(गेल्या आणि चालू वर्षीच्या कोविडताणात लॉकडाउनमध्ये मुलं घरातच कोंडली गेली. त्यांना सांभाळताना पालकांनी जे मार्ग काढले त्याबद्दल…)
माझी मुलगी सृष्टी ही ९ वर्षाची, तिला चित्रं काढायला आणि क्राफ्ट तयार करायला खूप आवडतं. ऑनलाईन शाळेला सुटटया जाहीर झाल्या आणि सृष्टीची दैनंदिन घडीच विस्कटली. सकाळी ६ वाजता शाळेसाठी तयार राहणाऱ्या सृष्टीची आताशा १० वाजता सकाळ होत असल्याने मी काळजीत होतो. खूप विचार केला आणि मला एक कल्पना सुचली. मी तिला रोज एक नवा पदार्थ तयार करायला सांगितलं. तिलाही कल्पना आवडली आणि तिनं ते सुरू केलं. अर्थात हा पदार्थ खाता येत नाही कारण तो कागदाचा असतो.
आमच्या बुलढाण्यातली कोविड रुग्णांची संख्या ही ९ हजारच्या पुढे गेली होती. त्यात शेजारी राहणा-या एका आजींचं नुकतंच कोविडमुळे निधन झालं. त्याचा धसका मोठ्यांसह लहानांनी देखील घेतला. त्यामुळे एरवी गल्लीत सायंकाळी खेळणारी मुलंदेखील आता गायब झाली आहेत. अभ्यास नाही, क्लास नाही, मित्र मैत्रिणी नाहीत. त्यामुळे साहजिकच सृष्टीची मोबाईल, टी.व्ही. पाहण्याचा वेळ वाढला. रात्री उशिरापर्यंत जागरण आणि सकाळी उशीरा उठणं, दुपार पासून रात्रीपर्यंत टि.व्ही पाहण्याचा तिचा प्रवास सुरु झाला. टी. व्ही. पाहू दिला नाही तर तिची होणारी चिडचिड समजून घेतांना एक लक्षात आलं की तिला कुठंतरी गुंतवून ठेवायला हवं. म्हणजे तिचा वेळही जाईल आणि तिला काही तरी शिकायला मिळेल. तिची आवडच तिला असं गुंतवून ठेवण्यास उपयोगी ठरली.
मी तिला सुचवलं, “सृष्टी तू आजीला स्वयंपाकात मदत का करीत नाही?” त्यावर ती म्हणाली. “आजी मला काहीच करू देत नाही.” हे ऐकल्यावर मी घर सगळ्यांनाच सांगितलं की तिला जे वाटेल ते बनवू दया आणि तिला मदत करा. तिला सुचवलं तू मोबाईलवर गेम खेळते ते बंद कर आणि युट्यूबवर शोधून मला रोज एक वेगळा पदार्थ खायला बनवून दे, त्यासाठी लागणारं सामान मी आणून देईल. याचा कंटाळा आता तर मला क्राफ्टचा तो मेनू बनवून दाखवायचा. यासाठी मी तिला भरपूर कागद, स्टेपलर, फेविकॉल, स्केच पेन, आणि इतर साहित्य आणून दिलं.
झालं, दुस-या दिवशी तिने बिस्कीटचा केक शोधला आणि साहित्य मागवलं. ते सर्व साहित्य घरातच उपलब्ध होतं ते तिला दिलं. मग काय, सगळा दिवस गेला तो केक बनवण्यात. सायंकाळी माझा समोर केक आला तो फार फुगला नव्हता, पण सृष्टी अशी कशाततरी बिझी झाल्याचं पाहून मला बरं वाटलं. दोन चार दिवसांनी ती याला कंटाळली हे मी गृहित धरलंच होतं. क्राफ्टच्या वस्तू करायला आवडत असल्यामुळे तिने मला क्राफ्टच्या फ्रेंच फ्राईज तयार करून दिल्या. या सगळ्यात खरोखर मजा येते. आताशा ती रोज कोणता ना कोणता पदार्थ शोधत असते. जो तिला शक्य आहे तो करते आणि मला संध्याकाळी वाढून देते. यात तिचा वेळ ही जातो आणि दिवसभर ती व्यस्त ही राहते.
– दिनेश मुडे, बुलढाणा