कौतुकामुळे कामाला बळ – विद्या तागडे कुंभालकर
सण समारंभ किंवा सुटीत सासरी गेल्यावर तिकडची मंडळी आपली ही सून एसटीत नोकरी करते या भावनेने सुखावलेले दिसतात. मी गेल्यावर नवीन कुणी आलं तर ओळख करून देतात. ते देखील निरनिराळे प्रश्न शंका विचारून समाधान करून घेतात. आई वडिलांना देखील आपली मुलगी एक वेगळं, चांगलं काम करत असल्याने अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. हेच कौतुक कंडक्टर म्हणून काम करताना येणाऱ्या अगणित अडचणी सोडविण्यासाठी बळ देतं, प्रेरणा देतं. या भावना व्यक्त केल्या आहेत नागपूरच्या विद्या तागडे कुंभालकर यांनी. गेल्या 10 वर्षांपासून त्या नागपूरच्या इमामवाडा आगारात महिला कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. सुरवातीला आपल्याला हव्या त्या स्टॉपवर किंवा पुढे मागे बस थांबली पाहिजे आणि आपल्याला लगेच उतरता आल पाहिजे यासाठी प्रवासी वाद घालायचे. सुट्टे पैसे आणि वाद तर ठरलेला. सुरवातीला या गोष्टीचा त्रास व्हायचा पण आता या साऱ्या गोष्टी कशा खुबीने हाताळायच्या ते सहजरीत्या जमायला लागलं आहे. आता काम करताना सुलभता वाटते असे सांगताना कुठल्याही बाबतीत सुरवातीचा संघर्ष पुढील मार्ग सुकर करतो या निष्कर्षप्रत त्या पोहोचल्या आहेत.
विद्या यांनी एम.ए. बी.एड. केलं. पण नोकरीच मिळेना. त्यात एक दिवस एसटीची जाहिरात पाहिली आणि दोघी बहिणींनी अर्ज केला. लेखी आणि तोंडी परीक्षेत दोघीही पास झाल्या. 2013 साली दोघींनाही नोकरी लागली. त्या एकत्र राहत असल्या तरी ड्युटी वेगवेगळ्या मार्गावर, वेगवेगळ्या वेळी असायची. आपल्या मुली नोकरी करतील याची वडिलांना खात्री नव्हती. पण विद्याने वडिलांचा समज खोटा ठरवला. त्यांनी दोघींनाही विरोध केला नव्हता पण कामाचं स्वरूप पाहून या दीर्घकाळ काम करतील याची शाश्वती त्यांना वाटत नव्हती. आज 10 वर्ष झाले त्या यशस्वीरीत्या काम करत आहेत. मोठी बहीण मात्र एसटीत वर्षभर नोकरी केल्यानंतर आणखी उच्च शिक्षण घेऊन आदिवासी खात्यात उच्चपदावर नोकरीस लागली. विद्या यांचं सुरवातीचं प्रशिक्षण नागपूरच्या मोक्षधाम डेपोत झालं. ड्युटीच्या पहिल्या दिवशी त्यांना धाकधूक वाटत होती पण अनुभवी ड्रायव्हर काकांनी त्यांना धीर दिला, मार्गदर्शन केलं. मग त्या या क्षेत्रात रुळल्या. त्यांचं माहेर अमरावती जिल्ह्यातील चांदुर इथलं तर सासर काटोल जवळील खंडाळा गावच. 2018 मध्ये विद्या यांचं लग्न झालं. त्यांचे पती देखील एसटीच्या वर्कशॉप विभागात कार्यरत आहेत. आता विद्या नागपूर, चंद्रपूर, पुसद, गोंदिया, अमरावती, अकोट, काटोल, रामटेक, सावनेर, भंडारा, देवरी अशा निरनिराळ्या रुटवर जातात. विद्या सासरी गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक, आजूबाजूचे, गावातले लोक त्यांना कुठे कुठे बस घेऊन जाते?, घरातून कधी निघते? परत यायला किती वाजता? एसटीच्या प्रवाशांसाठी काय योजना आहेत? असं सारं विचारून माहिती करून घेतात. आवर्जून पाठीवर शाबासकीची थाप मारतात. अर्ध्या रस्त्यात बस बंद पडणे, घरी परतायला उशीर होणे, अपघात अशा प्रसंगांना प्रत्येक महिला कंडक्टरला सामोरं जावं लागतं. सुदैवाने विद्या यांना हे अनुभव फारसे आले नाहीत.
नागपूर, चंद्रपूर विभागातील डेपोमध्ये महिला कंडक्टरसाठी विश्रांती कक्ष आहेत. काही कारणाने उशीर झाल्यास इथं त्या सुरक्षितपणे मुक्काम करू शकतात. विश्रांती कक्षात स्वच्छतागृहांसह मूलभूत सुविधा आहेत. त्यांच्या डेपोत सध्या 35 महिला कंडक्टर कार्यरत आहेत आणि लवकरच महिला ड्रायव्हर रुजू होणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. दररोज ये जा करणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग हे आता विद्या ताईंच्या परिचयाचे झाले आहेत. सगळ्यांशी प्रेमाने, माणसं ओळखून, परिस्थिती ओळखून त्याप्रमाणे वागल्यास कंडक्टर म्हणून काम करताना अडचणी येत नाहीत, आल्यातरी त्यातून मार्ग काढता येतो हे गमक आपल्याला गवसलं असल्याचे विद्याताई सांगतात.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला राज्य परिवहन महांडळात वाहक, नियंत्रक, मॅकेनिक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 4376 इतक्या महिला वाहक आपापल्या शहरातून, गावातून काम करत महाराष्ट्रभर प्रवाशांची सुखरूप ने आण करत आहेत. येणाऱ्या अडचणींवर त्यांच्या अंगभूत कौशल्याने मात करत उत्तमरित्या काम करत आहेत. महामंडळाला याचा अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षांमध्ये महामंडळाच्या सेवेत महिलांची संख्या वाढते आहे. सध्या महाराष्ट्रातील 21 विभागात 160 महिला चालकांचे प्रशिक्षण चालू आहे. म्हणजे लवकरच जनतेला बसच्या स्टिअरिंगवर उत्तमरित्या बस चालवताना महिला दिसणार आहेत. इतर सर्व क्षेत्राप्रमाणे एसटी महामंडळात देखील आता महिलाशक्तीचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात आणखी वाढणार आहे.