ll गावासाठी शाळा शाळेसाठी गाव llशाळा आणि ग्रामस्थ हातात हात घालून!

 

बीड जिल्ह्यातल्या गेवराईतली जिल्हा परिषद शाळा गौंडगाव. पहिली ते आठवीचे वर्ग. पटसंख्या १८२. उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत जगन्नाथ जाधव सर पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागे, बीडमधल्या वेगवेगळ्या शाळांनी पुण्यातल्या वाबळेवाडी शाळेला भेट दिली होती. विस्ताराधिकारी प्रवीण काळम-पाटील यांचा यात पुढाकार होता. वाबळेवाडी शाळे वाबळेवाडी शाळेकडून प्रेरणा घेऊन अनेक उपक्रम गौंडगाव शाळेत सुरू केले गेले. मुलांनाच जबाबदारी देणं ही मूळ कल्पना. शाळेच्या रोजच्या परिपाठाला एक विषय विद्यार्थ्यांनीच ठरवणं, ठरलेल्या विषयानुरूप प्रार्थनागीत, नाटुकलं, भाषण याचं नियोजनही करणं. अभ्यासविषयांत इतरांना मदत करणारे विषयमित्र विद्यार्थी, शिवाय तंत्रज्ञान समन्वयक, कला समन्वयक, स्वच्छता समन्वयक याही जबाबदार्‍या मुलांच्याच. शाळेला भेट द्यायला येणार्‍या पाहुण्यांचं आगतस्वागत करणं, शाळा दाखवणं हेही मुलांचंच काम.

अशा शाळेत लॉकडाऊनमध्ये घरून अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेणं सहजच घडून गेलं. गौंडगाव शाळेने ४-५ विद्यार्थ्यांचे परिसरनिहाय गट केले. प्रत्येक गटात एक-दोन मार्गदर्शक विषयमित्र. गुगल मीटवरून तास चालायचे. पण सर्वांकडे स्मार्ट फोन नव्हते. मुलं सामायिक मोबाईल वापरू लागली. शिक्षक अधूनमधून प्रत्यक्ष भेटी द्यायचे. अभ्यासक्रम ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचं आव्हान मुलांनी स्वीकारलं. ते ५० टक्के विद्यार्थ्यांनी पूर्ण करून दाखविल्याचे, जाधव सर सांगतात.
गौंडगाव शाळेचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे, या शाळेचे 28 विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये जावा लँग्वेजचे कोडिंग शिकली. जाधव सर सांगतात, “कोविडपूर्व काळात, फेब्रुवारी महिन्यात वाबळेवाडीच्या अनुप यादव सरांनी कोडिंगचं एक प्राथमिक शिबिर आमच्या मुलांसाठी घेतलं होतं. या माहिती-तंत्रज्ञानाचं युगात शहरी मुलांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळते. ग्रामीण भागातल्या मुलांनी का मागे राहावं? कोडिंगबद्दल आणखी शिकण्यासाठी लॉकडाऊनमध्ये संधी मिळाली, ती घ्यायची हे ठरवलं. आणि गुगल मीटवरून पुन्हा अनुप सरांनी जावा लँग्वेजच्या कोडिंगचे तास आमच्या शाळेसाठी सुरू केले.”

रोज दोन तास चालणाऱ्या या ट्रेनिंगसाठी मुलांनी स्क्रॅच, ऑर्डिनो हे अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले. ज्यांनी फेब्रुवारीत प्राथमिक प्रशिक्षण घेतलेलं, त्यांच्यासाठी शाळेने इलेक्ट्रॉनिक सर्किट, ऑर्डिनो कीट तेव्हाच खरेदी केले होतं. त्यांचाही वापर झाला. आणि मुलं कोडिंग शिकू लागली. मूळचे गौंडगावचे, सध्या पुण्यात आयटी कंपनीत नोकरी करणारे शाळेचे हितचिंतक, संकेत पुरी यांना हे ऐकून फारच आनंद झाला. लॉकडाऊनमुळे ते गावी परतले होते. त्यांनीही या तांत्रिक बाबींविषयी आणखी मार्गदर्शन देणं सुरू केलं. याशिवाय त्यांनी मुलांना C++ लँग्वेजचे प्राथमिक धडेही दिले. या सगळ्यातून काय घडलं असेल? आमच्या विद्यार्थ्यांनी कॅलक्युलेटर आणि शाळेची दैनंदिन हजेरी यांच्या नोंदी ठेवणारी दोन अॅप चक्क तयार केली. राज्याच्या प्रधान शिक्षणसचिव वंदना कृष्णा यांनी आयोजित केलेल्या बालकट्टा कार्यक्रमात त्यांनी गौंडगावच्या या तंत्रस्नेही विद्यार्थ्यांचं, विशेषत: सई गायके हिचं विशेष कौतुक केलं.

संकेत पुरी हे नोकरीनिमित्ताने जपानला राहिलेत, त्यांना जपानी भाषा उत्तम अवगत आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यापासून मुलांना जपानी भाषा शिकवायलाही सुरूवात केलीय. विषयमित्र असलेले 28 विद्यार्थी सध्या जपानी लेखन-वाचनाचे धडे गिरवत आहेत. याशिवाय, गावातलेच रूपेश सोलाट या बीसीए झालेल्या तरूणाने मुलांसाठी स्पोकन इंग्लिशचे वर्गही सुरू केले आहेत. सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस इंग्रजीचे धडे दिले जातात. आपली मुलं इंग्रजीत बोलतायत, हे पाहून शेतकरी पालकांना फार आनंद होतो, असं जाधव सर सांगतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी शिक्षक जागरूक आहेत. विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला चालना देण्यासाठी ‘अभिव्यक्तीच्या वाटा’ नावाचं हस्तलिखित शाळेत नियमित प्रकाशित होतं. वक्तृत्त्व, निबंध, चित्रकला यात, गौंडगावचे विद्यार्थी आघाडीवर असतात.

गौंडगावच्या शाळेच्या विकासात ग्रामस्थ रस घेतात. ग्रामस्थांनी शाळेला १० कॉम्प्युटर्सचा संगणक कक्ष उभारून दिलाय, नऊ लाख रूपयांची अर्धा एकर जमीन दान केलेली आहे, बीड जिल्ह्यातील पहिली विज्ञान प्रयोगशाळाही ६६ हजारांच्या लोकसहभागातून ग्रामस्थांनीच उभारून दिल्याची कृतज्ञ आठवणही, जाधव सर सांगतात. एकूणच शाळा आणि गाव हातात हात घालून चालले, की सर्वांगीण विकास घडणं, फारसं अवघड नसावं. कोविडकाळातदेखील.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर
जगन्नाथ जाधव, जिल्हा परिषद शाळा गौंडगाव, ता गेवराई, जि बीड

Leave a Reply