अव्हानाचा सामना नव्या तंत्रज्ञानाने
डाएटसाठी २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत माहितीतंत्रज्ञान तज्ञ म्हणून ज्यांनी काम केलं, ते वर्ध्यातले शिक्षक स्वप्नील वैरागडे यांनी करोनाकाळातल्या आव्हानाला आधुनिक पद्धतीने उत्तर देण्याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.
वर्धा जिल्ह्यासाठी ‘ई विद्या’ अॅप हा इयत्ता नववी-दहावीसाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला. स्वप्नील सर इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षक असले (बीएससी. डीएड) तरी त्यांचा कल आयटी क्षेत्राकडे असल्यामुळे त्यांनी उपक्रमाच्या समन्वयाचं काम पार पाडलं. कोविड काळात विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून उपाययोजना करायच्या तर कल्पना मांडा, असं आवाहन करत वर्धा जिल्ह्याधिकारी विवेक भीमणवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी डाएट प्राचार्या रत्नमाला खडके यांच्यासह बैठक घेतली होती. स्वप्नील वैरागडे यांनी शैक्षणिक अॅप सुरू करता येईल अशी मध्यवर्ती कल्पना त्या बैठकीत मांडली होती.
वेबसाइटचं काम सरांकडे होतं पण अॅप तयार करणं हे शासकीय काम असल्यामुळे एनआयसी सेंटरकडे ते देण्यात आलं. असं असलं, तरी त्याची मांडणी व आशय-मजकुराबाबत सरांच्या सूचनांनुसार अॅपमध्ये आवश्यक बाबी घेण्याचं काम सुरू झालं.
जिल्ह्यातील अनुदानित व खासगी शाळा तसंच जि. प. शाळांमधील ३६ तज्ज्ञ शिक्षकांना घेऊन त्यांच्या अध्यापनाचे व्हिडिओ तयार करण्यात आले. ७ जणांची आयटी तज्ज्ञांची टीम. पीपीटी बनवणं, इंटरनेवरून लागणाऱ्या बाबी पुरवणं ही कामं या टीमकडे होती. चित्रीकरणासाठी त्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना सहभागी करून घेण्यात आलं.
चार भाषा विषय (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत), गणित (१ व २), विज्ञान (१ व २), तसंच इतिहास आणि भूगोल या १० विषयांचं अध्यापन ॲपमध्ये आहे. व्हिडिओ बनवण्याचं प्रशिक्षण सर्वप्रथम शिक्षकांना देण्यात आलं. इंटरअॅक्टिव्ह बोर्ड घेतला. पाच इंटरअॅक्टिव्ह टीव्ही घेतले. (ज्याचं काम बोर्डपेक्षा आणखी चांगलं, उपयुक्त आहे.) सकाळी १० ते संध्याकाळी ७ असं दिवसभर शूटिंग, एडिटिंग, रीकॅप, अपलोड करण्याचं काम चालायचं. त्या त्या विषयांचे डाएट अधिव्याख्याता हे वेळापत्रक आदी समन्वयाचं काम पहात होते. अडीच महिन्यांत हे सर्व काम पूर्ण झालं.
वर्धा जिल्हा परिषदेचं ‘ई विद्या’ अॅप आता गुगल प्ले स्टोअरवर मिळतं. सर्व विषय, संपूर्ण अभ्यासक्रम आणि तोही मोफत ही या अॅपची वैशिष्ट्यं. सध्या लोकप्रिय असलेल्या अन्य शैक्षणिक अॅपमध्ये फक्त डेमो व्हिडिओ मोफत असतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार इथे प्रामुख्याने करण्यात आला आहे. जिल्ह्यापुरतं ते मर्यादित राहिलं नाही तर राज्यभरातून २६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी इथे लॉगइन केलं.
सध्या उपलब्ध असलेले २०० व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाइनही बघता येतात. अलिकडेच, इयत्ता आठवीसाठीच्या व्हिडिओंची भरही घातली आहे. व्हिडिओचं आकलन कितपत झालंय, हे तपासण्यासाठी चाचण्याही दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या चाचणीचं मूल्यांकन त्याच ठिकाणी लगेच होतं. ५० टक्क्यांहून कमी मार्क मिळाले तर व्हिडिओ पुन्हा बघण्याची सूचना केली जाते. त्याचबरोबर संदर्भसाहित्य उपलब्ध करून दिलं आहे. विद्यार्थ्यांना शंका असतील तर समोरासमोर निरसन करून देण्यासाठी शिक्षक उपस्थित राहतील, अशी सुविधा आहे. १० ते ५ या वेळात अध्यापक सत्र घेतात.
पालकांना कोविडकाळात येणाऱ्या समस्या मांडण्यासाठी मंचही या अॅपमध्ये आहे. मुलांच्या वर्तनसमस्यांविषयी सल्ला हवा असेल, तर मानसोपचारतज्ज्ञ (आरोग्य विभागातील डॉक्टर) १० ते ५ इथे उपलब्ध असतात.
‘ई भंडार’ हा मेन्यू अवांतर वाचनासाठी ई बुक्स पुरवतो. शैक्षणिक ई साहित्य उदा. कृतीपत्रिका, शिक्षकांसाठीच्या प्रशासकीय सूचना, शासकीय आदेश, परिपत्रकं इथे आहेत. ‘दीक्षा’च्या लिंक दररोज इथेही मिळतात. ‘बालभारती’ची ई बुक्स, महाराष्ट्र शासनाच्या लिंक, ‘डाएट वर्धा’च्या लिंक इथे मिळतात.
इंटरअॅक्टिव्ह बोर्ड साठीचा निधी आपत्ती व्यवस्थापनामधून भीमणवार साहेबांनी मिळवून दिला होता. व्हिडिओ शूटिंग-एडिटिंगसाठी व्यावसायिकांची नेमणूक केली होती. त्यांची यंत्रसामग्रीही महागडी होती. त्यामुळे त्या कामाचं योग्य ते शुल्क देण्यात आलं.
स्वप्नील सरांनी या काळात स्वत:च्या महाबळच्या (ता. सेलू) विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग संध्याकाळी घेतले. शेतीकामांमुळे या मुलांनाही पालकांचा मोबाइल संध्याकाळीच उपलब्ध होतो. अध्यापन सुकर होण्यात दोन शिक्षकमित्र मुलींचाही हातभार लागतो. ४२ पटसंख्या असलेल्या शाळेची कामं मुख्याध्यापिका उमाटे मॅडम सांभाळतात.
सध्याच्या शाळेत बदली होऊन सरांना तीन महिने झाले आहेत. १० वर्षांच्या सेवेत, याआधी त्यांनी मूळपाड शाळा (हिंगणघाट पंचायत) आयएसओ केली होती. या शाळेची जिल्ह्यातील पहिली वेबसाइट त्यांनी २०१५ मध्ये बनवली होती. त्या यशानंतर त्यांची नेमणूक डाएटमध्ये माहितीतंत्रज्ञान तज्ञ म्हणून कऱण्यात आली.
डाएट कार्यालयात ताज्या अॅपसंदर्भातलं एक केंद्र सुरू करायचा जिल्ह्याधिकार्यांचा विचार आहे. एखाद्याला इथून आपल्या पेन ड्राइव्हमध्ये व्हिडिओ न्यायचे असतील, तर या केंद्रातून मिळतात. २०० व्हिडिओचं लक्ष्य यशस्वी केल्यानंतर आता दुसरी ते आठवी इयत्तांसाठीची व्याख्यानं अॅपमध्ये देण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
– सुलेखा नलिनी नागेश
स्वप्नील वैरागडे, वर्धा जिल्ह्याचे लर्निंग अॅप ‘ई विद्या’चे समन्वयक