विविध विषयांवरील विपुल पुस्तके, सुसज्ज जागा, वाचकांसाठी सोयी-सुविधा हेच केवळ उत्कृष्ट ग्रंथालयाचे लक्षण नसते. वाचन संस्कृतीचा परीघ वाढविणे हेही ग्रंथालयांचे महत्त्वाचे काम असते. त्यासाठी ज्या भागात वाङ्मय सुविधा नाहीत, तिथे त्या उपलब्ध करून देणे ग्रंथालयांचे कर्तव्य ठरते.
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील पांगरी गाव. या गावात वाचनालय नव्हतं. त्यामुळे पांगरीकरांना इतके दिवस वाचनाची आवड जोपसण्यासाठी परभणी शहरावर अवलंबून राहावं लागत होतं. गावकऱ्यांना गावातच ग्रंथालय उपलब्ध व्हावं असं काही तरूणांना वाटत होतं. त्यामुळे 9 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीत पन्नास पुस्तकं आणि एक टेबल इतक्याच साहित्यातून तरुणांनी ‘जन्मभूमी ग्रंथालय’ सुरू केलं.
नुकतंच या ग्रंथालयाने एक वर्ष पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे हे ग्रंथालय कोणत्याही शासकीय अनुदानावर किंवा मदतीवर अवलंबून नाही. गावातील नागरिकांनीच ग्रंथालयाला आजवर एक हजार पुस्तके, दोन संगणक, आठ खुर्च्या, दोन टेबल आणि तीन बुक शेल्फ दिले आहेत. जन्मभूमी ग्रंथालयात आज इंग्रजी कादंबर्या, मराठी साहित्यातील विविध पुस्तके, पर्यावरण, शेती, ग्रामीण साहित्य, आर्थिक आणि कायदेविषयक पुस्तके, महिला व मातांसाठी तसंच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रथम संस्थेने तसंच एकलव्य फाउंडेशनने प्रकाशित केलेली मराठी आणि हिंदीमधील चित्रस्वरूपातील कथा अशी विविध पुस्तके आहेत. जिल्हा परिषद शाळेने एक खोली उपलब्ध करून दिली आणि फक्त सोशल मिडीयावर प्रसारित केलेल्या पोस्टच्या माध्यमातून एवढी मदत ग्रंथालयाला मिळाली.
ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी हे ग्रंथालय म्हणजे पर्वणीच ठरली आहे. गोष्टींची पुस्तकं वाचण्यासाठी मुलांची वाचनालयातली लगबगही वाढली आहे.
– बाळासाहेब काळे, परभणी
Related