कोल्हापूर होतंय स्मार्ट

कोल्हापूर शहर म्हटलं की ऊस, कोल्हापुरी वहाण, तांबडा-पांढरा, दूध आणि पैलवान हे चित्र आपल्याला डोळ्यांसमोर येतं. मात्र याच्या बरोबरीने उत्तम सामाजिक भान, विविध आंदोलने आणि छत्रपती शाहूंच्या लोकहिताच्या कामांची परंपरा जपायचा प्रयत्न कोल्हापूरकर आजही कसोशीने करत असतात. किंबहुना परंपरेला छेद देणाऱ्या विविध कामांची परंपराच एक प्रकारे इथं जपली जाते.

हीच परंपरा पुढे नेली आहे ती कोल्हापूर महापालिकेने पुईखडीच्या माळरानावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारून. पूर्वी घराघरातून निर्माण होणारा कचरा, त्या त्या वस्तीच्या बाजूला असलेल्या कचरा कोंडाळ्यात टाकला जायचा. बाकी मोठ्या शहरांप्रमाणेच तिथून तो कसबा वाबडा इथल्या मोकळ्या जागेत जाई. याआधीही कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प चालू झाले. कालांतराने ते बंदही पडले. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर निर्माण होऊन मूळ प्रश्न तसाच राहिला.

एकीकडे कोल्हापूरचं वाढतं नागरीकरण आणि त्यातून कचऱ्याचं प्रमाणंही वाढत होतं. आता गरज होती ती कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणाऱ्या प्रकल्पाची. त्यामुळेच 2015-16 साली कसबा बावडा इथल्या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पुईखडी इथल्या प्रकल्पाचं नियोजन महापालिकेने सुरू केलं. त्यासाठी निविदा मागवल्या गेल्या. कोल्हापूरातील प्लॅनेट इन्व्हायर्नमेंट कंपनीने यासाठी अर्ज केला आणि 2016 डिसेंबरमध्ये प्रकल्प मंजूर झाला. सलग नऊ महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर ऑक्टोबर 2017 मध्ये पुईखडी कचरा प्रकल्प कार्यान्वित झाला. हा प्रकल्प अनेक बाबींमुळे महत्वपूर्ण ठरला आहे.

असा आहे प्रकल्प

या प्रकल्पासाठी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर (BARC) संस्थेने बनवलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘निसर्गॠण’ बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रकल्पाच्या क्षमतेला अनुसरून 5 टन ओल्या सेंद्रिय घनकचऱ्यावर इथं दररोज प्रक्रिया केली जाते. या कचऱ्यातून सरासरी 300 ते 350 घनमीटर बायोगॅसची निर्मिती दररोज केली जाते. हा गॅस मोठ-मोठ्या बलून मध्ये साठवून त्याचा पुरवठा वीजसंयंत्राना (जनरेटर) केला जातो, आणि त्यापासून दररोज 450-500 युनिट वीजनिर्मिती होते. कचऱ्याचं वर्गीकरण, कचऱ्याचं छोटे तुकडे करणे, आवश्यकतेनुसार पाणी पुरवणे अशा विविध कामांसाठी यंत्रे वापरली जातात. विशेष म्हणजे या सर्व यंत्रांना लागणारी वीज इथल्याच बायोगॅस प्रकल्पात तयार होते. या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्लरीतून सेंद्रिय खत तयार होते. हे खतही महापालिकेच्या उद्यानांमध्ये तसेच नागरिकांनाही घरच्या बागेला वापरता येऊ शकते. अशा प्रकल्पांमुळे मिथेन सारखा हरित वायू कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे ग्लोबल वार्मिंग कमी करायला हातभार लागतो.

2017 साली कोल्हापूर महापालिकेने कसबा बावडा इथल्या डंपिंग ग्राऊंडवर एकशे सत्तर टन कचरा अलगीकरण आणि तीस टन बायोगॅस उत्पादन करणारा प्रकल्पही सुरू केला. लागोपाठ 2019 मध्ये बापट कॅम्प इथंही पाच टन क्षमतेचा तिसरा प्रकल्पही महापालिकेने सुरू केला. यासोबतच, प्रत्येक वॉर्डामध्ये घरांची संख्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात घंटागाड्या आहेत. यातून घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा केला जातो. हा गोळा झालेला कचरा पुईखडी, कसबा बावडा तसंच बापट कॅम्प या शहराच्या तीन वेगवेगळ्या भागात असलेल्या कचरा व्यवस्थापन केंद्रांवर नेला जातो.

विकेंद्रीकरण पद्धतीने जमा करून प्रक्रिया केल्याने शहरातल्या पाचही प्रभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावणं सोपं जातं. त्यामुळे कचरा वाहतुकीमध्ये बचत होतेच आणि डंपिंग ग्राऊंडवरील मोठे ढीग तयार होणं बंद होत आलेलं आहे.

पुईखडी प्रकल्पाच्या बांधणीबाबत प्लॅनेट इन्व्हायर्नमेंट कंपनीचे एमडी नियाझभाई अत्तार म्हणाले, “महानगरपालिकेने प्रकल्पासाठी जागा निर्धारित केलेली असली तरी कचरा प्रकल्प म्हटल्यावर स्थानिकांच्या मनात अनेक शंका आणि भीती होती. त्यावेळी कंपनीने स्थानिकांना वेगवेगळी प्रेझेंटेशन देऊन, संवाद साधून प्रकल्पाविषयी आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवली. हे करता-करता प्रकल्प कार्यान्वित होत होता आणि महापालिकेच्या अनेक विभागांशी रोजचा संवाद साधत प्रकल्प पुढे नेला गेला.” अनेक वेळा अल्प माहितीतून आलेली असुरक्षितता आणि असहकार दूर करण्यासाठी मोकळा संवाद हा अतिशय प्रभावी मार्ग असतो असं नियाझभाई सांगतात.

कचरा व्यवस्थापन ही आता स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि पर्यायाने समाजाची मुलभूत गरज आहे हे प्रशासनाच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंसंकल्पातील वित्त पुरवठ्यापासून स्थानिक पातळीवर स्वच्छता अभियान, गावागावांत स्वच्छ सर्वेक्षण सारख्या मोहिमा; यातून कचरा निर्मूलन आणि व्यवस्थापन याबाबतीत शासकीय स्तरावरून दबाव निर्माण झाला आहे. याला साथ देताना प्लॅनेट इन्व्हायर्नमेंट सारख्या कंपन्या फक्त कंत्राटी पद्धतीने प्रकल्प न चालवता; संचालक मंडळी स्वतः उत्साहाने या कामात सहभागी होतात. हा प्रकल्प यशस्वी होण्याचे आणि सुरळीत चालण्याचे गमक या हातात हात घेऊन पुढे जाण्याला आहे. कोंडाळ्यात जमा होणार कचरा उघड्या ट्रक मधून डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर निर्माण करणारं कोल्हापूर कात टाकून बायोमिथेनेशनच्या माध्यमातून आधुनिकीकरणाच्या मार्गाने निघालेलं आहे.

  • कौस्तुभ खांडेकर, कोल्हापूर

Leave a Reply