ll कोंडलेली मुलं, चाचपडणारे पालक ll आहे त्यात आनंद शोधणार्‍या माझ्या लेकी

 

(गेल्या आणि चालू वर्षीच्या कोविडताणात लॉकडाउनमध्ये मुलं घरातच कोंडली गेली. त्यांना सांभाळताना पालकांनी जे मार्ग काढले त्याबद्दल…)

 

15 दिवसांपूर्वी मोठी मुलगी सांगत होती, “आई, दियाच्या आईनं तिला 2 दिवस आयपॅड घ्यायचा नाही हातात असं सांगितलं आहे. तू आम्हाला असं काही सांगत नाहीस. ते बरंय.” मी तिला म्हटलं, “चांगली आयडिया दिलीस की. आता उद्या तुम्ही करा असं. आयपॅड, किंडल, मोबाईल, टीव्ही असं काहीच बघू नका.” असं म्हटल्या म्हटल्या, “नाही हां असं आम्ही ऐकणार.” मग म्हटलं, “अगं, तुम्ही दोघीच नाही तर आपण सगळेच नो स्क्रीन चॅलेंज करू.” यासाठी 25 एप्रिलचा रविवार निवडला. खरं तर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या नवी उमेदचा 5 व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे असं चॅलेंज घेणं माझ्यासाठी कठीण होतं. फोनवर काही बघायचं नाही. पण फोन वाजला तर, उचलायचा असं ठरलं. हे चॅलेंज अगदी यशस्वी झालं आणि लेकीला तेव्हा जाणवलं की ही उपकरणं नसली, तरी फार बिघडत नाही.
एरवीही मुलांनी या गोष्टी हातात घेण्यापेक्षा खेळलेलं बरं, असं आम्हा दोघांनाही वाटतं. शिवाय मुलांना खेळायला त्यांच्याच वयाची मुलं हवीत आणि त्यांना घरात फार अडकवून ठेवण्यात अर्थ नाही हेही जाणवतं. त्यामुळेच मागचं वर्ष आणि हेही वर्ष दोघी मुली दिवसभर घरातच राहिल्या, असं झालं नाही. आमच्या सोसायटीत 25-30 लहान-मोठी मुलं, वयानुसार त्यांचे ग्रुपही आहेत. इथे कुणीच मुलांच्या खेळण्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे सगळी मुलं संध्याकाळी सोसायटीच्या आवारात खेळली. मोठ्या ग्रुपमध्ये खेळायचं नाही, खेळताना मास्क लावायचा, 3 ते 4 जणांनीच एकत्र खेळायचं या सूचना होत्याच.
कोविडची भीती सुरवातीच्या काळात मुलींना नव्हती. कोविडमध्ये काय होतं तर सर्दी, खोकला, ताप. हे ऐकल्यावर धाकटी म्हणाली, मग त्यात काय? वाटेल की बरं. नंतर 14 दिवस एकटं राहायला लागतं, हे सांगितल्यावर जरा घाबरली. लॉकडाऊन उघडल्यावर नवऱ्याचं आणि माझं ऑफिस सुरू झालं. आता आम्ही दोघेही बाहेरच्या अनेकांच्या संपर्कात येणार होतो. आणि म्हणून, दोघींना सांगितलं की, आपल्यापैकी कुणाला कोरोना झाला तर 14 दिवस एका खोलीत किंवा हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. हे ऐकल्यावर मात्र धाकटीने मोठं भोकाड पसरलं.


घरात रोज पेपरवाचन असतं, नवी उमेदवर येणाऱ्या मदतीच्या पोस्ट्स हे सगळं मी नवऱ्याला सांगत असते, ते मुली ऐकत असायच्या. त्यांनी ते समजून घेतल्याचं लक्षात आलं, जेव्हा
नवरा कोविड पॉझिटिव्ह आला. तो घरीच आयसोलेट होता. धाकट्या मुलीला तिच्या बाबाची बरीच सवय आहे. बाबा समोर दिसत असून त्याच्या जवळ जाता येत नाही, हे तिच्यासाठी खूप अवघड होतं. त्यामुळे रोज रडारड, कुरकुर, चिडचिड हे घडत होतं. त्याच्या खोलीबाहेर थोडया अंतरावर खुर्ची ठेऊन दिली. तिथं बसून ती बाबाशी गप्पा मारायला लागली. बाबा कधी बाहेर येणार हे विचारून तिनं लक्षात ठेवलं. आणि काऊंटडाऊन सुरू केलं.
मुलींना आमच्या गप्पांतून, बोलण्यातूनच कोविड आणि बाहेर काय सुरुये, ते कळतंय. त्यामुळे उद्या कसं, काय होणार, कोविड संपणार की नाही असं आम्ही बोललो की मोठी म्हणते, किती निगेटीव्ह विचार करता, बोलता तुम्ही. थोडं पॉझिटिव्ह बोला म्हणजे तसं घडेल!


पहिल्या लाटेत बर्‍याच पालकांनी मुलांना उंबऱ्याच्या बाहेरही जाऊ दिलं नाही. मुलांची इतकी कोंडी की काही मुलं वस्तूंशी मित्र समजून बोलायला लागली. चिडचिड वाढली. आमच्या भागातल्या करिश्माचं सतत घरात राहून हालचाल बंद झाल्यामुळे जेवण कमी झालं. अन्वयला अपचनाचा आजार झाला. हे सगळं बघून नंतर सर्वच मुलांची काळजी वाटू लागली.
आम्ही, तेव्हा आणि आताच्या लाटेत काही पथ्यं पाळली. दिवसभरात दुपारी फक्त एक तास टीव्ही बघायला मुलींना मुभा होती. सतत टीव्ही बघूनच मुलं विचित्र वागायला लागतात. त्यांना इतर काही सुचणं बंद होतं, असं मला वाटतं. एरवी, रात्री त्यांच्या बाबाने टीव्ही लावला तर त्याच्यासोबत त्या थोडा वेळ बघू शकतातच. मुलींची झोपायची वेळ फार बदलू दिली नाही. रात्री 10 फार तर 10.30 ला झोपायला जायचंच हा नियम. किमान मी आणि मुली तो पाळतोच. सकाळी लवकर उठलं पाहिजे, हा आग्रह मात्र सध्या मी करत नाही. लवकर उठून सायकल चालवायला जा, हे मात्र अधूनमधून सांगत असते. मी सकाळी चालायला जाते तेव्हा कधीतरी मोठीही येतेच सायकल घेऊन.
आमच्या दोघांच्याही कामाच्या वेळा बघता मुलींसोबत सारखं खेळणं शक्य नसतं. पण कधीतरी धाकटीला घेऊन तिचा बाबा कुठलंतरी यंत्र तयार करतो. ऑक्सिमीटर करताना त्यानं तिला मदतीला घेतलं. नंतर टूथब्रशपासून छोटा फिरणारा किडा त्यांनी तयार केला. असं काहीतरी त्यांचं त्यांचं चालतं. कधीतरी पत्ते, कॅरम असेही आमचे खेळ या काळात सतत सुरू राहिले.
आपण त्यांना गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यांनी त्यांचं त्यांचं काहीतरी केलेलं बरं. म्हणून मी शक्यतो फार सांगायला, शिकवायला जात नाही. पण त्यामुळे बरेचदा मोठी लेक दिवसभर हातात किंडल घेऊन वाचत बसते. अशावेळी तिला, जरा धाकट्या बहिणीशी खेळ, हे मात्र सांगावं लागतं. काही वेळा असं वाटतं की, एकीला दोघी आहेत, हे चांगलंच आहे. खेळल्या नाहीत, तरी भांडणात तरी वेळ जातो. जिथं एकुलती एक मुलं आणि आईवडील दोघंही कामात, तिथं काय करत असतील?
धाकटीला स्वयंपाकघरातली कामं म्हणजे, भांडी लावणं, वस्तू जागेवर ठेवणं असलं काही आवडत नाही. तिला खऱ्याखुऱ्या स्वयंपाकात, पदार्थ तयार करण्यात रस असतो. त्यामुळे ती काही शोध लावून नवाच पदार्थ करून आम्हाला खिलवते. पोळीवर टोमॅटो सॉस, वरण, साखर, चिरलेला कांदा, कुठली असेल ती चटणी असं सगळं घालून ती रोल बनवते आणि सुरीने नीट कापून आम्हाला देते. मोठीला आता कुकिंगमध्ये जरा रस निर्माण झालाय. त्यामुळे आहे त्या सामानात केक बनवणं, कधीतरी भाजी करणं, भाजी चिरून देणं हे ती करते. नातेवाईक भेटणं बंद झालंय. कुठं बाहेर जावंसं वाटलं तरी, ते शक्य नाहीये, हे मुलींना जाणवत असतंच. तरीही, त्या आपापल्या परीने परिस्थितीशी जुळवून घेत असतात. आहे, त्यात आनंद शोधत असतात. पालक म्हणून, मीही त्यांच्याकडे बघून हेच शिकतेय सध्या.

– वर्षा जोशी-आठवले, संपादक-समन्वयक, नवी उमेद

Leave a Reply