खणखणीत ‘टाळी’-महिला पोलीस ललिताचा, पोलीस नाईक ललित होताना!
महिला पोलीस ललिताचा, पोलीस नाईक ललित होताना!
“विचार करा, तुम्ही वयाची 29 वर्षे मुलगी स्त्री म्हणून जगलायत आणि अचानक एके दिवशी डॉक्टरांकडे तपासणीला गेल्यावर ते तुम्हांला सांगतात- तुमच्यात पुरूषी हार्मोन्सचं प्रमाण खूप जास्त आहे, तू मुलगी नाहीएस- मुलगा आहेस. काय होईल तुमचं? पायाखालची जमीन सरकेल ना? डोळ्यात पाणी येईल ना? माझी परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. अक्षरश: डॉक्टरांच्या हातापाया पडून मला मुलगीच ठेवा ना! असा आग्रह मी करत होतो, मी आई बापाला, नातेवाईकांना, समाजाला तोंड कसं देऊ, अक्षरश: नवं आयुष्य कसं जगू असे प्रश्न मला पडले होते. पण डॉक्टरांनी उच्चारलेले ते वाक्य- “ललिता तुम लडकी रहोगी तो कठपुतली जैसी रहोगी. ना कुछ भावनाए होंगी, ना कोई अच्छा लाईफ. इससे अच्छा है जो तुम अंदर से हो, लडका बनो- आप खुद अपने आप से मिल गए ऐसा एहसास होगा” – यानं माझं आयुष्यच बदललं आणि मी ललिताचा ‘ललित’ झालो.” बीडचे पोलीस नाईक ललित साळवे सांगत होते.
अक्षरश: चित्रपटात शोभावी अशी ललित साळवेंची ही कथा आहे. मुलगी म्हणून जन्म झाला, 29 वर्षे बाई म्हणून जगले,मनातून थोड्या पुरूषी भावना होत्या- पण आपण पुरूषच आहोत याची जाणीव व्हायला डॉक्टरांशी भेट व्हावी लागली. ललित साळवे म्हणजेच, आधीच्या ललिता साळवे या मूळच्या बीड तालुक्यातील माजलगावच्या. तेव्हा ते पोलिस खात्यात डिसिप्लीन विभागात महिला पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांच्या घरात लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या, पण आपल्या शरीरातल्या आणि मनातल्या घडामोडी ललिताला स्वस्थ बसू देत नव्हत्या. आईशी ही मनातली गोष्ट बोलून मुंबईच्या जे जे रूग्णालयात ते तपासणीसाठी गेले. तिथं तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं- “तुमच्यात पुरूषी हार्मोन्स जास्त आहेत, तुम्ही बाईच्या शरीरात अडकलेला पुरूष आहात, सेक्स चेंज ऑपरेशन करून घ्या आणि पुरूष बना, तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी ते सर्वात उपयुक्त ठरेल.”
हे सगळं ऐकून त्यांच्या पोटात धस्स झालं, जी गोष्ट कधी ऐकली नाही- ती प्रत्यक्षात कशी करायची? इतकी वर्षं बाई होतो, आता ऑपरेशननंतर पुरूष झालो म्हणून सांगायचं? लोक स्वीकारतील का आपल्याला? त्याहीपेक्षा आपण स्वीकारू शकू का आपल्याला? बाईच राहावं का, उगाच कशाला ऑपरेशनच्या फंदात पडायचं? असे किती तरी प्रश्न तत्कालीन ललिताच्या मनात होते. धीर एकवटून त्यांनी आई- वडिलांना सांगितलं. “वडिलांना तर पहिल्यांदा मी गंमत करतोय असंच वाटत होतं. पण लेकरावरच्या प्रेमापोटी विचारांती आई- वडिलांनी या ‘सेक्स चेंज’ ऑपरेशनला परवानगी दिली. त्यांनी परवानगी दिली खरी पण मला मात्र मनातून भीतीच होती. कारण याआधी असा ऑपरेशनने बाईचा पुरूष झाल्याची बातमी कधी ऐकली नव्हती, महाराष्ट्रात ऐकिवात नव्हती. मग गुगल, यू ट्यूब सगळ्यांचा आधार घेऊन भरपूर माहिती शोधून काढली. दुसरीकडे आमच्या गृहमंत्रालयाकडूनही ‘सेक्स चेंज’ ऑपरेशनची परवानगी घेणं आवश्यक होतं. तसा अर्ज केला, पण त्याचं लवकर उत्तर मिळेना तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणांच्या मार्फत तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलो, माझी केस सांगितली. फडणविसांनी या ‘सेक्स चेंज’ ऑपरेशनसाठी तात्काळ परवानगी मिळवून दिली. आणि ऑपरेशनच्या मार्गातील कायदेशीर अडथळे दूर झाले.” ललित साळवे सांगत होते.
ऑपरेशनचा अनुभव सांगताना ते म्हणतात “कागदोपत्री परवानगी मिळाली पण आता मन घट्ट करून ऑपरेशनला सामोरं जायचं होतं. सुदैवाने आई-वडील, माझे भाऊ- बहिणी सगळं कुटुंब माझ्या पाठीशी होतं, धीर देत होतं. हे ऑपरेशन सात- आठ तासांचं होतं आणि असं एक नाही तर दरवर्षी प्रत्येकी एक, अशी तीन ऑपरेशन्स करावी लागणार होती. मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सकाळी सात वाजता मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, तेव्हा एकीकडे मनात भीती होती- दुसरीकडे डॉक्टरांवर विश्वास होता. अक्षरश: संध्याकाळी चार वाजता मला ऑपरेशन थिएटरबाहेर आणलं. मी हळूहळू शुद्धीवर आलो आणि माझं जगच बदलत होतं. मी ललिताचा ललित होण्यात पहिली मोठी झेप घेतली होती”
त्यानंतर दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ललित पुन्हा पोलीस खात्यात जॉईन झाले. शरीराने पुरूष झालो आहोत, पण आपल्याला जमेल का हे सगळं, चुकून एखादी बाईची लकब, तसं बोलणं- तसं चालणं, स्त्री लिंगी शब्द तोंडातून बाहेर पडू नयेत यासाठी ते फार सावधगिरीने वागत होते. “पण मला पोलीस विभागातील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी अपेक्षेहून सुंदर साथ दिली. पूर्वी ‘दीदी’ म्हणणारे ‘दादा’ म्हणू लागले, ‘मॅडम’ म्हणणारे आवर्जून ‘ललित सर’ म्हणू लागले. महिला कर्मचाऱ्यांशी आधीपासून चांगली ओळख होती, त्या हक्काने – आदराने बोलायच्याच पण पोलिसांतील पुरूष कर्मचारीही सन्मानाने, बरोबरीने वागवत होते. माझ्या डोक्यावरील मोठ्ठं टेन्शन गेलं. घरातही आणखी एक भाऊ वाढल्याने भाऊ- बहीण खुश झाले. या सगळ्या गोष्टींनी माझा आत्मविश्वास वाढायला लागला” ललित साळवे त्यांच्या प्रवासाविषयी बोलत होते.
त्यानंतर 2019 आणि 2020 मध्ये त्यांची अजून दोन ऑपरेशन्स झाली. ललित साळवे त्या ऑपरेशन्सना तश्याच धीरानं सामोरे गेले. सध्या ते बीडच्या एसपी ऑफिसमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ललित साळवे यांचा विवाहही झालेला असून त्यांना एक गुणी मुलगी अर्थात सीमा साळवे आयुष्याच्या जोडीदार म्हणून लाभल्या आहेत. याबद्दल समाधान व्यक्त करताना ललित साळवे म्हणतात, “आमचं अरेंज मॅरेज असून मुलीपासून किंवा त्यांच्या घरच्यांपासून काहीही लपवून ठेवायचं नाही, हे माझं ठाम मत होतं. त्यानुसारच एकमेकांना सगळं सांगून, एकमेकांचे स्वभाव जोखून आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आज मी माझ्या संसारात पत्नीच्या- सीमाच्या भक्कम साथीसह आनंदी आहे. शिवाय भाऊ- बहीण, आई वडील सासू सासऱ्यांचे आशीर्वादही पाठीशी आहेत.”
– स्नेहल बनसोडे – शेलुडकर

Leave a Reply