ना साबणाला हात, ना नळाला, तरीही मुलांचे हात स्वच्छ

 

बीड तालुक्यातील कुर्ला इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. इथल्या विद्यार्थ्यांना आता सतत हात धुवा असं सांगावं लागत नाही. तर ठराविक वेळानं हात धुण्याची आठवण हँड वॉश स्टेशनच करून देतं. अलार्म वाजला की विद्यार्थी हात धुण्यासाठी जातात. तिथे ना साबणाशी संपर्क ना नळांच्या तोट्यांशी. फक्त टाकी खाली हात धरला की हात धुतला जातो.
शाळेतले विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी हे स्मार्ट हँड वॉश स्टेशन तयार केलं आहे.


”जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या”. राणे सर सांगत होते. ”शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या हाताच्या स्वच्छतेबाबत आम्ही पूर्वीपेक्षा अधिकच लक्ष देत होतो. या दरम्यान एक बाब लक्षात आली ती म्हणजे, हात धुण्यासाठी विद्यार्थ्यांना साबणाला, नळांच्या तोट्यांनाही हात लावावा लागे. एकच साबण अनेक विद्यार्थी हाताळत असल्यानं विद्यार्थ्यांचे हात खरचं निर्जंतुक होतात की एका विद्यार्थ्याच्या हाताचे जंतू दुसऱ्याच्या हाताला लागतात? तोट्यांनाही सर्वांचे हात लागत असल्यानंही संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. या विचारातून स्मार्ट हँड वॉश स्टेशन तयार करण्याची कल्पना सुचली.”


सरांनी हे स्टेशन तयार करण्यासाठी बारा व्होल्ट बॅटरी, पाच व्होल्ट रिले ,वायर, पाण्याच्या तोट्या ,प्लास्टिक ड्रम, लोखंडी स्टॅन्ड ,थर्मल सेंसर ,रिचार्जेबल सेंसर, सायरन,डिजिटल टायमर याचा वापर केला. आयआर सेन्सरचा वापर करून संपर्काविना साबण आणि स्वच्छ पाणी विद्यार्थ्यांच्या हातावर पडतं. साबणाच्या पाण्यासाठी शंभर लिटरचा प्लास्टिक ड्रम आणि स्वच्छ पाण्यासाठी ५०० लिटरचा प्लास्टिक ड्रम. स्मार्ट हॅन्ड वॉश स्टेशनमध्ये संपर्काविना विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्याची सोयही आहे.
पाच हजार रुपयांमध्ये हे स्मार्ट हॅन्ड वॉश स्टेशन तयार करण्यात आलं आहे . २० ते १००० विद्यार्थीसंख्या असणाऱ्या शाळेसाठी हे स्टेशन उपयुक्त आहे.

– अमोल मुळे , बीड

Leave a Reply