लाखो दिलानेवाला अंडे का फंडा!
१९८४ साली एका मुलाने तीन हजार रूपयांच्या भांडवलात १०० कोंबड्या घेऊन, अमरावतीत अंडी विक्रीचा व्यवसाय स्वत:च्या घराच्या गच्चीवर सुरू केला. तेव्हा घरची परिस्थितीही विशेष नव्हती, वडिलांकडून भविष्य निर्वाह निधीचे पैसे घेऊन त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हा व्यवसाय सुरू केला होता. आणि आज त्यांच्या याच व्यवसायात ३०५०० कोंबड्या असून, दिवसाला एक लाख वीस हजार अंडी त्यांच्यापासून मिळतात. आपला व्यवसाय हळूहळू वाढवत आता लखपती झालेल्या या शेतकऱ्याचे नाव आहे- रवींद्र मेटकर.
अमरावतीच्या अंजनगांव बारी गावातले रवींद्र मेटकर उत्तम शेती तर करतातच, पण त्याचसोबत पोल्ट्रीफार्मचा व्यवसायही अतिशय जोमाने सुरू असून त्यातून त्यांची लाखोंची कमाई होते. ‘मातोश्री पोल्ट्रीफार्म’ हा त्यांचा व्यवसाय ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करतात. मेटकर यांचा पोल्ट्रीफार्म पूर्ण वातानुकुलित असून, कामकाज पाहण्यासाठी ५० कुशल कामगार कार्यरत आहेत. २००७ साली त्यांनी आपल्या या आधुनिक पोल्ट्रीफार्मच्या व्यवसायाची सुरूवात केली.
खरंतर शेतीसाठी जोडधंदा म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय. पण उत्तम नियोजन, स्वच्छता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे यातून शेतीपेक्षाही जास्त पैसा मिळवता येतोय. मातोश्री पोल्ट्रीफार्मवर कोंबड्यांना दररोज १३ टन खाद्य पुरविले जाते. या खाद्याचा, तिथं कार्यरत कामगारांचे रोजचे वेतन याचा एक दिवसाचा खर्चच साडेतीन लाख रूपये येतो, असं मेटकर सांगतात. कोंबड्यांसाठीचं खाद्यही ते स्वत:च फीडर मशीनद्वारे तयार करतात. त्याकरिता मका, सोया डीओसी, व्हिटॅमिन्सची औषधं इ.चा वापर केला जातो.
३०५०० कोंबड्या या ठिकाणी असून केवळ एक बटन दाबताच सर्व कोंबड्यांना मशीनद्वारे अन्न पुरविले जाते, इतकंच नाही तर कोंबड्यांची विष्ठा देखिल स्वयंचलित यंत्रणेद्वारे अत्याधुनिक पद्धतीने शेडच्या बाहेर काढली जाते. कोंबड्यांची ही विष्ठासुद्धा वाया घालवली जात नाही. विष्ठा शेड मधून बाहेर काढल्यावर तिचा खत म्हणून उपयोग केला जातो. रवींद्र मेटकर हे स्वतःच्या शेतात कोंबड्यांची विष्ठा खत म्हणून वापरतात तसेच इतर शेतकऱ्यांना एक रुपया दहा पैसे दराने हे खत विकतात. पिकांसाठी कोंबड्यांची विष्ठा हे उत्तम सेंद्रिय खत असल्याचे रवींद्र मेटकर म्हणतात.
अर्थातच कोंबड्यांची अंडी सुद्धा स्वयंचलित यंत्रणेद्वारे शेडच्या बाहेर सुरक्षितपणे एका ठिकाणी जमा होतात. या केंद्रात केवळ दोन महिलांच्या साह्याने एका ठिकाणी जमा होणारे ही सगळी अंडी, ट्रेमध्ये भरली जातात. या कोंबड्यांच्या शेडमध्ये योग्य तापमान राखण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. कोंबड्यांचे वेळेवर लसीकरणही केले जाते. अत्याधुनिक यंत्रणा आणि नियोजनामुळे स्वच्छ वातावरणात या पोल्ट्री फार्म मध्ये सर्व कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधांमुळे या कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमतासुद्धा तीन ते चार टक्क्यांनी वाढते, अशी माहिती रवींद्र मेटकर यांनी ‘नवी उमेद’ शी बोलताना दिली.
“अंड्यांची विक्री करण्यासाठी आम्हाला फारसा त्रास होत नाही. आमच्या पोल्ट्री फार्म वरूनच सर्व अंडी परस्पर विकली जातात. विदर्भासह मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, इंदोर, झाशी या शहरांमध्ये आमच्या पोल्ट्री फार्मची अंडी जातात. यासह गुजरातच्या सुरत शहरात देखील आमच्या इथून नियमित अंडी जात असल्याचं रवींद्र मेटकर यांनी समाधानाने सांगितलं. यासोबत मेटकर अतिशय उत्तम अशी सेंद्रिय शेतीही करतात. या शेतीत ते कोणतेही रासायनिक खत, फवारणी वापरत नाहीत. कोंबडीच्या विष्ठेपासून तयार झालेले खत आणि शेतावरच तयार होणारी इतर सेंद्रिय खतं ते वापरतात.
मेटकर यांच्या मातोश्री पोल्ट्रीफार्मच्या गगनभरारीची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून, त्यांना कृषी क्षेत्रातले अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना नुकताच ‘जगजीवनराम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार’ मिळालाय. शेतीसोबत जोडधंदा करून आर्थिक सुबत्ता मिळवता येते आणि स्थानिकांना रोजगारही देता येतो, याचा वस्तुपाठच रवींद्र मेटकर यांनी विदर्भातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
लेखन- जयंत सोनोने, अमरावती

Leave a Reply