ll कोंडलेली मुलं, चाचपडणारे पालक ll मुलींच्या सहवासाची ऊब

(गेल्या आणि चालू वर्षीच्या कोविडताणात लॉकडाउनमध्ये मुलं घरातच कोंडली गेली. त्यांना सांभाळताना पालकांनी जे मार्ग काढले त्याबद्दल…)

मार्च २०२० ते मे २०२१ हा सव्वा वर्षाचा काळ आपल्या सगळ्यांचीच अनेक अर्थानी परीक्षा बघणारा होता, आणि यापुढेही असणार आहे. हा सगळा कसोटीचा काळ आपण कसा निभावून नेला याचा विचार केल्यानंतर एकच उत्तर मला सापडतं ते म्हणजे माझ्या साडेतीन वर्षे वयाच्या जुळ्या मुली ऊर्जा-नभा. करोनाच्या संकटात सगळं जग कसं भरडलं जातंय, आपलं भविष्य किती अनिश्चित आहे अशा प्रश्नांचा मागमूसही नसणाऱ्या निरागस मुलांचं पालकत्व निभावताना आपण स्वतःच किती शिकलो, किती बदललो हे मला अगदी प्रकर्षानं जाणवतं. या संकटाने अनेकजणांच्या जगण्यात आर्थिक, कौटुंबिक, भावनिक पातळीवर किती गंभीर प्रश्न निर्माण केले हे पाहता मी आणि माझे कुटुंबीय निश्चितच सुदैवी आहोत याची मला सतत जाणीव होती. मुलींच्या बाजूने विचार केला तर करोना म्हणजे एक मोठा बाऊ आहे, तो संपेपर्यंत आपण फार गर्दीत जायचं नाही एवढाच अर्थ त्यांच्यासाठी पुरेसा होता. संध्याकाळी बागेत, देवळात, तळ्याकाठी फिरणं बंद होणं हा त्यांच्या आयुष्यात झालेला एकमेव मोठा बदल होता. मी सध्या पूर्णवेळ आई असल्यानं आणि त्यांचा बाबा एरवीदेखील घरातूनच काम करत असल्यानं इतर गोष्टी फारशा बदलल्या नाहीत, उलट लॉकडाऊनचे पहिले दोन महिने त्यांची आजी म्हणजे माझी आई चिपळूणलाच अडकली असल्यानं त्या दोघी आणि पर्यायानं मीही खूषच होते. पहिल्या लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू शिथिल होत गेले तसं मोकळ्या, गर्दी नसलेल्या जागी फिरणंही सुरु झालं होत. ऑक्टोबरनंतर मार्चपर्यंत सगळी परिस्थिती जवळपास पूर्ववत झाल्यासारखं वाटत होतं. जून २०२१ पासून त्या दोघी पूर्वप्राथमिक वर्गात जाणार असे गृहीत धरून त्यांचा शाळेत प्रवेशही झाला होता. परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आणि काही दिवसातच गेल्या वर्षीची पुनरावृत्ती सुरु झाली. एका वर्षात या दोघींच्या बौद्धिक, भावनिक गरजा झपाट्याने बदलत गेल्याचं आम्ही अनुभवत होतो. त्यांना आता समवयस्क मुलांशी खेळणं, शाळेतील ‘बाई’ या भूमिकेतील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सहवास, नवी खेळणी, नवं काही शिकणं यांची खूप गरज आहे हे जाणवत होतं. नेमक्या याच काळात लॉकडाऊनने सगळंच बदलून टाकलं. या बदललेल्या परिस्थितीत त्यांना कंटाळा न येऊ देता त्यांच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक गरजा कशा पूर्ण करायच्या हे आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं आणि इथून पुढेही असणार आहे.


अंघोळ आणि पाण्यात खेळणं याचं दोघींनाही भयंकर वेड आहे. रोज अंघोळ करताना एक नवा खेळ, उदा. भातुकलीची भांडी घासणं, स्वतःचे छोटे कपडे धुणं, बाथरूमच्या फारश्या, स्टूल धुणं यात त्या खूप रमतात. बाहुल्यांशी खेळणं सगळ्याच मुलांना आवडतं, या एकीला दोघी असल्यानं दोन बाहुल्या आणि दोन आया किंवा आईबाबा अशी वेगवेगळी कॉंबिनेशन्स आणि त्यांच्या काल्पनिक विश्वातल्या गप्पा यात पुष्कळ वेळ जातो. या खेळात अधूनमधून मास्क न लावल्याने दंड करणारे पोलिसही असतात. सगळ्या खेळण्यांना सॅनिटाईझ करण्याचाही उद्योग सुरु असतो. त्यांची खेळणी, वस्तू यांच्याइतकाच घरातल्या, विशेषतः स्वयंपाकघरातल्या वस्तूंमध्ये मुलांना जाम रस असतो आणि तिथं मोकळेपणाने वावरणारी मुलं खूप खुश असतात असं मला अनुभवांती लक्षात आलं. ताक घुसळणे, बटाटे सोलणे, खेळातल्या सुरीने आवडीची फळे चिरणे, कणकेच्या गोळ्याचे आकार करणे, तांदूळ, डाळ अशा गोष्टींची ओतासात करणं, डबे उघडणं, वाट्या-चमचे हाताळणं अशा अनेक गोष्टी नभा-ऊर्जा आनंदाने करतात. पुस्तकं वाचून दाखव अशी मागणी वारंवार होत असल्याने मला मनोमन आनंद होतो. जुने अल्बम्स ही त्यांची आणखी एक आवडती गोष्ट आहे. अतिशय बारकाईने सर्व फोटोंचं निरीक्षण करणं, त्याबाबत प्रश्न विचारणं, त्यासोबतच्या गोष्टी ऐकणं यात आमचा खूप वेळ जातो आणि त्यांच्यासोबत आम्हालाही जुन्या आठवणी ताज्या होण्याचा आनंद मिळतो. गाणी पाहणं, चित्रं रंगवणं, कोडी सोडवणं अशा गोष्टींसाठी मोबाईल/लॅपटॉपचा मर्यादित वापर आणि कंटाळा आला की थोडावेळ टीव्हीवरची कार्टून्स यापलीकडे दोघींनाही कोणत्याच स्क्रीनचं वेड लागलेलं नाही याचा मला खूप आनंद वाटतो. मोकळ्या हवेत खेळण्यावर मर्यादा असल्या तरी अधूनमधून जवळपास चक्कर मारणं होतंच. परिसरात दिसणाऱ्या कुत्र्यांपासून गोगलगायीपर्यंत सर्व जीवजंतूंशी त्यांची उत्तम मैत्री आहे. लिंबाच्या झाडावरच्या फुलपाखराच्या अळ्या, त्यांचे कोष आणि त्यातून बाहेर आलेली लाईम नावाची फुलपाखरं हा सगळा प्रवास दोघीनी जवळून पाहिला, त्यातला रोमांच अनुभवला याचं मला खूप समाधान वाटतं.
आपण जे काही करतो आहे त्याची चाचपणी या उद्देशाने पूर्वप्राथमिक वर्गांचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्यातल्या बहुतेक गोष्टी दोघींना येतात असं लक्षात आलं. नभा आणि ऊर्जा किती आणि काय शिकल्या, त्यांना त्यांच्या वयात अपेक्षित असलेली कौशल्यं आत्मसात झाली की नाही यापेक्षा त्या दोघी निरोगी, समाधानी, आनंदी आहेत हे मला सध्याच्या घडीला जास्त महत्वाचं वाटतं. औपचारिक शिक्षण त्यांना आज ना उद्या घ्यायचंच आहे, परंतु करोनाच्या सावटाखाली गेलेला काळ नकारात्मक भावना दूर ठेवून घालवता आला हे दिलासादायक आहे. त्यांचा सहवास ही माझ्यासाठी भावनिक सुरक्षितेतची अनुभूती आहे आणि पुढची अनेक वर्षं मला याची ऊब मिळत राहील असं माझ्यातल्या आईला वाटतं.

– ऋजुता खरे

Leave a Reply