सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा. इथले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धर्माजी साने. साने मूळचे टाळगाव चिखलीचे. त्यांचा विवाह ठरला तो जुन्नर तालुक्यातील आर्वी येथील विलास गाढवे यांच्या कन्येशी, स्नेहलशी. तारीख ठरली होती 27 मे आणि ठिकाण होतं पिंपरी-चिंचवड.
विवाह थाटामाटात करायचा हे दोन्ही कुटुंबांनी ठरवलं होतं. पण, तेव्हा लॉकडाऊन सुरू होतंच. आणि कोरोना साथीची भीतीही. हे सगळं जाणवूनच या दोन्ही कुटुंबांनी हा विवाह अत्यंत साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने करायचा निर्णय घेतला. कुठलाही बडेजाव न करता आर्वी गावी अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शारीरक आंतराचा नियम पाळून हा विवाह पार पाडला. वधूवरासह सर्वांनी तोंडाला मास्क बांधला आणि एकमेकांना भेट म्हणूनही मास्क व सॅनिटायझर भेट दिले. लग्नात वाचलेला खर्च टाळून त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता मदतनिधीला पैसे द्यायचे ठरवलं. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे त्यांनी एक लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.
विशेष म्हणजे प्रवीण यांनी करमाळ्यात 45 दिवस लॉकडाऊनची सेवा बजावली आणि त्यानंतरच ते विवाहाला उभे राहिले. प्रवीण म्हणतात, “कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांसाठी सरकार आपल्या परीने मदत करत आहे. या मदतीत आपलाही वाटा असावा असं वाटत होतं. म्हणून आम्ही एक लाख रुपयांची मदत केली.”
– अमोल सीताफळे, सोलापूर