स्वत:चं लिहीन तेव्हा लिहीन; तोपर्यंत संपादन चांगलं समाधान मिळवून देत आहे!
‘आपलं महानगर’साठी मी काही काळ पुस्तकांची परिक्षणं लिहीत असे. वर्तमानपत्रातलं हे लिखाण म्हणजे त्या पुस्तकातल्या साहित्याची समीक्षा नसते, परिचय असतो. पण तो करून देण्यासाठी पुस्तक वाचायला लागतं. म्हणजे पुस्तकात लेखक जे सांगतो आहे, तेवढंच नाही; तर ते तो कसं सांगतो आहे, त्या सांगण्याला प्रकाशकाचा हातभार कसा लागला आहे, याकडे लक्ष द्यावं लागतं. पुस्तक बरं असो की वाईट, ते परिक्षणासाठी घेतलं की ते ‘उभं’ नाही, ‘आडवं’ वाचावं लागतं.
ही मला सवय लागली. मग काहीही ‘उभं’ वाचता येईना. पूर्वीप्रमाणे वेगाने पुस्तक वाचून संपवता येईना. म्हणजे, भराभर वाचून पुस्तकातली गोष्ट जाणून घेतली, असं करता येईना. ‘लेखकाला जे सांगायचं आहे, ते वाचकापर्यंत पोचवण्यासाठी तो कोणत्या युक्त्या वापरतो आहे, त्या किती यशस्वी होत आहेत, कुठल्या प्रसिद्ध लेखकाने मळवलेल्या वाटेवरून हा चालला आहे, त्याच्या लिखाणात संस्कृती, वर्तमान, नीतीमूल्यं, भाषावैभव या गोष्टी किती प्रमाणात आढळतात, याकडे सारखं लक्ष जाऊ लागलं.
ही प्रक्रिया उलट दिशेनेसुद्धा होते. म्हणजे, जगताना आसपास आढळणारी स्थिती, जाणवणारे प्रश्न, बदलती व्यवस्था आणि याचा समाजाच्या, व्यक्तीच्या मूल्यांवर होणारा परिणाम, या सगळ्याचं प्रतिबिंब साहित्यात किती प्रमाणात पडतंय, याकडेदेखील लक्ष जाऊ लागलं. त्या काळात आम्ही काही मित्र मिळून ‘आजचा चार्वाक’ नावाचा दिवाळी अंक काढत असू. साहित्य आणि समाजव्यवस्था यांच्या निकडीच्या गोष्टींना त्यात स्थान देण्याचा आमचा प्रयत्न असे. मग जे साहित्य येईल, त्यातून अंकासाठी निवड करण्याऐवजी आम्ही अगोदर विषय ठरवायचो. मग त्या विषयावर कोण नीट लिहू शकेल, यावर चर्चा करायचो आणि त्या लेखकाकडून आम्हाला नेमकी कोणती अपेक्षा आहे, याचं एक टिपण बनवून लेखकाला पाठवायचो. एवढं करून लेखक आम्हाला हवं तेच लिहीत असे, असं नाही; पण ‘आपण प्रवाहासोबत वहात चाललो नसून आपल्या प्रवासाला काहीतरी दिशा देण्याचा प्रयत्न करतो आहोत,’ याचं समाधान मोठं होतं!
एखाद्या प्रकाशन संस्थेसोबत संपादक म्हणून काम करताना दुहेरी अनुभव येतो. अनेक होतकरू लेखक त्यांचं लिखाण पाठवतात. काही मोठे लेखक त्यांच्या सदरांचा संग्रह करू बघतात. पण याबरोबर एखादा विषय मनात येतो आणि त्याची चर्चा लेखकाबरोबर करून त्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा देण्याची संधीसुद्धा मिळते. कधी लेखकाने पाठवलेल्या लिखाणावरून नवीन काही सुचतं. ते लिहून घ्यावंसं वाटतं. कधी कोणी लिखाण पाठवून सल्ला मागते, तेव्हा तो सल्ला देताना तिला काही कारणांमुळे दुसऱ्या प्रकाशन संस्थेकडे पाठवावं लागतं.
पण या सगळ्यात ‘आपल्यामुळे मराठी साहित्यविश्वात काहीतरी घडतं आहे, त्याचं श्रेय आपल्याला मिळो न मिळो; हा विषय, हा लेखक यांना प्रकाशात आणण्यासाठी आपला थोडाफार हातभार लागला आहे, ही भावना खूप समाधान देणारी असते!
आज मी ‘अक्षर’ या दिवाळी अंकाच्या संपादनात सहभागी असतो. इतर अंकांप्रमाणे कथा, कविता, लेख याही अंकात असतात; पण दर वर्षी आम्ही एक खास विभाग करतो. वर्तमानकाळातला एखादा लक्षणीय विषय निवडून त्याचे विविध पैलू वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. मग त्यात कधी नक्षलवाद हा विषय असतो आणि त्यात स्थानिक नागरिकांपासून पत्रकारांसकट पोलिसांपर्यंत जास्तीत जास्त संबंधितांचं म्हणणं वाचायला मिळतं. असे डझनावारी विषय आम्ही ‘अक्षर’मध्ये आणले आहेत. अजूनही आणत आहोत.
याचाही संस्कार होतो. वर्षभर विषयांकडे, नवनवीन लेखकांकडे, बदलत्या समाजाकडे लक्ष राहतं. या सगळ्याची दखल कशी घ्यायची, हे डोक्यात घोळत रहातं. आणि दिवाळी अंकाची आखणी करायला बसलो की ते प्रत्यक्षात आणण्याची धडपड सुरू होते. जेव्हा अंक मनाजोगता होतो, तेव्हाचा क्षण खरोखर समाधानाचा असतो.
स्वत:चं लिहीन तेव्हा लिहीन; तोपर्यंत हे संपादन चांगलं समाधान मिळवून देत आहे!
– हेमंत कर्णिक

Leave a Reply