टक्कल असलं तरी बाई सुंदर दिसते

पुण्यात बालभारतीच्या गुजराती भाषा विभागातल्या केतकी जानी. चारचौघींसारखं नोकरी-मुलंबाळं-संसार असं आयुष्य जगणाऱ्या केतकी चाळीशीनंतर मात्र पुरत्या हलल्या. त्यांचे काळेभोर लांबसडक केस अचानक गळायला लागले.
वाढता ताण , लाईफस्टाईल यामुळे केस गळत असतील असं समजून सुरुवातीला जे स्वाभाविक दुर्लक्ष केलं जातं तेच त्यांनी केलं. नंतर मग हे काही साधंसुधं नाही हे लक्षात आलं तेव्हा केतकी डॅाक्टरांकडे गेल्या. अ‍ॅलोपेशिया या आजाराचं निदान झालं. अ‍ॅलोपेशिया म्हणजेच चाई पडणं. यात केसांचे पुंजके एकेक करत गळतात. या आजारावर अजूनही औषधोपचार नाहीत. डोक्यावर केस नसणं ही पुरुषांनाही असह्य होणारी गोष्ट, केतकी तर बाई.


केतकी सांगतात, ”सुंदर केसांचा मला जीवापाड अभिमान होता. कुठेही गेलं तरी आवर्जून त्यांचं कौतुक व्हायचंच! केसांची काळजी घेणं, हेअरस्टाईल्स करणं हे सगळं मला आवडायचं. त्यामुळे असा आजार स्वीकारणं अवघड होतं. आजार वाढत गेला आणि एक दिवस डोक्यावर अजिबात केस नसलेली, तुळतुळीत टक्कल पडलेली एक नवीच मी मला भेटले. हा अवतार मलाच खचवणारा होता. मी निराशेच्या गर्तेत गेले. स्वत:चा तिरस्कार करायला लागले. आत्मविश्वास कोलमडला. आवडीनं नटूनथटून घरगुती समारंभांना जाणारी मी साधी कोपऱ्यावर भाजी आणायला जायच्याही मनस्थितीत नव्हते. नवरा जिवंत असताना केस न कापणे, अंधश्रद्धा, गैरसमज हे सगळं माझ्या डोक्यात थैमान घालत होतं. समाज आपल्याला कसा स्वीकारेल, याचीच सतत चिंता. आत्महत्याही करावीशी वाटत होती. पण माझ्या मुलांनी मला तारलं. मुलं म्हणाली – ‘तू कशी दिसतेस आणि लोकांना काय वाटतं, आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्हाला तू हवी आहेस.’ तिथून सगळंच बदललं. या आजाराचा मी अभ्यासच सुरू केला”.
केस परत कधीच येणार नाहीत या कल्पनेतून नैराश्य आलेले अनेक रूग्ण आत्महत्या करतात. मुख्य म्हणजे यात महिलांइतकेच पुरुषही आघाडीवर आहेत. वीस वर्षांच्या अ‍ॅलोपेशियाग्रस्त मुलीचं लग्न चाळीस वर्षीय बिजवराशी लावून देण्यात आलं. अंधश्रद्धेतून महिलांना गावातून बाहेर काढल्याच्या घटनांची तर गणतीच नाही. अशा अनेक गोष्टी अभ्यासातून केतकीताईंसमोर आल्या. या रुग्णांसाठी त्यांनी ‘सपोर्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेप्ट अ‍ॅलोपेशिया विथ केतकी जानी’ हे फेसबुक पेज सुरू केलं. त्यांना प्रतिसाद मिळालेल्या रूग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे.
केस नसलेली महिलाही सुंदर आणि निरोगी आयुष्य जगू शकते, हा संदेश पोहोचवण्यासाठी अनेक फॅशन शो, सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला केतकीनी सुरुवात केली.
”टॅटू करण्याची इच्छा होती अनेक वर्षांची, पण तो कुठे करायचा. सहज नजरेत भरेल अशाच ठिकाणी करायचा हे ठरवलेलं होतं, शेवटी अ‍ॅलोपेशियाने मला टॅटूसाठी माझं डोकंच ‘कॅनव्हास’ म्हणून दिल्याचं लक्षात आलं आणि मी संपूर्ण टक्कलभर टॅटू रेखून घेतला.”केतकी सांगतात,”अ‍ॅलोपेशिया झालेली, पण मिसेस युनिव्हर्स हा सौंदर्यस्पर्धेचा झगमगता मुकूट मिळवलेली मी पहिली महिला आहे याचा अभिमान वाटतो. अभिनेत्री झीनत अमान परिक्षक होत्या. त्या म्हणाल्या, मुकूट कुणीही पटकावला तरी माझ्यासाठी तू ही स्पर्धा जिंकलीयेस! कारण तुझा मुकूट तुझ्यापासुन कुणी काढून घेऊ शकत नाही. त्यांचे हे बोल किती महत्त्वाचे होते, ते शब्दात मांडू शकत नाही. असे अनेक अनुभव मी त्यानंतर अनेकदा घेतले, पण आज अ‍ॅलोपेशियाग्रस्त रुग्ण जेव्हा मला प्रेरणास्थानी ठेवून नव्या दमानं आयुष्य जगत असल्याचं सांगतात तेव्हा तो मला मिळालेला सगळ्यात मोठा पुरस्कार असतो.”
केतकी यांच्या मते, समाजानं ठरवलेल्या सौंदर्याच्या व्याख्यांचं लोकांना ओझं होतं. समाजमान्य सौंदर्याच्या व्याख्येत आपण बसत नाही हा कॉम्प्लेक्स घेऊन असंख्य लोक जगत असतात. ताण ओढवून घेतात आणि त्यातून आत्महत्येसारखे नकोसे विचार करतात. हे थांबवण्यासाठी समाजानं आपला दृष्टिकोन निकोप करण्याची गरज आहे. तसं झालं तर फक्त महिलाच नव्हे तर संपूर्ण समाजाचंच जगणं निकोप होईल!

केतकी जानी
-के. भक्ती, पुणे

Leave a Reply