जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातून गोदावरी नदी वाहत जाते. तिच्या किनाऱ्यावर मुख्यत्वे टरबूज,खरबूज आणि मासेमारी करून उपजीविका करणारा कहार समाज.त्यांची स्वतःची जमीन नसते, म्हणून इतरांची शेती बटाईने घेऊन उन्हाळ्यात टरबूज, खरबूजाचे उत्पन्न घेतात. शिवाय गोदावरीच्या पाण्यातून मासेमारी करून उदरनिर्वाह करणारा हा समाज.पोटासाठी स्वतःची शेती नाही म्हणून मग कहार समाजातील लोक आता घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन बटाईने करू लागलेली आहेत.
याच समाजातील विष्णू कचरे या युवकाने या पदरी पडलेल्या धंद्यातून बाहेर पडून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले.बी.लिब चे (ग्रंथालयशास्त्र) शिक्षण घेतले आणि नोकरी साठी प्रयत्न केले पण यश काही मिळालं नाही. कचरेंना वाचनाची आवड, त्यातून ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास करतांना अनेक पुस्तके हाताखालून गेली. या पुस्तकांतून त्यांनी शेती विषयातील माहिती आवर्जून मिळवली, हा महत्त्वाचा फायदा झाला. जालना येथील एका कॉलेज मध्ये एम. लिबचे शिक्षण घेऊनही बेकार असलेल्या या तरुणाने नोकरी न मिळाल्याने, मग पारंपरिक व्यवसायात अर्थात बटाईच्या शेतीत लक्ष घातले आणि पावसाळ्यात टरबुजाचे (कलिंगड) बेहंगामी पीक घेतले. तुम्ही म्हणाल त्यात नवं ते काय? नोकरी नाही मिळाली की करत्यात पोरं शेती.पण हे प्रकरण जरा वेगळंच आहे…
आई वडील इतरांच्या शेतात राबायचे,ते पण बटाईने शेती करून टरबूज खरबुजाचे पीक घ्यायचे.पण गोदावरी नदीवर ठिक-ठिकाणी बंधारे झाल्याने टरबूजांची शेती करायला जमीन फारच कमी शिल्लक राहिली. इनमिन ७० दिवसांचे हे पीक,पण या पठ्ठ्यानी त्यात डोकं लावलं.कचरे यांनी मुख्यत्वे नदीमध्ये घेतले जाणारे हे पीक शेत जमिनीवर घेण्याचं यशस्वी धाडस केलं- तेही गोदावरी नदीपासून १०/१२ किलोमीटर लांब असलेल्या कुंभारपिंपळगाव येथील शेतात. दिल्ली, इंदूरच्या बाजारात बारमाही टरबूज विकले जातात ही माहिती विष्णू कचरे यांनी वाचली होती, म्हणून मग केवळ उन्हाळ्यातच टरबूजाची शेती न करता बेमोसमी टरबूज शेती करायला काय हरकत आहे, प्रयोग तर करून पाहूया म्हणून बेमोसमी टरबूजाची शेती केली आणि हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.
शेती तर स्वतःची नाही म्हणून मग त्यांनी कुंभार पिंपळगावातील शेषराव कंटुले यांची शेती बटाईने घेतली.त्यात दोघांनी अर्धा अर्धा हिस्सा खर्च करून शेती करायचे ठरले.बी बियाणे,शेतीची मशागत, औषधी,मजुरांची मजुरी, टरबूज तोडणीचा खर्च या सगळ्यांसाठी जवळपास ६०ते ७० हजारांचा खर्च आला.तो ठरल्याप्रमाणे दोघांनी मिळून केला. चांगल्या उत्पादनासाठी कलश सिडसचे मेलोडी, कॅंडी,अॅग्रिसिडचे SW २२०८ बियाणे वापरल्याने यावेळेस उत्पादन जोरदार आले.पण नंतरच्या अखंड पावसाने दगा दिल्याने टरबूजांचे खूप नुकसान झाले तरी अतिशय उत्तम असे, एक नंबर प्रतीचे १२ टन तर दुय्यम प्रतीचे सहा टन पीक हातात आले. दिल्लीच्या बाजारपेठेत सध्या टरबूजाला चांगली मागणी आहे, पण तिथे मालच नसल्याने बेमोसमी टरबूज उपलब्ध असल्याची माहिती कळताच दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी कुंभार पिंपळगावला येऊन पीक पाहिले. आणि १ नंबरचा माल २३ रुपये किलोने तर दुय्यम दर्जाचा माल १० रुपये किलोने जागेवर खरेदी केला.व्यापारी जागेवर माल खरेदी करू लागल्याने विष्णू कचरे यांची जागेवरच ३ लाख ३६ हजारांची कमाई झाली आहे.दिल्लीचे व्यापारी आता याच मालाला ३० रुपयांचा भाव देत आहे पण आता माल शिल्लक नाही.
थोडक्यात काय तर ७० दिवसाचे हे पीक बेमोसमीही घेता येते, शेतजमिनीवरसुद्धा घेता येते हे त्यांनी दाखवून दिले.सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे टरबूज आपण फक्त उन्हाळ्यात खायचो, ते आता बारमाही पिकवता येते आणि नेमक्या कुठल्या बाजारात त्याला मागणी आहे, याचा अभ्यास केला, तसा व्यापार्यांशी संपर्क साधला तर बसल्या जागी शेतातच लाखोंची कमाई होते, हे ही त्यांनी दाखवून दिले.
केवळ ७० ते ७५ दिवसांत खर्च वजा जाता २ लाख ६५ हजार हातात पडले ही उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा समाज बटाईने शेती करताना हंगामी पद्धतीने करतो.एक पीक संपले की व्यवहार संपला. पुढच्या हंगामासाठी नवीन व्यवहार. आता विष्णू कचरे यांनी टरबुजाचे पीक संपल्यावर त्याच जागेवर सोयाबीन पेरणीचा नवा व्यवहार केला असून, सोयाबिनचे पीक संपले की पुन्हा टरबूज लावणी साठी नवा व्यवहार होणार आहे. डोळ्याने दिसणारे हे उत्पन्न अश्या फायदेशीर शेती करण्यासाठी उत्तम वाटत असले तरी यामागे कहार समाजाची शेतीमध्ये मेहनत करण्याची तयारी, शेतीबद्दलचे प्रेम आणि नव्या युगासोबत अपडेट राहण्याची तयारी हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. म्हणून रडतखडत शेती करणाऱ्यांसाठी ही खरीखुरी यशोगाथा आहे.
लेखन: अनंत साळी, जालना
Related