(गेल्या आणि चालू वर्षीच्या कोविडताणात लॉकडाउनमध्ये मुलं घरातच कोंडली गेली. त्यांना सांभाळताना पालकांनी जे मार्ग काढले त्याबद्दल…)
लाॅकडाऊन सुरू झालं. आणि मला माझ्या मैत्रिणींचे फोन आले. त्या सांगत होत्या, मुलांना सारखं घरांत राहावं लागत असल्याने त्रास देताहेत. मी मात्र, याबाबतीत सुखी आहे. हे वाचून कुणाचा विश्वास बसायचा नाही. पण, माझी दोन्ही मुलं समंजस आहेत. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात गेलं थोडं अवघड. पण, आता मुलांच्या अंगवळणी पडलं. कोरोना काय आहे? हे मुलांना पहिल्याच लाॅकडाऊनमध्ये कळलं. कारण आम्ही चौघेही बाधित झालो होतो. चौघंही एकाच केअर सेंटरमध्ये होतो. त्यामुळे असेल पण मुलांनी तेव्हा काहीच त्रास दिला नाही. मुलगा दहा वर्षाचा, मुलगी आठ वर्षाची. त्यांचे बाबा पत्रकार असल्याने ते दिवसभर बाहेर. घरात आम्ही तिघंचं. त्यांचा अभ्यास घेण्याबरोबरच खेळण्यात ही मी त्यांच्या सोबत असते. मुलाला बौद्धिक खेळ खेळायला खूप आवडतात. विज्ञान, गणित, इतिहास हे त्याच्या आवडीचे विषय.
शिवरायांचा इतिहास त्याने तोंडपाठ केला. लाॅकडाऊन कधी संपतो आणि मी, गडकिल्ले पाहायला जातो, असं आता झालंय त्याला. मोबाईल हातात पडताच तो रेल्वे अॅपवर कोणती रेल्वे कुठं जाते, याशिवाय गडकिल्ले, मॅपवर गावं, शहरं शोधत असतो. तो खूप जिज्ञासू आणि खवय्या आहे. टीव्हीवर सुद्धा त्याचे ठरलेले कार्यक्रम असतात. क्रिकेटचं प्रचंड वेड. शिवाय बातम्या तितक्याच चवीनं पहातो. कोरोना, राजकीय, क्रीडा विषयक बातम्या बघून, बाबा घरी आल्यावर त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करणं हे नेहमीचच. त्याला कागदाच्या वस्तू तयार करायला, चित्र काढायला खूप आवडतं. या लाॅकडाऊनमध्ये तो लिंबू सरबत करायला शिकला. अगदी त्याच्या विरुद्ध मुलगी आहे. बौद्धिक ताण न घेता सरळ पद्धतीने होणा-या गोष्टी तिला आवडतात. भातुकलीचा खेळ तिचा आवडता. तिने केलेल्या लुटुपुटूच्या पोळ्या आवडीने दादाला खायला देते. यावेळी दोघांचं छान जमतं. ती, त्याला भाजी आणायला बाजारात पाठवते. वर महाग आणली म्हणून रागवते. त्याच्या पेक्षा लहान असून मोठी बहीण असल्याचा तोरा मिरवते. तिला वेणीत फुलं माळायला आवडतात. ती या लाॅकडाऊनमध्ये फुलांच्या माळा करायला शिकली. आमचं कोणाचं लक्ष नसलं की वेगवेगळ्या हेअर स्टाईल करते. आरशासमोर उभी राहून विविध हावभाव करून स्पृहा जोशी यांच्या सूत्रसंचलनाची नक्कल करते. माझाही वेळ मुलांच्या आवडीचे पदार्थ करण्यात आणि त्यांच्या सोबत खेळण्यात जातो. घरातील छोट्या कामात मदत करतात.
या सगळ्या काळात खरं तर, मुलांकडून मला शिकायला मिळतं आहे. माझंही सध्या शिक्षण सुरू आहे. त्यांचा अभ्यास घेताना ‘आई तुला ही होमर्वक असेल ना?, आमच्यासोबत कर’, म्हणून मुलं आग्रह धरतात. मी पुस्तक घेऊन बसले की न सांगताच तीही अभ्यासाला बसतात. मी जेवढ्या वेळ बसेन तितकाच वेळ ते दोघंही बसतात. मी घरी असल्याने मुलांना भरपूर वेळ देऊ शकते. त्यामुळे ते कंटाळत नाहीत.
टीव्हीवरील मालिकांदरम्यान, दिलेला स्वच्छतेचा संदेश त्यांच्या नीट लक्षात असतो. घरात असताना अर्ध्या तासाला हात धुतात. न चुकता रोज बाहेर खेळताना मास्क घालतात. त्यांच्या या सवयीचं अनुकरण करण्याची वेळ मोठ्यांवर आली आहे. एकाला दोघं असल्याने लाॅकडाऊनचा काळ अवघड जात नाही.
– देवता शरद काटकर, नांदेड