कोविडमुळे भारतभर जवळपास सगळीकडे शाळा बंद असताना भामरागड तालुक्यातली मुलं गटागटाने एकत्र येऊन अभ्यास करत आहेत. अश्विनी सोनवणे यांनी अभ्यासगट हा उपक्रम दोन वर्षांपासून शाळेत राबवला होता. त्यामुळे कोरोना काळात हे फारसं जड गेलं नाही. कारण तेव्हा संध्याकाळी गावातली मुलं एकत्र येऊन अभ्यास करायची. काही पालक, शिक्षक अशी जबाबदारी घ्यायचे. त्यामुळे आता शाळा नाही पण अभ्यासगट घ्यायचा हे त्यांनी स्वीकारलं.
अश्विनी सांगतात, “शिक्षकांनी खूप साथ दिली. कोरोना सुरू झाला. आणि कलेक्टरांचं आम्हाला पत्र आलं. शाळेत उपस्थित राहून आपलं काम सुरू ठेवावं. मी मिटिंग घेतली आणि सगळ्यांशी बोलले. जी मुलं गडचिरोलीत राहतात ती ऑनलाईन शिकू शकतात पण आमच्या मुलांकडे इंटरनेट नाही, मोबाईल नाही. नेहमीसारखी शाळा सुरू करणं शक्य नाही. तर अभ्यासगट तयार करू. चारचार विद्यार्थ्यांचे गट केले. मोठ्या मुलांना एकेका गटाची जबाबदारी दिली. कोरोनाकाळातही बालभारतीकडून पहिल्या दिवशी आम्हाला पुस्तकं मिळाली होती. पाठ्यपुस्तकं मिळूनही शिकणं बंद का ठेवायचं? पुस्तकं हे लढायचं अस्त्र आहे, मुलं आहेत, तरी आपण लढायचं नाही का? असं भावनिक आवाहन करत अभ्यासगट सुरू केले.
शाळा व्यवस्थापनसमितीसोबत मिटिंग झाल्या. त्यानुसार गावातच सकाळचे 2 तास अभ्यास सुरू झाला. सुरुवातीला मुलांना फक्त पुस्तकातली चित्रं बघायला सांगितली. नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमा यांनी गुणवत्ताविषयक एक कार्यक्रम घेतला होता. त्यातली वर्कशीट्स होती माझ्याकडे. मुलं अभ्यास विसरली असतील तर चौथीच्या मुलांना सराव म्हणून ती वर्कशीट सोडवायला दिली. सकाळच्या दोन तासांत नवीन कसं शिकावायचं, आधीचा सराव कसा घ्यायचा, हे ठरवलं. दुसरी-तिसरीच्या मुलांचं आता शिक्षकांशी जुळलंय. 1 जुलैपासून असे 67 अभ्यासगट सुरू आहेत. हे गट आपापल्या गावातच बसतात. आणि शिक्षक तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षकांना रोज हजर राहाता आलं नाही तरी गावातला एखादा बारावी झालेला मुलगा अभ्यास घेतो. मुलं शाळेच्या आवारातच येऊन बसतात. त्यामुळे आश्रमशाळेतली जी मुलं येतात ती आणि नेहमीची मुलं सगळीच अशी अभ्यासगटात बसून अभ्यास करतात.
पहिलीची मुलं शिक्षकांशी अजून मोकळी झालेली नसतात. आणि यावर्षी तर ती अजून शाळेतही आलेली नाहीत. म्हणून मग अश्विनीने पहिलीच्या मुलांसाठी उपक्रम घ्यायला सुरुवात केली. डाळ-तांदूळ एकत्र करून मुलांना दिले जातात. ते वेगळे करायला सांगितलं जातं. मातीचे गोळे बनवायला दिले जातात. अशा उपक्रमांच्या त्यांनी याद्या तयार केल्या आहेत. त्यावर चौथीची मुलं लक्ष देतात. बरेचदा ही भावंडं असतात. त्यामुळे काम सोपं होतं. या अभ्यासगटात जवळपास 70 टक्के मुलं नक्की येतात. अश्विनी सांगतात, पहिल्या दिवशी तर मुलं उत्साहात मागच्या वर्षीचाच युनिफॉर्म घालून शाळेतच येऊन बसली होती. त्यांना खरंच इच्छा असते नवं शिकत राहाण्याची. ही सवय मोडायला नको. कारण पालक मग मुलांना शेतात, कामाला घेऊन जाणार. आणि आपण काही केलं नाही तर ती ड्रॉपआऊट व्हायची भीती. हे होऊ द्यायचं नाही, म्हणून मी रोज मुलांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करत राहते. त्यांना धरून ठेवणं आवश्यक आहे. कारण इथं टीव्ही, व्हिडिओ, पुस्तकं, वर्तमानपत्र असं काहीच नाही. पाठ्यपुस्तकं हाच एकमेव आधार आहे शाळेचा. पुस्तकाबाहेरची सगळी जीवनकौशल्यं आहेत इथल्या मुलांकडे. ही मुलं झाडं लावतील, झाडांवर चढतील, स्वयंपाक करतील, धुणं धुतील. यांचा शिक्षणाशी, अभ्यासाशी संपर्क तुटता कामा नये. शिक्षण सोडून इथं मुलांना भुलवणाऱ्या गोष्टी खूप आहेत, नक्षलवाददेखील आहे. हे नको असेल तर शिक्षणच हवं.”
ll समाप्त ll
– वर्षा जोशी-आठवले