ll गावासाठी शाळा शाळेसाठी गाव llतंत्रज्ञानाविषयीचे गैरसमज दूर करताना

 

लॉकडाऊन सुरू झाल्याझाल्याच, ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही, हे ढगे सरांनी ओळखलं. ते स्वत: तंत्रस्नेही शिक्षक-मार्गदर्शक. वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सास्ती इथे पहिली, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. शाळेचा पहिली ते सातवीचा पट ५३ विद्यार्थ्यांचा. कमी विद्यार्थी असल्याने प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य. शेतकरी आणि शेतमजूर असलेल्या पालकांनीदेखील या ऑनलाईन अभ्यासाला खूप चांगली साथ दिली.

इयत्ता पहिलीसाठी थेट ऑनलाईन शिकवण्यापेक्षा, ढगे सरांनी त्या पालकांना दर आठवड्याला अभ्यास काय असेल आणि तो मुलांकडून कसा करून घ्यायचा याच्या सूचना पाठवल्या. शिवाय आठवड्याच्या सुरूवातीला एकदा सर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यास समजावून सांगत होते. आठवड्याच्या शेवटी जाऊन आढावाही घेत होते. पालकांनी मुलांच्या अभ्यासात गुंतावं हा उद्देश होता. अंकओळख, संख्या मोजणं यासाठी घरातल्या वस्तू, नेहमीची कामं, पाळीव प्राणी यांचा वापर करायला सांगितलं. रांगोळीचे ठिपके घालताना, चपात्या लाटता-भाजताना मुलांना ते मोजायला लावा, घरात शेळी अथवा कुत्रा असेल तर त्याचे कान, डोळे, पाय असे अवयव मोजायला लावा, हेही पालकांना सांगितलं. ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ सारख्या कवितांच्या व्हिडिओ लिंक पालकांना पाठवल्या.

चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र गुगल मीटवरून तास घेतले. जूनमध्ये या वर्गांत केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन होते. मग, नातेवाईक, शेजारी, वर्गमित्र यांचे मोबाईल वापरून अभ्यासाचे तास सुरू केले. ढगे सर सांगतात, “मुलांना मोबाईल हाताळायला प्रचंड आवडतो, म्हणून मी फक्त लेक्चर्स घेण्यापेक्षा ‘घरचा अभ्यास’देखील मोबाईलवरच करायला देऊ लागलो. त्यासाठी गुगल वर्कशीटचा वापरली. उदा. सम-विषम संख्या ओळखण्याची, वर्ग-वर्गमूळ काढण्याची वर्कशीट. मुलं ती मोबाईलवरच एडिट करून पाठवायची. पुढं तर आम्ही इंटरअॅक्टिव्ह वर्कशीट आणि इंटरअॅक्टिव्ह नोटबुक यांचाही वापर केला, ज्यावर मुलं अभ्यास कसा करत आहेत, ते मला लाईव्ह बघता यायचं. फक्त गुगल मीटवरून शिकवलं तर मुलं काही दिवसांनी कंटाळतात आणि मग तास झाला की गेम्स, सोशल मीडिया यात अडकून जातात. मग पालक ओरडतात. मात्र मोबाइलवरच अभ्यासही देण्याने मुलांचं लक्ष इतरत्र जात नाही. आणि मोबाईलवर खरंच अभ्यास करता येतो, यावर त्यांचा आणि पालकांचाही विश्वास बसतो.”

सह्याद्री वाहिनीच्या टिलीमिली कार्यक्रमावर आधारित अभ्यास, दररोज ‘लोकमत’ वृत्तपत्राची नागपूर आवृत्ती वाचून त्याच्या हेडलाईन लिहून गुगल क्लासरूममध्ये पाठवणं, भारतीय वैज्ञानिकांची माहिती, भोंडल्याची गाणी यांच्या स्लाईड तयार करणं असे विविधांगी उपक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांची संवादतंत्रविषयक कौशल्यं विकसित झाली. नोव्हेंबरात १०० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आहेत.

ग्रामीण आणि शहरी भागातही मोबाईल वापराबाबत, पालकांची नाराजी, त्यांचा पाल्यांप्रति अविश्वास, काही मुलांना त्यातून गेमिंग, पबजी, पॉर्नसाईट वगैरेचं लागलेलं वेड हे हाताळण्याबाबत ढगे सर विचार करत होते. स्वतः आयसीटीतज्ज्ञ असल्याने तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर करता येऊ शकतो हे त्यांना माहीत होतं. आणि कोरोनाकाळात तर ऑनलाईन शिक्षण केंद्रस्थानी आलेलं. पालकांच्या शंका-कुशंकांचा निचरा करण्यासाठी काही कारावंसं त्यांना वाटत होतं. त्यांनी आणि त्यांचे मित्र- सहकारी स्वप्नील वैरागडे यांनी लॉकडाऊनमध्येच एक एनजीओ सुरू केली. तिचं नाव किडस् (Kids innovation and development skills).

ढगे सरांना वाटतं की, तंत्रज्ञानावर नवीन पिढीचा हक्कच आहे. करोनाकाळात आपल्याला या तंत्रज्ञानानेच तारून नेलंय आणि पुढचा काळही तंत्रज्ञानानाच असणार. ग्रामीण मुलांनी त्यात मागे का राहावं? पालकांचे या बाबतीतले गैरसमज दूर करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी वर्ध्यातील बालक-पालकांची विनाशुल्क कार्यशाळा घेतली. दोन दिवसीय कार्यशाळेत रोज दोन तास ५०च्या वर पालक-पाल्यांनी हजेरी लावली. ऑनलाईन अभ्यासाचं प्रात्यक्षिक, तंत्रज्ञानाने अभ्यासाव्यतिरिक्त मिळणारी माहिती, ज्ञानवृद्धी, सोशल मीडिया वापरताना घेण्याची काळजी, सायबर सुरक्षा कायदा असं सगळं कार्यशाळेत सांगितलं. मुलं मोबाईलवर नेमकं काय सर्च करत आहेत, खरंच अभ्यासच करत आहेत का, हे पाहायला गुगल फॅमिली लिंकद्वारे नियंत्रण ठेवता येतं, हेही पालकांना दाखवून दिलं. यातून मुलांच्याही लक्षात आलं की, पालक आपण काय करतो त्यावर लक्ष ठेवू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, मुलांवर विश्वास टाकायला शिका, मोबाईलवापरावरून नाजुक वयातल्या मुलांशी वादविवाद टाळा, हे पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला.

कार्यशाळेत मिळालेलं मार्गदर्शन पालक-मुलांना आवडलं. बाहेरच्या जिल्ह्यातूनही कार्यशाळेची मागणी होत आहे आणि त्या घेणार असल्याचं ढगे सरांनी सांगितलं. त्यांच्या ‘किडस्’ संस्थेद्वारे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोबाईल, टॅब, टीव्ही, व्हीसीआर देणगीदाखल द्यायलाही त्यांनी सुरूवात केली आहे.
ऑनलाईन अभ्यास करताना, व्हॉटसअॅप, सोशल मीडिया वापरताना खोटारडे संदेश, चुकीची, खोटी माहिती देणारे फॉरवर्ड यापासून सावध राहा, असं ढगे सर मुलांना समजावत असतातच. एकदा एका विद्यार्थ्याला त्याच्या मोबाईलवर एक लिंक आणि मेसेज मिळाला. अमुक लिंक १५ जणांना फॉरवर्ड केली की जिओचा दोन महिन्यांचा नेटपॅक मिळणार, असा तो मेसेज होता. तो विद्यार्थी जेव्हा म्हणाला की, सर हे खरं वाटत नाही मले; तेव्हा मुलांना आपण विचारप्रवृत्त करण्यात यशस्वी झालो आहोत, याचं समाधान मिळाल्याचं ढगे सरांनी सांगितलं. विद्यार्थ्याची प्रतिक्रिया ही सरांच्या शिकवण्याची पावतीच म्हणायला हवी.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर

शरद ढगे, जि प शाळा, सास्ती, हिंगणघाट, वर्धा

Leave a Reply