ll कोंडलेली मुलं, चाचपडणारे पालक ll तिने स्वतःचं असं जग निर्माण केलं आहे

 

 

लॉकडाऊन लागून दीड वर्ष होऊन गेलं. माझी धाकटी मुलगी आता दुसरीत आहे, तर मोठ्या मुलाची गेल्या वर्षी दहावी झाली. झाली म्हणजे शैक्षणिक वर्ष पार पडलं. आता त्याची परीक्षा होणार नाही अशी घोषणा जरी झाली असली तरी निकाल न लागल्यामुळे सगळं अर्धवट झालं आहे. ही झाली गेल्या महिन्या दोन महिन्यामधील गोष्ट. त्याआधी तो दिवसभर ऑनलाईन शाळा करायचा आणि शिवाय शिकवणी पण लावली होती. त्याशिवाय तो दिवसभर संगणकावर काही बाही करत असे, म्हणजे गाणी ऐकणे, मित्रांशी गप्पा आणि यु ट्यूब व्हिडियोज बघणे. माझ्यासाठी ती खूप चिंतेची गोष्ट होती. त्याचं म्हणणं शाळा आणि शिकवणी जशी गरजेची तसे माझे इतर उद्योग सुध्दा. दिवसेंदिवस संगणकासमोर बसून त्याचे डोळे तारवटायचे. मी खरं सांगू, खूप काळजी वाटायची. त्यामुळे त्याचं वर्ष संपलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
डोळे तारवटून संगणकासमोर बसणारा मुलगा आता प्रत्यक्षात भेटू लागला. पण आता क्लास चालक त्याच्या आणि आमच्या मागे लागले, आमच्याकडे शिकवणी लावा आणि मुलाला चांगले करियर
मिळवून द्या. आता आली का पंचाईत. म्हणजे पुन्हा तासनतास संगणकासमोर बसा. परिक्षेचा पत्ता नाही. निकालाचा पत्ता नाही, कॉलेज ॲडमिशनचे निकष माहित नाहीत आणि बारावीनंतरच्या प्रवेश परिक्षेची तयारी करुयात हे काही पचनी पडत नाहीए.


ट्युशन क्लासेस घेणा-यांची अगतिकता कळत होती, पण निस्सीमला त्याने काही फायदा होईल की नाही हे काही कळत नव्हते. मग शेवटी खूप विचार करुन आयबी अभ्यासक्रमाच्या शाळेत प्रवेश घ्यायचं ठरवलं. त्याला या शाळेत प्रवेश मिळाला तर गणित, इंग्रजी शिवाय एक परकीय भाषा, विज्ञान आणि कला शाखेतील विषय शिकता येणार आहेत. शिवाय बारावीचा डिप्लोमा पूर्ण
करण्यासाठी त्याला एक शोध निबंध लिहावा लागणार आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई अभ्यासक्रमाचे असल्याने हा अभ्यासक्रम निवडणं फार अवघड होणार नाही, पण याचा अभ्यास आव्हानात्मक नक्कीच आहे. वेगळं शिकता यावं म्हणून ही वेगळी वाट निवडली आहे. पण ही सोपी नाही, याची जाणीव निस्सीमला करुन दिली आहे, पण सध्या तरी तो उत्साहात आहे.

त्याने आणि मुलीने घरकामात मदत करणं अपेक्षित आहे, ती ते करतात, अनेकदा भांडतात, गप्पा मारतात किंवा आपापल्या दुनियेत असतात. शरयू शाळेत फारसा रस घेत नाही. तिचं लक्ष शिक्षिकेशी संवाद कसा साधता येईल याकडेच असते. मीही फार मागे लागत नाही. एकीकडे शाळा सुरू असते आणि ही जमिनीवर लोळत असते. किंवा मला काही तरी येऊन सांगत असते. मी सारखी तिच्या शेजारी जाऊन बसत नाही, कारण मला तिची सहशिक्षका होणं मंजूर नाही. सतत ऑनलाईन शाळेमुळे ती मधेच तिरळे बघायला लागली आहे. परिस्थिती सुधारली की तिच्या डोळ्यांची तपासणी करायची आहे. सध्या शाळा बंद आहे म्हणून ती तासभर ऑनलाईन क्राफ्ट क्लास करते. यात अनेक मुलंमुली असतात आणि ती रोज काही ना काही वस्तू बनवतात किंवा चित्रं काढतात. हे तिला फार आवडतं. क्लास नसला तरी ती तासनतास चित्रं रेखाटते.
शरयूला माणसं लागतात. मी जिथं राहते तिथं तिच्या दोन मैत्रिणी आणि ती भेटतात. ती कुटुंबं आणि आम्ही घराबाहेर पडत नाही. त्यामुळे तो एक बायोबबल आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या तिघींपैकी एकीला कोविड होऊन गेला आहे. या तिघी मुली एकीच्या घरी रोज संध्याकाळी दोन तास भेटतात. पण शरयू गेले दोन महिने खाली बागेत खेळायला किंवा सायकल चालवायला गेली नाही. त्या आधी ती रोज सकाळी इमारतीला फे-या मारत असे. पण दुसरी लाट सुरू झाल्यापासून ते बंद झालं आहे. आमच्या इमारतीला लागून एक इमारत आहे. तिथं समोरच्या खिडकीत एक मुलगी येते. या दोघींची खिडकीत ओळख झाली आहे. त्या दोघी आपापल्या खिडक्यांत उभ्या राहून जोरजोरात गप्पा मारतात. सगळ्या इमारतीला ऐकू जाईल अशा आवाजात. पण हीच तर लहानपणाची गंमत आहे. जे मनात येतं ते ती करु शकते. जर घराबाहेर पडून बाहेरच्या जगाची संपर्क करता येत नाही, तर तिने स्वतःचं असं जग निर्माण केलं आहे.

– भक्ती चपळगावकर

Leave a Reply