केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यावर्षी गडचिरोलीचे खुर्शिद शेख यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या कामाची ही ओळख.
गडचिरोली जिल्ह्यातलं सिरोंचा तालुक्यातलं शेवटचं गाव- असरअली, गावाच्या तिन्ही बाजूने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडची बॉर्डर. तिथली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असरअली, शाळा तशी 106 वर्षं जुनी. भारताच्या स्वातंत्र्याआधीपासून सुरू असणारी ही शाळा सर्वात आधी तेलुगु माध्यमाची होती, नंतर हिंदी माध्यमाची आणि मग गडचिरोली महाराष्ट्रात आल्यापासून ती मराठी माध्यमाची झाली. या शाळेचे मुख्याध्यापक आहेत खुर्शिद शेख सर. सध्या त्यांच्याकडे केंद्रप्रमुख पदाची देखील जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातंर्गत परिसरातील 15 शाळा येतात.
शेख सरांची नेमणूक या शाळेवर झाली ती 2014 साली. या शाळेच्या परिसरात राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांची मातृभाषा तेलुगु असल्याचं शेख सर सांगतात, शिवाय परिसरात बहुतांश माडिया आदिवासींची वस्ती आणि शिक्षण मराठीतून असल्याने पहिली ते सातवीच्या शाळेत तेव्हा फक्त 45 विद्यार्थीच होते. खरंतर 2014 हे शाळेचे शतकमहोत्सवी वर्ष, ते साजरं करायला हवं आणि त्या निमित्ताने शाळेविषयी समाजात आपुलकी, बांधिलकी वाढवायला हवी असं शेख सरांना वाटलं.
सर सांगतात, “तसा मी मूळचा भुसावळचा पण गेली 23 वर्षं गडचिरोलीतच काम करत असल्याने हीच माझी कर्मभूमी आहे. या शाळेची पटसंख्या वाढवायची असेल, गावाचा विश्वास संपादन करायचा असेल तर सर्वात आधी त्यांची मातृभाषा तेलुगु शिकण्याला पर्याय नाही, हे मला कळून चुकलं होतं. मी गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने तेलुगु भाषा शिकलो. गावात घरोघरी जाऊन गृहभेटी करून पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे अशी विनंती केली. शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांशी पण तेलुगुतून संवाद साधून त्यांचा विश्वास प्राप्त केला, त्यांची गुणवत्ता वाढेल यावर मेहनत घेऊ लागलो. मग शाळेच्या शतकमहोत्सवाच्या कार्यक्रमात पण सर्व गावकऱ्यांना आवर्जून बोलवलं, यातून गावकऱ्यांशी संवाद वाढीला लागला.”

शाळेत काहीतरी चांगलं काम चालू आहे, यावर गावकऱ्यांचा विश्वास बसू लागला. इकडे सरांनी विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यांना छोटी- छोटी बडबडगीते ऐकवली, त्यांच्या परिचयाच्या बाबींवर छोट्या गोष्टी मराठीतून करायला लावल्या, छोटे मराठी माहितीपट दाखविले, ‘मी रिपोर्टर’ सारखा शाळेच्याय गावाच्या घडामोडींची मराठीतून माहिती देणारा उपक्रम सुरू करून त्याचे व्हिडिओ शूट केले. 15 ऑगस्ट- 26 जानेवारीला छानसे संचालन, वर्षातून एकदा होणाऱ्या वार्षिकोत्सवात चित्रपटगीते टाळून शैक्षणिक कार्यक्रम, इंग्रजीतून संवाद करणारी मुलं हे पाहून तिथले पालक सुखावत होते. हळूहळू शाळेची पटसंख्या वाढून 2020 साली ती 211 वर पोहोचली.
दरम्यान शाळेला लोकसहभागातूनही काही मदत मिळू लागली. आमदार अंबरिषराव आत्राम यांनी शाळेला प्रोजेक्टर आणि तीन कॉम्प्युटर भेट दिले. शाळेच्या 3 विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली. हे सगळं चालू असतानाच मार्च 2020 मध्ये देशभरात कोविड 19 मुळे देशव्यापी लॉकडाऊन सुरू झालं. सुरूवातीला 10-15 दिवसांत शाळा परत सुरू होईल असं वाटत होतं, पण कोरोना पसरत होता तसा लॉकडाऊन वाढतच गेला. शाळा लवकर सुरू होणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर एप्रिल महिन्यात पालकांचे मोबाईल नंबर मिळविणे आणि व्हॉटसअॅप ग्रुप तयार करणं सुरू केलं. दुर्देवाने ॲड्रॉईड मोबाईल असणारे फार कमी पालक होते. ज्यांच्याकडे स्मार्टफोन होते, त्यांनाही फार कमी वेळेला इंटरनेट नेटवर्क मिळत होते.
अशा परिस्थितीत राज्यातील इतर शाळांप्रमाणे मुलांचा ऑनलाईन अभ्यास घेता येणार नाही, हे शेख सरांच्या लक्षात आले. त्यांनी शाळेतील इतर सात शिक्षकांच्या सहकार्याने पालकांशी व्हॉईस कॉलद्वारे संपर्क साधून एका परिसरात राहणाऱ्या मुलांचे गट केले, मुलं अभ्यास करतात की नाही हे पाहण्याची तुमचीही जबाबदारी असल्याचे पालकांना समजावले. गडचिरोली जिल्हा डायटकडून मिळालेल्या स्वाध्यायमालेच्या शाळेतील प्रिंटरवर प्रिंटआऊट आणि झेरॉक्स काढल्या. पालकांच्या मोबाईलवर एसएमएसवर अभ्यास पाठवला जाऊ लागला.
‘शाळा तुमच्या दारी’ नावाचा उपक्रम सुरू केला आणि शिक्षक दररोज मुलांच्या वस्तीवर जाऊ लागले. तिथं अंतर राखून शिक्षक विद्यार्थ्यांचे शंकानिरसन करायचे, स्वाध्यायमाला सोपवायचे. शिवाय आठवड्यातून एक ते दोन वेळा प्रोजेक्टर वेगवेगळ्या वस्तीत नेला जायचा, तिथं सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओज आणि माहितीपट, लघुपट दाखवले जायचे.
रोज आपण कुठल्या वस्तीत जातोय, कुठल्या विषयाचा अभ्यास घेणार आहोत, याची नोंद शिक्षक करायचे. शिक्षक घरापर्यंत पोहोचू लागल्याने गावात शाळेविषयी आणखी आदर वाढला. या शिवाय शाळेच्या लाऊडस्पीकरवरून परिपाठ, अभ्यासाच्या सूचना, कविता गायन असे उपक्रम भोंगाशाळेद्वारे सुरूच आहेत. अधूनमधून मुलांच्या चाचण्या घेऊन मूल्यमापनही केलं जातंय. नागपूर आकाशवाणीद्वारे घेतल्या जाणाऱ्या ‘शाळेबाहेरची शाळा’ या रेकॉर्डेड कार्यक्रमात या शाळेतील पाचवीची विद्यार्थिनी सृष्टी अलेप्पू हिची लॉकडाऊनमधील शालेय शिक्षणाचे अनुभव सांगण्यासाठी निवडही झाली होती.
हे सगळं करताना केंद्रप्रमुख म्हणून स्वत:च्या शाळेबरोबरच इतर शाळांतही ‘शाळा बंद, पण शिक्षण चालू’ हा उपक्रम सुरू राहावा याची चाचपणी शेख सर करत राहिले. या काळात, साध्या फोनचंसुद्धा नेटवर्क नीट नसलेल्या ठिकाणी सहकारी शिक्षक तळमळीने कार्य करीत असल्यानेच शिक्षण पोहोचविण्यात आपण यशस्वी झाले असल्याचे सर सांगतात. अश्या तळमळीच्या शिक्षकांसाठी ‘शिक्षणयोद्धा’ हा 1000 रूपयांचा पुरस्कार केंद्रस्तरावर त्यांनी सुरू केलाय, दर महिन्याला थोडक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो शिक्षकांना देण्यात येतो. शेख सर सांगतात, “आमचा भाग इतका दुर्गम आहे की, इंटरनेट काय कुणाला साधा व्हॉईस कॉल करायचा असेल तर खूप अडचणी येतात. तरीही आम्ही शिक्षण पोहोचवू शकतोय, कारण आमच्याकडे जिओ, बीएसएनएल अथवा इतर मोठ्या कंपन्यांचे नेटवर्क नसेल, पण आमच्याकडे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे.”
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर
Related