नवी मुंबईतला गणेश शिंदे. सातारा जिल्ह्यातलं जावळी त्याचं मूळ गाव. गणेशचं लग्न ठरलं आणि सगळं घर आनंदी झालं. घरात बऱ्याच वर्षांनी कार्य होणार तर ते थाटामाटात व्हायला हवं, असा आग्रहही घरातून सुरू झाला. खरं तर कर्ज काढून लग्न करायचं आणि ते आयुष्यभर फेडत राहायचं, हा विचारच गणेशला नकोसा वाटत होता. लग्न साधं, अगदी रजिस्टर पद्धतीने व्हावं अशी त्याची इच्छा. पण, घरातल्यांच्या दबावापायी त्यानेही कर्ज घ्यायचं आणि थाटामाटात लग्न करायचं ठरवलं. एकीकडे, मुंबईत घरासाठी घेतलेलं कर्ज आणि आता लग्नासाठीचं कर्ज, दुहेरी ताण. तरीही, घरातल्यांना विरोध करता येतच नव्हता.
अशातच कोरोना आला. लॉकडाऊन सुरू झालं. आणि इतरांना दुःख देणारा कोरोना गणेशच्या आयुष्यात सुखाची चाहूल घेऊन आला. लॉकडाऊनचा फायदा घेऊन त्याने साध्या पद्धतीने रजिस्टर लग्न करायचं ठरवलं. जावळी तालुक्यातील कोळघर गावात गणेश आणि नलिनीचं लग्न लागलं. घरातील केवळ 20 मंडळी, इतकाच गोतावळा लग्नात होता. सगळे विधी होऊनही फक्त २० हजारांमध्ये लग्न लागलं. सर्व विधी झाल्यामुळे गणेशचे पालक खुश झालेच; शिवाय पैसे वाचल्यामुळे गणेशसोबत त्याची पत्नीही खुश.
कमी पैशातही आनंदाने लग्न करता येतं, प्रतिष्ठा जपण्यासाठी थाटामाटात लग्न करू नका. तसंच लग्नात होणारा खर्च पुढच्या भविष्याची तरतूद म्हणून ठेवण्यात आनंद आहे, असं गणेश सांगतो.
कोरोनातल्या लग्नाची अशीच एखादी आगळीवेगळी गोष्ट तुमच्या माहितीत असेल, तर naviumed@sampark.net.in या ईमेलवर नक्की पाठवा. आम्ही ती जरूर प्रसिद्ध करू.
– संतोष बोबडे, सातारा