एखाद्याने विचारलं, की तुझं गाव कोणतं? तर गाव अगदी हाकेच्या अंतरावर आहे असंच मी सांगतो. त्याला कारणही तसंच. एरवी मी ठाण्यात राहतो. इथल्या शहरी लोकांसाठी माझं गाव म्हणजे अगदी जवळ. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘खरांगण’ हे गाव मुंबईवाल्यांसाठी अगदी हाकेच्या अंतरावरचंच म्हणावं लागेल. शहरात राहणाऱ्यांना सगळ्या गावांचा परिसर हा आपल्याला रम्यच वाटतो. शहरातून गावाकडे जाणाऱ्या माणसाला भर उन्ह्याळ्यात देखील करवंदाच हिरवं झाड हे बहरलेलं वाटतं तर कदाचित गावच्या माणसाला ती काट्याची अडचण वाटेल. कोणत्या भागातील माणूस गावाकडे येतोय त्या त्या माणसावर गावाचं रम्यपण अवलंबून असतं.

ठाण्यापासून अगदी जवळ म्हणजे जर आसनगावमार्गे गेलं तर ८५ ते ९० किमी आणि कल्याण मुरबाडमार्गे गेलं तर साधारण ९५ किमीवर खरांगण आहे. शहापूर तालुक्यातील एका कोपऱ्यातील गाव म्हणून आमच्या गावाचं नाव घेतलं जातं. लहानपणी गाव किंवा निसर्ग काढायला सांगिला तर दोन डोंगराच्या मधून उगवणारा सूर्य, उडणारे चार पाच पक्षी, डोंगरातून खाली वाहत येऊन नदीला मिळणारा झरा, एक झाड आणि एक घर एवढ्या चित्रात आपण कल्पनेतलं गाव काढून मोकळे होतो. पण खरंच गाव असं असतं का? माझ्या गावच्या तीन बाजूने नदी आहे. दुष्काळी परिस्थिती वगळता नदीला बऱ्यापैकी पाणी असतं. गावातून जाणऱ्या नदीला ‘मारोनी’ असं नाव आहे. गावच्या मागच्या बाजूला गेलं की या नदीचं नाव बदलून ते ‘करेवर’ असं होतं. या करेवर घोट्या एवढ्या पाण्यात सुद्धा तुम्ही आपोआप पुढे वाहत जाता. आणि तिसऱ्या बाजूच्या नदीला ‘भुईशेत’ असं नाव आहे. इथं झाडंसुद्धा भरपूर. आंब्याची, पेरूची, आवळ्याची, जांभळाची तसंच करवंदाची झुडूपंही भरपूर. रानमेव्यासाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे. करवंद जमा करून त्याच्या बदल्यात कांदे आणि लसूण घेण्याचा प्रघात आतापर्यंत चालू होता. आजही काही प्रमाणात चालू आहे. एकत्र जमून करवंद तोडणं, ती एकत्र घेऊन कांदे लसूण आणायला जाणं असं करण्यात उन्हाळ्याची सुट्टी तर निघून जाई.
गाव,शहर या वेगवेगळ्या पातळीवर व्यक्तींच्या नजरेतून दिसणारा,त्यांना भासणारा गावाचा नक्षा हा वेगळा असू शकतो. आता आमच्या गावाच सांगायचं झालंतर म्हटल्याप्रमाणे शहरापासून जवळ असून अजूनही तेवढ्या सोयी सुविधा नाहीत. शिक्षणाची गरजेचं आहे असा वाटणारा समूह तिथं आहे पण तशी शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. ज्या गावच्या रस्त्याचं डांबरीकरण दहा ते बारा वर्ष फक्त फायलींमध्ये होत होतं अशा गावचा रस्ता दगडांच्या सौंदर्यात कसा बहरलेला असेल हे पाहण्यासाठी माझ्या गावाला भेट द्यायला हवी. स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच आमच्या गावाला जोडणारा डांबरी रस्ता मंजूर झाला आहे. आणि आता त्याचं काम सुरु आहे. मागच्या अनेक वर्षात या रस्त्याने अनेक अपघात पहिले. आता कुठे थोडीफार परिस्थिती बदलत आहे. गावच्या रस्त्यावर चालणाऱ्या जीप गाड्यांमध्ये बसल्यावर, मुळातच रस्ता खराब तरी त्या जीप चालकांवर होणारा शिव्यांचा भडिमार आणि ते ऐकून घेणारा जीप चालक धन्यच म्हणावे लागतील. “कुल मोडलंस ना रं… टाक मला मारून” असं म्हणणारी आजी आजही इथं पाहायला मिळते. आणि आजीचं बोलणं मुकाट्याने ऐकणारा चालकही इथंच बघायला मिळतो.

आपण सगळेच जन्मतः गिरवायला शिकत नाही. आई शब्दाचा उच्चार कागदावर गिरवायची वेळ योते तेव्हा याच गावातील मुलांचा हात मागे पडतो. इथं ‘अ’ म्हणजे ‘अज्ञानाचा’ प्रचलित आहे. तो पुसण्याचा प्रयत्न अजूनही होताना दिसत नाही. साधारण लिहायला वाचायला आलं म्हणजे शिक्षण झालं. उच्च शिक्षण म्हणजे दहावी असं म्हणणारी ‘पिढी’ अजून आहे. तसं शहर जवळ असल्यामुळे लहान वयातच रोजगार कसा कमवायचा हे आमच्या गावातल्या मुलांचं स्वप्नं. त्यासाठी शहराकडे येतात, रोजगारात गुंतून जातात. काही मोजकी घरे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत आग्रही आहेत.
गाव म्हणजे बऱ्याच परंपरांना सोबत घेऊन जाणारी एक व्यवस्था आहे. त्यात माझं गाव काही अपवाद नाही. गावच्या वेशीवर गावाचं संरक्षण करणारा गावदेव हा गावकऱ्यांचा जीव की प्राण. त्याच्यासाठी गावकऱ्यांनी जिवंत ठेवलेली परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी होते. दान देण्यासाठी घेतलेल्या बकऱ्यांची वरात गावापासून ते गावदेवाच्या मूर्तीपर्यंत मोठ्या धूमधड्याक्यात घेतली जाते. आणि तिथे त्यांचा बळी देऊन त्या बकऱ्यांचं मटण प्रसाद म्हणून संपूर्ण गावात वाटलं जात. ह्या प्रथेला ‘सात’ असं म्हणतात. गावदेवाला आनंदी ठेवण्यासाठी बकऱ्याचा बळी दिला जातो. (श्रद्धा अंधश्रद्धा ह्या विषयात जायला नको.)
गावात नदी असली तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे वांदे चालू होतात.मग काय नदीच्या बाजूला असलेल्या डवऱ्यात (खड्यात) पूर्ण गावची पाणपोई असते. एका डवऱ्यावर सातआठ बाया पण त्यांच्या तोंडून ना सरकारला शिव्या येत,ना निसर्गाला, ना की ग्रामपंचायतीला. पिण्यापुरतं मिळालं म्हणजे बस झालं. पण आता गावात अनेक ठिकाणी बोरिंगने पाणी देण्याची सुरुवात झाली आहे. महिलांची पाण्यासाठीची पायपीट आता थांबली आहे.
ना जायला रस्ता, ना प्यायला पाणी, ना मोबाईलला नेटवर्क अशा आमच्या ‘खरांगण’ची परिस्थिती आता हळूहळू बदलत आहे. आज महाराष्ट्रातील असंख्य गावांच्या वतीने माझं गाव बोलतं आहे, परिस्थिती सांगतं आहे. पण कोणाबद्दल त्याने रागरूस करावा असा त्याला वाटत नाही. ठाणे जिल्ह्यात एका कोपऱ्यात जरी आमचं गाव वसलेलं असलं तरी ‘खऱ्याच अंगण’ (खरांगण)त्याने जपून ठेवलेलं आहे.
– विजय भोईर, ठाणे