खणखणीत ‘टाळी’ -अॅडव्होकेट पवन यादव
अॅडव्होकेट पवन यादव
तृतीयपंथिय हा शब्द समोर आल्यावर तुम्हांला काय दिसतं नजरेसमोर? साडी नेसून पुरूषी रूपातली, सिग्नलवर टाळ्या वाजवत भिक्षा मागणारी व्यक्ती? असं असेल तर या मालिकेतून लक्षात येईल तृतीयपंथिय जगाच्या कितीतरी पुढे चाललेले आहेत आणि आपण माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलंच नाहीए का? फक्त सिग्नलवर भिक्षा मागण्यापेक्षा, चांगलं शिक्षण घेऊन, चांगलं करिअर घडवण्याचा, आपले संविधानिक हक्क मिळवत समाजाची उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथिय वकील कोण आहे, तुम्हांला ठाऊक आहे का? त्यांचं नाव आहे- अॅडव्होकेट पवन यादव.
पण फक्त महाराष्ट्रातले पहिले तृतीयपंथिय वकील ही पवन यांची ओळख पुरेशी नाही. पवन यादव यांच्या सारथी फाऊंडेशननं तृतीयपंथियांसाठी अनेक दिशादर्शक कामं केली आहेत. जसं की, महाराष्ट्रात- मुंबईत गोरेगाव इथं खास तृतीयपंथियांसाठी पहिले स्वच्छतागृह उभारलं, पालघर इथं तृतीयपंथियांसाठी वेगळी स्मशानभूमी बनविण्यात पुढाकार, पालघरमधील तृतीयपंथियांना गेल्या प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी 2022 रोजी ओळखपत्रांचं वाटप इ. अनेक मूलभूत हक्कांची कामं त्यांनी घडवून आणली आहेत. पण हे लिहिलंय तितक्या सहजपणे झालं असेल असं तुम्हांला वाटतंय का?घरच्यांपासून, प्रेमापासून कायमचं दूर राहण्याची किंमत ‘तृतीयपंथिय’ म्हणून पवन यांना चुकवावी लागतेय. पवन मूळचे मुंबईचे, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ,”हमारी मिडलक्लास फॅमिली थी, मतलब मम्मी डॅडीवाली नही, तो माँ- पापा वाली फॅमिली. वडील एमटीएनएलमध्ये अधिकारी, जन्म मुलगा म्हणून झालेला पण मला लहानपणापासूनच मुलींमध्येच खेळायला, वावरायला, नटायला- मुरडायला आवडायचं. मुलींमध्येच कम्फर्टेबल वाटायचं. मुलगे मला खेळायला घेत नसत, घेतलं तरी मामू- छक्का म्हणून चिडवत असत. मला आश्चर्य वाटायचं- मी पण यांच्यासारखाच गणवेष घातलेला आहे, माझं नाव पवन आहे, तरी हे लोक मला असं का चिडवतात? आपल्यातच काहीतरी कमतरता आहे असं वाटून मी गप्प- गप्प राहायचे. अशीच माझी, दहावी- बारावी, बीएससी झाली.”
“दरम्यान 2015 मध्ये एका नातेवाईकानेच माझं लैंगिक शोषण केलं. माझा संताप संताप झाला होता, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेले तर ‘लडके का कभी रेप होता है क्या?’ असं म्हणत माझी चेष्टा करत, तक्रार नोंदवायला पोलिसांनी नकार दिला. अपमानानं धुमसत असलेली मी, एका वकिलाच्या सहाय्यानं पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. पोस्को- 377 च्या अंतर्गत पोलिसांनी फायनली गुन्हा नोंदवून घेतला. तेव्हा जाणवलं- ‘कानून में बहुत ताकद है, कानून ही है जो आपकी मदद कर सकता है’ आणि मग कुठंतरी आपण कायद्याचंच शिक्षण घेऊया हा विचार मनात रूजला. आपण मुलगा नाहीत वेगळे आहोत- शरीर मुलग्याचं पण आत्मा- मन बाईचं आहे याची मला खात्री पटू लागली होती. दरम्यान ही रेप केस घरात गाजली, घरच्यांना हा त्यांचा अपमान वाटला. ज्यांना आपली आयडेंटिटीच मंजूर नाही, अश्या घरात राहण्यात अर्थ नाही हे मला जाणवलं. आणि मग मी वापीला गेले. तिथं छोटीशी नोकरी केली, पण पुन्हा पुरूषांकडून त्रास होतोय, हे जाणवल्याने मी मुंबईत परत आले.”
“मुंबईत खोली भाड्याने घेऊन एकटी राहायला लागले. लॉ साठी प्रवेश घेतला- फॉर्मवर ‘ट्रान्सजेंडर’ ही ओळख लिहिली, त्यावेळी प्राध्यापकांनी सुनावलं होतं , ‘ट्रान्सजेंडर? यहां पे तो सिर्फ नॉर्मल बच्चेही पढते है’ त्यावेळी मी त्यांना म्हणाले ‘एज्युकेशन के लिए कोई विशिष्ट जाति- धर्म- लिंग होने की जरूरत नही होती, हर एक को सिखने का हक है’ असं थोडंसं भांडूनच तिथं प्रवेश मिळवला. पण मी तीन वर्षाचं शिक्षण कसं घेतलं ते माझं मलाच माहित! तिथं कुणी नॉर्मल मुलं क्वचित माझ्याशी मैत्रीनं वागली, मधली सुट्टी व्हायची तेव्हा मी घाबरून बाथरूमला सुद्धा जायचे नाही. असं वाटायचं- कोणत्या स्वच्छतागृहात जाऊ? मुलग्यांच्या की मुलींच्या? तिथं गेले आणि परत माझ्यावर कुणी अतिप्रसंग केला तर? त्यामुळे मधली सुट्टी संपल्यावर मग मी स्वच्छतागृहात जायचे, कधी- कधी तास सुरू असताना मध्येच जायचे. शिक्षक ओरडायचे- एवढी सुट्टी दिलेली असताना तास चालू असतानाच का जायचं असतं तुला? हे वेग असे दाबून ठेवल्यानं मला युरिनरी इन्फेक्शन झालं. पण शिकायचं होतं, तर मुकाट सगळं सहन करत होते. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर मी निश्चयच केला, तृतीयपंथियांची ही फार वेगळी समस्या आहे- त्यामुळे भविष्यात आपण त्यांच्यासाठी वेगळी स्वच्छतागृहं तयार करायचीच.”
अॅडव्होकेट पवन यादव यांनी स्वत: घेतलेली शपथ पूर्ण केली. त्यांनी तृतीयपंथियांसाठी ‘सारथी फाऊंडेशन’ ही नोंदणीकृत संस्था सुरू केली असून 2022 साली मंत्री आणि आ. रवींद्र वायकर यांच्यासोबत पाठपुरावा करून गोरेगावमध्ये महाराष्ट्रातील पहिलं खास तृतीयपंथियांसाठीचं स्वच्छतागृह उभारलं आहे. या भागात सिग्नल, गार्डनजवळ जमणाऱ्या भिक्षा मागणाऱ्या तृतीयपंथियांची मोठी सोय या स्वच्छतागृहानं झाली आहे. एवढंच नाही तर सारथी या संस्थेच्या माध्यमातूनच गेल्या प्रजासत्ताकदिनी अर्थात 26 जानेवारी 2022 रोजी पालघर इथल्या तृतीयपंथियांना नाल्सा जजमेंटच्या निकषानुसार तृतीयपंथिय असल्याचं ओळखपत्र, पेन्शन आणि रेशन कार्ड वाटप करण्यात आलं. अडव्होकेट पवन सांगतात, “खूपदा लोक तू खोटं बोलतोस/ बोलतेस, तू तृतीयपंथिय नाहीसच, तू नाटकं करतोस/ करतेस असं म्हणतात. अक्षरश: उघडं- नागडं होण्याची वेळ लोक आणतात. त्यामुळे आम्हांला जिल्हाधिकाऱ्यांकडून ओळखपत्र मिळणं ही अतिआवश्यक गोष्ट आहे. मला अभिमान आहे की अश्या प्रकारची ओळखपत्र देणारा पालघर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. त्याचसोबत या कार्यक्रमात तिथं मी भाषण दिलं. ‘जिने का तो कोई ठिकाना है नही हमारा, मरने के बाद क्या हाल होंगे पता नही’ हे वाक्य ऐकून पालघरचे तत्कालीन पालकमंत्री दादाजी भुसे यांना ते वाक्य कुठेतरी खोलवर लागलं आणि त्यांनी ताबडतोब तिथं तृतीय पंथियांसाठी वेगळी स्मशानभूमी बनवण्याचे आदेश दिले आणि महाराष्ट्रातली अशी पहिली स्मशानभूमी पालघरमध्ये प्रत्यक्षात आली.”
अॅडव्होकेट यादव पुढे म्हणतात, “किन्नर मरने के बाद क्या- क्या होता है, ये भी लोग अलग- अलग बातें बनाते है- कोई बोलता है उसकी लाश को चप्पल से मारा जाता है, कोई बोलता है रात के अंधेरे में अंत्ययात्रा निकलती है, इन सब को मैं बोलना चाहती हूं, ‘जिस समाज के बारे में, वो जिंदा होते वक्त क्या करते है, कैसे जिते है, ये आपको पता नही, उनके मरने के बाद क्या होता है ये आप इतने आत्मविश्वास से कैसे कह सकते हो? आप तो बुरा ही बोलोगे ना हम लोगों के बारे मे? जरा दुसरे को जानने की कोशिश करो. आजारी पडलं तर दवाखान्यात सुद्धा स्त्री- पुरूष वॉर्ड असतात. तृतीयपंथियांचा वेगळा वॉर्ड नसतो, डॉक्टरच हात लावायला तयार होत नाहीत तर मग आया, नर्सेस आणि वॉर्डबॉयची काय कथा? असली कसली अस्पृश्यता ही? तृतीयपंथियांसाठी वेगळा वॉर्ड असावा यासाठी सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून मी बरेच प्रयत्न केला- तेव्हा आता मुंबईच्या जे जे रूग्णालयात वेगळा तृतीयपंथिय वॉर्ड आता तयार झालेला आहे.”
“तृतीयपंथिय म्हणून जगणं ही मुळातच एक रोजची लढाई असते, आम्हांला कोणत्याच सोसायटीत पटकन भाड्याने घरं मिळत नाहीत, लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात बायकासुद्धा सहज बसायला जागा देत नाहीत, एवढं सोडा पैसे मोजून हॉटेलात खायला गेलो तरी अनेकदा सुरक्षारक्षक बाहेरूनच हटकतात. ते म्हणतात, “’ट्रेन में कुत्ता- बिल्ली ले जाने के लिए टिकट मिलता है, पर हम गए तो लोग बैठने नही देते. हम क्या कुत्ते बिल्ली से भी गए गुजरे है? म्हणूनच आम्ही नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात तृतीयपंथियांना रेल्वे, एसटी, बसमध्ये आरक्षित सीट मिळावी ही मागणी केलेली आहे. ज्याप्रकारे अपंग, महिलांसाठी आरक्षित सीट असते, तशीच आम्हांलाही सन्मानाची जागा मिळावी. आम्हांला सहजासहजी घरं मिळत नाहीत ही खंत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे बोलून दाखवली, त्यासाठीचा पाठपुरावा मी बरीच वर्षं करतेय हे सांगितले. तर त्यांनी नागपूर मध्ये तृतीयपंथियांसाठी 250 शेल्टर होम बांधकामाधीन असल्याचे सांगितले.”
अॅडव्होकेट पवन यादव यांची ही सगळी कामगिरी पाहून काँग्रेसने तृतीयपंथिय विंगचे त्यांना अध्यक्षही बनवले आहे. इतकंच नाही तर युनायटेड नेशन्सच्या वतीने कॅलिफोर्निया मुक्त विद्यापीठाकडून डॉक्टरेटची मानद डिग्रीही पवन यादव यांना प्रदान करण्यात आलीये. पण हे सगळं करताना, इतरांना न्याय देताना आपल्या आयुष्यात मात्र प्रेमाचं, कुटुंब म्हणावं असं कुणीच नाही याची खंत त्यांना आहे. साधं चहा प्यायला, घर उघडायला कुणी नसतं. ते म्हणतात, “अॅडव्होकेट पवन यादव यांचा आदर सत्कार करायला, मानपत्र द्यायला आजकाल लोक पुढे येतात. पण त्याच्या नंतर काय पवन यादव कसे जगतात, त्यांना पुरेश्या केस मिळतात का? त्यांची रोजीरोटी कशी चालते? याच्याशी कुणालाच देणं घेणं नसतं. आणि हा सन्मान अॅडव्होकेट पवन यादवला मिळतो, रस्त्यावरच्या किन्नराची मात्र चेष्टा, अपमान केला जातो. हे चुकीचं आहे, हे थांबवा. सिर्फ अडव्होकेट पवन को रिस्पेक्ट मत दो, जो किन्नर रास्ते पे भीक मांग रहा है ना, उसे भी आदमी समझ के रिस्पेक्ट दो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकानं, विशेषत: तृतीयपंथियाने चांगलं शिक्षण घ्या, मेहनत करा, कायद्याचं ज्ञान घ्या, तुमचे हक्क जाणून घ्या- तरच कुठंतरी समाजात तुमची किंमत राहील.”
स्नेहल बनसोडे-शेलुडकर

Leave a Reply