खडकात सेंद्रिय शेती फुलवणाऱ्या रजनीताई

नंदुरबार -नवापूर रस्त्यावर, नंदुरबार शहरापासून २६ किमी अंतरावरचं निंबोणी गाव. इथली संपूर्ण वस्ती आदिवासी. इथल्याच एका शेतातल्या पत्र्याच्या घरात रजनीताई भाईदास कोकणी राहतात. भाईदास निवृत्त प्राथमिक शिक्षक. नोकरीनिमित्त ते परगावीच असायचे. त्यामुळे शेतीची संपूर्ण जबादारी रजनीताईंवरच. मात्र ही जमीन टेकड्यांची, संपूर्ण खडकाळ. तिच्यावर गवतही उगवायचं नाही.
रजनीताईंनी निर्धारानं जमीन सपाट करायला सुरुवात केली. सुरुवातीला कुदळ-फावड्यांच्या आणि नंतर ट्रॅक्टरच्या मदतीनं त्यांनी जमीन सपाट केली. त्या स्वतःही ट्रॅक्टर चालवतात.
अथक प्रयत्नानंतर त्यांनी सात एकर शेत तयार केलं. कोरडवाहू शेतीत खडकात विहीर खणून सिंचनाची सोय केली. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत. गहू, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, अशी विविध पिके त्या घेतात. कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, वांगे ,मिरची, वाल पापडी अशा भाजीपाल्याचं उत्पादनही त्या घेतात. भाजीपाल्याच्या नियोजनबद्ध लागवडीतून वर्षभर उत्पन्नाचा त्यांनी आराखडा तयार केला. त्यांनी भाताच्या इंद्रायणी या सुधारित तंत्रज्ञानाच्या वाणांची लागवड करून भाताच्या उत्पादनात वाढ केली आहे.परिसरातील शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणाऱ्या राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प अंतर्गत त्यांनी एक एकर क्षेत्रावर आंबा लागवडीचा वाडी प्रयोग अतिशय उत्कृष्टपणे राबविला आहे. शेतात त्यांनी उत्तम प्रजातीच्या सुमारे पन्नास आंब्याची झाडं लावली. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. वेळेची तसेच लागवड खर्चात बचत करण्यासाठी सुधारित अवजारे आणि यंत्रांचा वापर रजनीताई करतात. विशेष म्हणजे संपूर्ण शेती त्या सेंद्रिय पद्धतीने करतात. अशा पद्धतीने त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा चांगला नमुना परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
डॉ.हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या तांत्रिक सहकार्याने द्रोपदी महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्रांचे कार्यान्वयन त्या करतात . खांडबारा परिसरातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या त्या सक्रिय सदस्यही आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सद्वारे त्यांचा नाशिक येथील कार्यक्रमात ‘प्रगतिशील किसान पुरस्कारानं ’ यंदा सन्मान करण्यात आला वेळो वेळी त्या कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेत असतात. कृषी विज्ञान केंद्रातील शेतीविषयक प्रत्येक प्रशिक्षणाचा त्या लाभ घेतात. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारनं प्रयोगशील महिला पुरस्कारानं त्यांचा सन्मान केला आहे. ”रजनीताईंनी हलक्या जमिनीत शास्त्रोक्त पद्धतीनं शेती केली आहे,” असं कौतुक कृषी विज्ञान केंद्रातले शास्त्रज्ञ पद्माकर कुंडे यांनी केलं.
”आदिवासी समाजात जन्म झाल्यानं कर्माचा भाग समजून मोलमजुरी करत होते. पण झाडांची शेतीची आवड होती.” रजनीताई सांगत होत्या. ”माझी आवड, शेतीवरील निष्ठा पाहून कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. मार्गदर्शन केलं. शास्त्रोक्त शेती शिकवली. अशी शेती केली तर प्रत्येक शेतकरी प्रगती करू शकेल.”

  • रुपेश जाधव, नंदुरबार

Leave a Reply