत त्यांना कापडी पिशव्या बनवण्याचे काम मिळून दिले. काहींना शिलाई मशीन मिळवून दिले.
यातील महिलांचे शिक्षण दहावी-बारावी उत्तीर्ण असल्याने त्यांना नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काहींना ओळखीतून तर काहींना पतीच्या जागेवर अशा वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब करत त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न सुरू केले.
काही महिलांना सासर माहेर दोघांनी दूर लोटल्याने अशा महिला कमालीच्या नैराश्यात आल्या. एकीकडे घरातील जबाबदाऱ्या मनात दाटून आलेली उदासिनता अशा स्थितीत या महिलांना वास्तव काय आहे, त्यांनी काय करायला हवे यासाठी त्या सातत्याने प्रबोधन करत राहिल्या. आजही काही महिला कमालीच्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यांना औषधोपचार सुरू असून काम धंद्यात अडकवत या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या महिलांना सरकार दरबारी अडचणी येऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
अशाच दुसऱ्या आहेत नाशिकच्या विजया बागुल.
“पंधरा दिवसांपासून आयसीयुत आहे, झोप येत नाही, जीवाची नुसती तगमग सुरु आहे. आता सर्व असह्य होत आहे. यापूर्वी कधीही दवाखान्यात भरती झालो नाही. या करोनाने आयसीयुत आणले. सर्व काळजी घेऊनही हा करोना राक्षस घरात आला. आपलं हसरं घर त्याने विस्कळीत करून टाकलं…” विजया आणि त्यांच्या पतीमधला हा अखेरचा संवाद. हा संवादच विजया बागूल यांच्या मनात घर करून आहे. करोनामुळे पती गमावलेल्या महिलांची संख्या काही कमी नाही. प्रत्येकीचे दु:ख वेगळे. यातून बाहेर पडत सावरण्याचे बळ कमी महिलांनी मिळविले. बागूल त्यापैकी एक होय.
विजया यांच्या पतीचे निधन करोनाच्या पहिल्या लाटेत झाले. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला आधी कोरोना झाला. त्यांना उपचारासाठी नाशिकला आणले असता हा विळखा सर्वांना बसू शकतो, ही भीती विजया यांच्या पतीने व्यक्त केली. त्यांची भीती खरी ठरली. संबंधित ज्येष्ठ व्यक्तीनंतर विजया यांची मुलगी आणि नंतर त्या स्वत: करोनाच्या विळख्यात सापडल्या. खासगी रुग्णालयातून घरी परतल्यावर पतीलाही कोरोना झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. एचटीआरसीपी स्कोर केवळ एक होता. डॉक्टरांनी वैद्यकीय निकषांवर बोट दाखवित दवाखान्यात दाखल करता येणार नसल्याचे सांगितले. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू असतांना प्रकृती अधिकाधिक खालावू लागली. विजया यांनी भावाच्या मदतीने पतीला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र आवश्यक उपचार न झाल्याने १५ दिवस रुग्णालयात राहुनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. समाज माध्यमात करोनामुळे मृत्यू झालेल्या काही बरोबरच्या मित्रांना श्रध्दांजली वाहणारे संदेश पाहून विजया यांच्या पतीच्या मनात अधिकच भीती निर्माण झाली. ही भीती आणि उपचाराची कमतरता यामुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला. उपचारात साडेसहा लाखांहून अधिक खर्च झाला.
पतीच्या निधनानंतर विजया या सैरभैर झाल्या. जवळच्या वाटणाऱ्या सर्वांची भूमिका बदलली. त्या कठीण काळात उपचारासाठी कोणा कोणाकडून उचल घेतली होती. ही सारी परतफेड कशी करायची, हा यक्षप्रश्न असताना आप्तांनी आधार देण्याऐवजी बोल लावण्यास सुरूवात केली.
सोबत ११ वर्षाच्या चिमुकलीला घेऊन पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांना सतावू लागला. कोणीही त्यांना मानसिक आधार दिला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अखेर एका कंपनीत नोकरी मिळाली. त्या काळात नातेवाईकांनी आधार दिला असता तर परिस्थिती वेगळी असती. आपली लढाई आपल्याला लढावी लागते हेच खरं, हे विजया यांचे  बोल अशा परिस्थितीतून जाणाऱ्या अनेक महिलांना लढण्यासाठी बळ देणारं ठरू शकतं.
-प्राची उन्मेश

 

Leave a Reply