प्राण्यांच्या दवाखान्याची गोष्ट
नागपूर शहर. इथं राहणाऱ्या कुंदन हाते यांची आणि त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या वन्यजीवांच्या इस्पितळाची ही गोष्ट. कुंदन गेल्या 25 वर्षांपासून वन्यजीवांवरील प्रेमापोटी स्वयंसेवक म्हणून वनविभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेत जखमी पक्षी आणि प्राण्यांवर इलाज करत आहेत. त्यांच्या कामाला यश येत गेलं आणि वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी सामुग्री आणि मनुष्यबळ कमी पडू लागलं. वन्यजीवांकरता एक हक्काचं इस्पितळ असावं असा विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा म्हणजेच 2012 साली त्यांना महाराष्ट्र शासनासमोर हा प्रस्ताव ठेवला. शासनानेही त्यांच्या प्रस्ताव मान्य करून 2016 मध्ये नागपूर शहरातील सेमीनरी हिल इथल्या वनपरिक्षेत्रात वन्यजीव प्राण्यांचा इस्पितळ उभं केलं.
या इस्पितळात प्रत्येक वन्यजीवांना स्वतंत्र ठेवण्याची सोय केली आहे. प्रत्येक प्राण्याला योग्य अशा तापमानात सुरक्षित ठेवण्यासाठी एसी तसंच हिटरची सोयही केली गेली आहे. या ठिकाणी सुसज्ज असं ऑपरेशन थिएटरसुद्धा आहे. पक्षी असो वा सरपटणारे प्राणी, नवजात पिल्लांपासून ते थेट मोठया प्राण्यांपर्यंत इथं सगळ्यांवर उपचार केले जातात. रिकवरी रेट 70 ते 80 टक्के इतका आहे. आतापर्यंत 35 हजार वन्यजीवांवर उपचार करण्यात आले आहेत. डॉ. मयुर काटे व डॉ. सैय्यद बिलाल हे दोन सर्जन इथं काम करतात. हे दोन्ही डॉक्टर 24 तास सेवा पुरवितात. याशिवाय येथे 3 फॉरेस्ट अधिकारी, 6 वनरक्षक, 2 महिला कर्मचारी, 8 हेल्पर व 3 ड्रायव्हर आहेत. पेशंटला (वन्यजीव) आणण्याकरीता सुसज्ज अशी एक अॅम्बुलन्स व एक पेट्रोलिंग कार इथं उपलब्ध आहेत.
विदर्भात परतवाडा व चंद्रपूर याठिकाणी सुद्धा हे इस्पितळ आहे. मात्र नागपूर येथील हे इस्पितळ मुख्य उपचार केंद्र म्हणून ओळखलं जातं. या उपचार केंद्राला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील विविध ठिकाणाहून अतिदक्षता विभागात उपचाराकरीता वन्यजीवांना आणलं जातं. त्यामुळे येथील जागा व मनुष्यबळ अपूरे पडत असल्याने हे उपचार केंद्र 10 हजार स्क्वेअर फिटमध्ये उभारण्याचं काम सुरु झालं आहे.
या इस्पितळाचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रात इतर 11 सर्कलमध्ये 11 उपचार केंद्र सुरु करायचं महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे. कुंदन हाते यांची समर्पित सेवाभाववृत्ती बघून महाराष्ट्र सरकारने नुकतीच त्यांची ‘वन्यजीव सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी’ निवड केली आहे. शिवाय त्यांना ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून गौरवण्यात आलं आहे. आता कुंदन हाते यांना ट्रेनिंग सेंटर सुरु करायचं आहे, वन्यजीवांविषयी जनजागृती करायची आहे.
– नीता सोनवणे, नागपूर

Leave a Reply