ll कोरोनातल्या लग्नाची गोष्ट llथाटमाट नको; मुलीचे पालकही अडचणीत नको

 

 

यवतमाळचा अयाज खान अयुब खान पठाण. अयाजला तीन बहिणी. त्यांच्या लग्नाच्या वेळी वडिलांची झालेली आर्थिक घुसमट अयाजने जवळून पाहिली होती. सामान्यपणे मुलाच्या लग्नात सगळा खर्च ‘दहेज’ च्या रूपे भरून काढण्याचा पालकांचा रिवाज. आम्ही आमच्या मुलींच्या लग्नात सगळे सोपस्कार केले. मुलाच्या लग्नात मुलीच्या पालकांनी करावे अशी इच्छा असते. पण अयाजला हे नाकबूल होतं. अत्यावश्यक तेवढाच खर्च करायचा. मुलीच्या पालकांची आर्थिक नाकेबंदी होऊ द्यायची नाही असं अयाजने आधीच ठरवलं होतं. त्याच्या या निर्णयामागे प्रेरणा आहे ती प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांच्या शिकवणीची. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘लग्नात अवाढ्यव खर्च टाळून साधेपणाने लग्न साजरं करावं’. अयाजने याचं तंतोतंत पालन केलं.


थाटामाटात लग्न न करता साधेपणाने, मोजक्या लोकांच्या हजेरीत त्याने लग्न करायचा निर्णय वडील आणि मामांना सांगितला. लग्नात मुलीच्या परिवाराचा आर्थिक कणा कसा कोसळतो हे अनुभवल्यामुळे त्याचे वडिलही तयार झाले. मुलाकडच्या लोकांची, नवरदेवाची मागणी पूर्ण करता करता काय अवस्था होते हे अयाजच्या वडिलांनी अनुभवलं होतंच. त्यामुळेच मुलाच्या लग्नात आपण मात्र मुलीच्या पालकांची आर्थिक परवड होऊ देणार नाही हे अयाजचे वडील अयुब खान यांनीही ठरवलं. यासाठी परिवारातून थोडा विरोध झाला पण बाप लेकाच्या ठाम निर्णयामुळे सगळे कबूल झाले. आणि ९ जून २०२० ला अत्यंत साधेपणाने हा विवाह पार पडला. अयाजने लग्नानंतर, लग्नाचा खर्च पार्डी नस्कारी, ता. आर्णी जि यवतमाळ या खेडेगावातील एका लहानशा वृद्धाश्रमाला आर्थिक मदतीच्या स्वरूपात केला.
अयाजचा परिवार आधीपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला परिवार आहे. हाच सामाजिक सेवेचा वारसा अयाज पुढे नेतो आहे. अयाज काही वर्षांपूर्वी MJP (Moment for Peace & Justis for Welfare) या चळवळीशी जोडला गेला आहे. त्याने कोविड १९ च्या लॉकडाऊनच्या काळात समाज बांधवांसाठी उत्तम कार्य केले आहे. आजच्या नव तरुणांनीही आपआपल्या लग्नाचा अवास्तव खर्च टाळून मुलीच्या पालकांना आर्थिक अडचणीत पडू देऊ नये असं आवाहन तो करतो. त्या दृष्टीने तो कामही करणार असल्याचं सांगतो.
अयाज खान अय्युब खान पठाण (यवतमाळ)- 8888003834

– निखिल परोपटे, यवतमाळ

Leave a Reply