लांबचा प्रवासही आता होईल निश्चिंतपणे

सिद्धांत तवरावाला एकदा काही कारणाने ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. सिद्धांत यांना लघुशंकेसाठी ताटकळत राहावे लागले. वारंवार विनंती करूनही ड्रायव्हरने गाडी न थांबवल्याने त्यांना त्रास झाला आणि तो प्रसंग त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. इतका की त्यातूनच डिस्पोजेबल युरीन बॅगच्या निर्मितीची कल्पना त्यांच्या डोक्यात फिट्ट बसली. सिद्धांत सतीश तवरावाला हे मुळचे जालन्याचे. त्यांचे वडील हे प्रतिथयश वकील. त्यांचं शिक्षण BE मेकॅनिकल  व नंतर त्यांनी MBA केलं आहे. आपल्या या भन्नाट कल्पनेची सुरुवात त्यांनी अहमदाबाद मध्ये 2019 ला प्रत्यक्षात उतरवली. आपल्या उत्पादनाच्या यशस्वितेसाठी त्यांनी लंडन येथे जाऊन उद्योग व मार्केटिंगचे शिक्षण घेतले. इतरही बाबींचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर जालना इथं त्यांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केलं. त्यासोबतच पॉकेट डिस्पोजेबल युरीन बॅगच्या मशीनवर संशोधन केलं आणि प्रवासी, आजारी, वयोवृध्द यांच्यासाठी अत्यंत उपयोगी अश्या या बॅगची निर्मिती सुरू केली आहे.

पी शुट असे त्यांच्या या उत्पादनाचे नाव असून पी शुट ट्रॅव्हल व पी शुट मेडी अश्या 2 प्रकारच्या उत्पादनाची त्यांनी सुरुवात केली आहे. या पी शुट बॅगमध्ये जमा होणाऱ्या लघुशंकेचे रूपांतर लगेच गोठून बर्फासारख्या घनरुपात होते त्यामुळे त्याची गळती होत नाही. ते सांडत नसल्याने इतरांना त्याचा त्रास होत नाही. वापर झाल्यावर त्यातील जमा झालेली घट्ट रूपातील लघुशंका टॉयलेट किंवा योग्य जागी टाकून देता येते. शिवाय किमान 2 ते 3 वेळेस पुन्हा ही पॉकेट बॅग वापरता येते. सहज वापरता येण्यासारखी ही बॅग पर्स, पाउचमध्ये ठेवता येण्यासारखी असून 3 बॅगच्या पी शुट मेडीची किंमत 99 रुपये इतकी आहे.

सिद्धांत म्हणतात, भारतातील उघड्यावर लघुशंका थांबवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वच्छ भारत मिशनला हातभार लावायचा उद्देश डोळ्यासमोर आहे. तवरावाला यांनी उद्योगासोबतच सामाजिक भान राखत बचत गटातील 100 महिलांना या उत्पादनाच्या पॅकिंगचे प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पी शूट ट्रॅव्हलचा उपयोग हा प्रवासात टॉयलेटची सुविधा नसेल तर उघड्यावर लघवी न करता ती या पॉकेटमध्ये करता येते. त्याचे रूपांतर लगेच बर्फासारख्या घट्ट रूपात होते व ते नंतर डस्ट बिन मध्ये टाकता येते. पी ट्रॅव्हल ही बॅग ही एकदा वापरता येते तर पी शूट मेडीचा उपयोग 3 ते 4 वेळेस होतो व त्यामुळेच युरिन पॉटप्रमाणे हे काम करते. वयोवृद्ध, आजारी,गर्भवती महिलांसाठी हे उपयोगी आहे.

आता पर्यंत सहा देशात हे उत्पादन पोहोचलं असून 3 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.

  • अनंत साळी, जालना

Leave a Reply