ll अधिकाऱ्याचे ऐसे असणे ll आव्हानाचा स्वीकार

भामरागड हा गडचिरोली जिल्ह्यातला छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेला एक छोटा तालुका. जंगली भाग, अंतर्गत रस्ते जवळपास नाहीत, फोन, इंटरनेट, अगदी मूलभूत विजेचीही सोय सगळीकडे नाही. अशा ठिकाणी पुण्यासारख्या शहरात वाढलेली, शिकलेली एक स्त्री गटशिक्षणाधिकारी म्हणून रूजू होते. नवीन जागा, माणसं, वेगळी भाषा, निसर्ग या सगळ्यात ती तिचं वेगळं अस्तित्व दाखवून देते. विशेषतः नुकत्याच आलेल्या कोरोना साथीत देशभरातल्या शाळा बंद असताना अश्विनी यांनी भामरागडच्या मुलांसाठी निराळे प्रयोग केले आणि आणि मुलांना शाळाबाह्य होण्यापासून रोखलं. मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या अश्विनी सोनवणे यांची ही गोष्ट.

अश्विनीचं बीएस्सी, बी.एड, एम.एड. असं शिक्षण, लग्न, नोकरी सगळं पुण्यातच. शिक्षण घेतल्यावर त्यांनी पुणे शिक्षण मंडळ या संस्थेत 10 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलं. शिक्षिका म्हणून नोकरी सुरू असतानाच आपण यापेक्षा वेगळं, अधिक चांगलं काम करू शकतो असं मनात यायचं. वाट सापडली 2006 सालच्या एमपीएससीची परिक्षेतून. अश्विनी सांगतात, “पूर्व आणि मुख्य दोन्हीही परीक्षा मी उत्तीर्ण झाले होते. पण तेव्हा माझी निवड झाली नाही. 2009 ला उपशिक्षणाधिकारी पदाची जाहिरात आली. ती परीक्षा मी उत्तीर्ण झाले आणि 2011 पासून माझं गटशिक्षणाधिकारी म्हणून काम सुरू झालं. खेड-राजगुरूनगर इथं मला पहिलं पोस्टिंग मिळालं. जिल्हा परिषदेच्या 406 शाळा आणि 1500 शिक्षक असा मोठा तालुका होता तो. पहिलं पोस्टिंग 4 वर्षांसाठी होतं. नंतर बदली एससीईआरटीमध्ये झाली. तिथं काम करत असतानाच तेव्हा नंदकुमार सर शिक्षणविभागाचे प्रधानसचिव होते. त्यांना माझं काम, मी माहिती होते. त्यांनी मला एका मिटिंगमध्ये विचारलं की, “अश्विनी, तू गडचिरोलीला कधी गेली आहेस का?” मी नाही म्हणाले. त्यांनी विचारलं, “तू जाशील का? तिथं एका चांगल्या गटशिक्षणाधिकाऱ्याची गरज आहे.” तेव्हा मी म्हणाले, “तुम्ही पाठवत असाल, तर नक्की जाईन.” कारण मी आधी अभय बंग यांचं भाषण ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, ‘जिथे गरज असते, तिथं काम करणं म्हणजे करिअर’. त्यामुळे मला असं वाटलं की संधी मिळालीये तर जायचं. स्वतःला आजमावून बघायचं. मी हो म्हणाले.”

गटशिक्षणाधिकारी म्हणून अश्विनी गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाल्या तो दिवस होता 21 जून 2017. त्या सांगतात, “गडचिरोलीला पोचले. तिथून भामरागड 180 किमीवर. आलापल्लीपासून साधारण 60 किमीवर भामरागड. आलापल्लीपर्यंत थोडी तरी वस्ती होती. तिथून पुढे आजबाजूला पूर्ण जंगल, तुरळक वस्त्या. हे बघून मनात धाकधूक झाली. कारण आपल्याकडे जरा बरी गावं असतात. इथलं चित्रं वेगळंच होतं.”

“भामरागडला पोचले. घर शोधण्यापासून सुरूवात. कॉमन संडास-बाथरूम असलेलं अगदी साधंसं घर होतं. विहिरीवरून पाणी आणावं लागत होतं. इथली माडिया भाषाही वेगळी. भरपूर पाऊस. इथल्या पर्लकोटा या नदीवर एकच पूल. पाऊस सुरू झाला की हा पूल बंद. मग सगळं जग एका बाजूला आणि भामरागड दुसऱ्या बाजूला. तीन महिने कुणाशीही संपर्क नाही. मी इथं आले तेव्हा 3G नेटवर्कही नव्हतं. मी रूजू झाले तो पावसाळाच होता. लाईट नसायची. हे सगळं आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होते. पहिले दोन महिने जुळवून घेण्यातच गेले. पण, ठरवलंय ना आता, मग हे करायचंच असंही मनाशी होतंच.”

तालुक्यातल्या शाळा, शिक्षक या सगळ्याची माहिती घेणं अश्विनीने सुरू केलं. त्या सांगतात, “हळूहळू शाळा फिरू लागले. तिथल्या मुलांची परिस्थिती बघू लागले. शिक्षकांशी बोलू लागले. मग मला जाणवलं की पुण्यापेक्षा जास्त कामाची गरज इथं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी 80 टक्के चांगलं असतंच. त्यात फक्त 20 टक्क्यांची भर घालायची असते. इथं अगदी उलट स्थिती. मुलांसोबत इथं शिक्षकांनाही ‘शाळेत जा’ असं सांगावं लागत होतं. हे वाचून गंमत वाटू शकते. पण हे मी प्रत्यक्षात केलं आहे. आमच्या सगळ्या शाळा जंगलात आहेत. पावसाळ्यात तर अक्षरशः चार ओढे ओलांडून शाळेत जावं लागतं. मुख्य रस्ते आहेत पण आतल्या भागात रस्ता हा प्रकार नाहीच. लाईटही नाहीत. अर्थातच, शिक्षकांसाठीही हे वातावरण फार चांगलं, उभारी देणारं नसतंच. त्यांचं मनोधैर्य वाढवणं, थोडं प्रेमाने, थोडं प्रशासकीय अधिकार वापरून त्यांना शाळेत पाठवणं हेच इथलं मोठं आव्हान होतं.
ll भाग १ ll
– वर्षा जोशी-आठवले

Leave a Reply