लक्ष्मी सीताराम पवार. गेल्या वर्षी ओडिशात खेलो इंडिया या राष्ट्रीय स्तरावरच्या कुस्ती स्पर्धेतली सुवर्णपदक विजेती. तिचं स्वप्न ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं! पण कुटुंबाची ओढाताण लक्षात घेऊन त्यावर पाणी सोडण्याचा निर्णय तिनं घेतला. खेळाडूनं यश मिळवलं की त्याचं प्रचंड कौतुक पण उदयोन्मुख खेळाडूच्या गरजांकडे साफ दुर्लक्ष.. अशा आपल्या क्रीडा संस्कृतीत लक्ष्मीसारख्या असंख्य खेळाडूंना आपल्या स्वप्नावर पाणी सोडावं लागतंच!
पण लक्ष्मीची गोष्ट इथेच संपत नाही.
लक्ष्मी,लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या खानापूर तांडा इथली. सध्या ती लोहारा तालुक्यातल्या माकणी इथल्या बीएसएस महाविद्यालयात बीए तृतीय वर्षाला आहे. लहानपणापासूनच तिला कुस्तीची आवड. शाळेपासून विद्यापीठ, राज्यस्तरावर झालेल्या असंख्य स्पर्धा तिने जिंकल्या. घरच्यांनाही तिचं कौतुक. घरची बिनभरवशाची दोन एकर शेती. लक्ष्मीची जिद्द, चिकाटी पाहून तिची आवड पूर्ण करण्यासाठी आईबाबा, भाऊ अपार मेहनत घेणारे. ऑलिम्पिकसाठी तयारी करायची तर तशी तालीम, खुराक आणि प्रशिक्षक हवा. त्यासाठी बराच खर्च येणार असल्यानं लक्ष्मीच्या कुटुंबानं प्रयत्न केले. थोडीफार मदत लोकांनी केली. पण तीही अपुरीच पडत होती. लक्ष्मीलाही कुटुंबाच्या कष्टांची जाणीव होती. वास्तवाचं भान बाळगत तिनं निर्णय घेतला. आईबाबांसोबत उसतोडणीला जाण्याचा. खेळणं थांबवण्याचा….
ही गोष्ट मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना समजली. त्यांनी लक्ष्मीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. गेल्या मंगळवारी, लोहारातल्या भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी लक्ष्मीचा सत्कार केला आणि तिच्या पुढच्या संपूर्ण खर्चाची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. यावेळी प्रा. सतीश इंगळे, शहाजी मोहिते, हनुमंत कारभारी, प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी लक्ष्मीला पुण्यातल्या किरण मोरे यांच्या अकॅडमीत प्रवेश मिळवून दिला. ”लक्ष्मीनं आता सर्व चिंता सोडून खेळावर लक्ष केंद्रित करावं, आम्ही सर्व तिच्या पाठीशी आहोत”, असं सांगून चव्हाण यांनी आश्वस्त केलं.
परिस्थितीमुळे ध्येय अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या लक्ष्मीला यामुळे मोठा आधार मिळाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
-गिरीश भगत, लोहारा,जि. उस्मानाबाद
Related