सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचं समाधान
थोडंसं स्वत:बाहेर पहाणं झालं की आपल्या देशात किती लोक गरीब आहेत, किती लोकांना उन्नतीची संधी नाकारली जाते, किती लोक मुकाट अन्याय सहन करत जगत असतात, याची जाणीव होते. देश किंवा राष्ट्र म्हणजे काय, तर देशात रहाणारे लोक; असं मी समजतो. राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीत, ही विशिष्ट संदर्भात उपयोगी पडणारी प्रतिकं आहेत; त्यांच्यात राष्ट्राचा अर्थ शोधणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. तसंच राष्ट्राच्या सीमा म्हणजे राष्ट्र, असं म्हणत त्या सीमांमध्ये राहणाऱ्या जनतेशी काही देणं घेणं नसणे, हे तर पराकोटीचं क्रौर्य.
हा देश माझा आहे, असं म्हणताना आपोआप देशातली ठिकाणं, देशातले लोक, भाषा, संस्कृती, परंपरा यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागते. मग त्यांच्यात जे जे वैगुण्य जाणवेल, ते ते आपलं वैगुण्य वाटू लागतं. आणि ते खटकू लागतं. नकोसं वाटू लागतं. उदाहरणार्थ, अस्पृश्यता, जातिभेद, धार्मिक विद्वेष, वगैरे. यांना दूर करणं आपल्या हातात नाही, याची खंत वाटू लागते. त्यांच्या उच्चाटनासाठी प्रभावी कृती करणं शक्य नसलं तरी त्यांचा पुरस्कार आपल्याकडून कधीही होऊ नये, असं मात्र पक्कं वाटतं. या वैगुण्यांच्या विरुद्ध लढणाऱ्यांना बळ द्यावंसं वाटतं.
ते कसं करावं, हा प्रश्न मात्र निरुत्तर करतो.
पण वैयक्तिक पातळीवर उत्तर नसलेल्या या प्रश्नाला भिडण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. त्यातला एक म्हणजे देशाला लांच्छनास्पद असणाऱ्या गोष्टींच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यथाशक्ती मदत करणे. यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे पैसे देणे. चांगलं काम करणाऱ्या संस्थांना देणग्या देणे. याबरोबर आणखी एक मार्ग आहे, तो म्हणजे आपल्यापाशी असलेल्या कुठल्यातरी कौशल्याचा लाभ अशा संस्थांना देत रहाणे.
खरं सांगतो, असं काम करणाऱ्या संस्थांसाठी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा त्या कामाच्या मोबदल्यापेक्षा आपला वेळ, आपली बुद्धी, आपलं शिक्षण यांचा सदुपयोग केल्याचं जे समाधान मिळतं, ते खूप मोठं असतं.
हे असलं समाधान मला संपर्कबरोबर काम करताना मिळतं. संपर्क ही संस्था ‘पब्लिक इंटरेस्ट ॲडव्होकसी’ करते. म्हणजे जनतेच्या हिताच्या कामांचा पाठपुरावा करते. किंवा जनतेच्या हिताचं काम करणाऱ्या संस्थांना त्यांच्या कामात मदत करते. गेली पंधरा वर्षं मी संपर्कशी जोडलेला आहे आणि या काळात मी अशा संस्थांमधल्या कार्यकर्त्यांना विविध प्रकारचं, मुख्यत: लिखाणाशी संबंधित अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं आहे. स्वत: लिखाण केलं आहे. महाराष्ट्रभर फिरलो आहे. आपोआप माझा समाजकार्य करणाऱ्या अनेकांशी संबंध आला आहे. केवळ मी संपर्कशी जोडलेला आहे, यावरून अनेक जण मला सामाजिक बांधिलकीपोटी सामाजिक कार्य करणारा समजतात!
हे तितकंसं खरं नाही. कारण मी स्वत: होऊन फार कुठल्या सामाजिक कामात पुढाकार घेतलेला नाही. माझ्यावर संपर्कने टाकलेली जबाबदारी जमेल तशी पार पाडणे, हेच बहुधा माझ्या सामाजिक कार्याचं स्वरूप राहिलं आहे. मात्र, कामाच्या निमित्ताने राज्यभर हिंडताना मला खूप काही बघायला मिळालं. शासन काय करत असतं, स्वयंसेवी संस्थांचं काम कसं चालतं, गावागावात कशाची गरज आहे आणि त्यासाठी कोण कसे प्रयत्न करत आहे, अशा खूप गोष्टी मला समजून घेता आल्या. परिणामी शासनव्यवस्था, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि या सगळ्यात होत असलेला निधीवापर, या विषयांबाबत ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असं माझ्याकडून होत नाही. संपर्कने मला सामाजिक क्षेत्रात थोडा संयम, थोडा समंजसपणाही शिकवला आहे!
आणि या सगळ्याबद्दल मी समाधानी आहे! संपर्कविषयी कृतज्ञ आहे. जे अज्ञानी आहेत, ‘निरागस’ आहेत, त्यांना आपण फार तर त्यांच्या अज्ञानाचा बोल लावू शकतो; पण आपल्याला तर सामाजिक दृष्टी आहे आणि त्यामुळे समाजासाठी काहीतरी करणे हे आपलं कर्तव्य ठरतं, ही जी बोच एरवी मला टोचणी देत राहिली असती, त्यापासून संपर्कने माझी सुटका केली.
आणि एका फार मोठ्या समाधानाचा लाभ मिळवून दिला.
– हेमंत कर्णिक

Leave a Reply