स्मिता कापसे मॅडम अकलूजच्या माळेवाडी जि.प. शाळेत २००१ पासून शिकवितात. मधलं, एखाद-दुसरं वर्ष वगळता, त्या माळेवाडीच्याच शाळेत विज्ञान आणि गणित शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे गावाशी, गावाकर्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. लॉकडाऊन झाल्याझाल्या स्मिता यांनी त्यांच्याकडे असलेल्या सहावी (६४ विद्यार्थी) आणि सातवी (७२ विद्यार्थी) इयत्तेतल्या विद्यार्थ्यांची तीन गटात विभागणी केली. स्मार्टफोन असणारे, साधे फोन असणारे आणि कसलीच सुविधा नसणारे. हे करायला पालकांच्या व्हॉटसअॅप ग्रुपची त्यांना मदत झाली.
स्मार्टफोन असलेल्या विद्यार्थ्यांना गणित-विज्ञान विषयांच्या पीडीएफ, स्मिता यांच्या स्वतःच्या यू ट्यूब चॅनलच्या लिंक आणि गुगल फॉर्ममधून प्रश्न; स्मार्ट फोन नसलेल्यांना फोनवर बोलून, एसएमएसद्वारे अभ्यास आणि ज्या विद्यार्थ्यांकडे कसल्याच सुविधा नाहीत त्यांच्या घरी एक दिवसाआड जाऊन शिकवणं, हे सगळं, स्मिता यांनी २४ मार्चपासूनच सुरू केलं. त्या सांगतात, “सुरूवातीला सोलापूरच्या ग्रामीण भागात करोनाचा फारसा धोका नसल्याने सर्व काळजी घेऊन मी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास घेत होते. माझं घर जवळच, तीनेक किलोमीटरवर असल्याने ते मी जमवतही होते. पण कोविडप्रसार वाढायला लागला आणि गावं रेड झोनमध्ये जाऊ लागली तेव्हा, विद्यार्थ्यांच्या घरी जाणं धोक्याचं वाटू लागलं. मग मदत घेतली शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची. याच शाळेत सुमारे २० वर्षे शिकवल्याने मी हक्काने ते करू शकले.”
कापसे मॅडमचे, शहरांत असणारे अनेक माजी विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये गावी परतले, त्यातले काही नोकरी करतात. काहींची शिक्षणं सुरू आहेत. कुणाची लग्नं झालीयेत. अश्या १५ माजी विद्यार्थ्यांवर त्यांच्या जवळपास राहाणार्या प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपवली आणि त्यांचा अभ्यास या तरूणांच्या मोबाईलवर पाठवायला सुरुवात केली. लहानांना मदत करणार्या हे माजी विद्यार्थी, ‘करोना एज्युकेशन फायटर्स’. विद्यार्थ्यांच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडवण्याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थी अधनंमधनं कोरोना फायटर्सच्या फोनवरून स्मिता मॅडमशी व्हिडिओ कॉलवरून बोलू लागली. शाळा बंद असली तरी कापसे मॅडमचे विज्ञान-गणिताचे तास ऑनलाईन सुरूच होते. भाषा आणि समाजशास्त्र शिकविणाऱ्या तीन शिक्षकांनादेखील कापसे मॅडम यांनी त्या व्हॉटसअॅप ग्रुपवर घेतल्याने मराठी, हिदी, इंग्रजी आणि समाजशास्त्राचाही अभ्यास सुरू झाला.
मुलांना पर्यावरणाचं महत्त्व पटावं, यासाठी कापसे मॅडम दक्ष असतात. कोविडपूर्व काळात त्यांनी सुरू केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांत लॉकडाऊनमध्येही खंड पडू दिला नाही, हे खासच. त्यांनी मुलांना आंबे, चिक्कू, जांभूळ, सीताफळं यांच्या बिया गोळा करायला सांगितल्या. ओल्या मातीत या बिया मिसळून त्याचे गोळे, सीडबॉल्स तयार करायला शिकवलं. उन्हाळ्यात, मुलांनी तब्बल चार हजार सीडबॉल्स तयार केले आणि पावसाळा सुरू होताच शेतांच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागी फेकून रोपं तयार केली आहेत. स्मिता यांनी जपानच्या ‘मियावाकी’ पद्धतीने कमीतकमी जागेत भरपूर रोपं कशी लावायची, याचंही यूट्यूब व्हिडिओ दाखवून प्रशिक्षण दिलं. ज्यांच्या घरी शेत नाही, मात्र लहानसं अंगण आहे, अशा विद्यार्थ्यांनी या पद्धतीचा वापर करून छान बागा तयार केल्या आहेत. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्ती तयार करून त्यातही फळांच्या बिया मुलांनी टाकल्या.
मुलांच्या मनोरंजनासाठी आणि व्यक्तिमत्त्वविकासासाठी बरेच ऑनलाईन उपक्रम कापसे मॅडम यांनी घेतले. कथालेखनासाठी चिन्मय केळकरांची यांची कार्यशाळा, काष्ठशिल्पांसाठी राहुल लोंढेंचं मार्गदर्शन. सानेगुरूजी कथामाला, निबंधलेखन, कविता-कथा लेखन, वक्तृत्त्व, चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. त्याचाच परिणाम म्हणून ‘कविश्री’तर्फे आयोजित चारोळी स्पर्धेत सावन वाघमोडे या विद्यार्थ्याने आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी आयोजलेल्या ‘मासिकपाळी व्यवस्थापन’ विषयावरील वक्तृत्त्वस्पर्धेत सिमरन काझी या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला.
स्मिता कापसेंची शिकवण्याची तळमळ विद्यार्थ्यांपाशी थांबत नाही. विद्यार्थ्यांच्या आई-बहिणींशीही त्यांनी पर्यावरण आणि मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर ऑनलाईन चर्चा केली. पर्यावरणदिनी, पुणे डायटच्या प्राचार्या मा. डॉ. कमलादेवी आवटे-क्षीरसागर यांचं वेबिनारमधून मार्गदर्शन मिळवून दिलं. प्लस्टिकबाबतचे ३ R (Reduce, Reuse, Recycle) त्यांना शिकविले. ओला-सुका कचरा वेगळा काढायला शिकवला. २८ मे या ‘मासिक पाळी दिना’निमित्ताने मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा या विषयावर मुंबई प्राधिकरणच्या मानसी भोसले यांच्याशी चर्चा ठेवली. या काळात आरोग्याची-स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगितलं. एकूण, लॉकडाऊनमध्येही माळेवाडीच्या मुलांची शाळा आणि इतर उपक्रम अगदी उत्तम सुरू आहेत.
स्मिता कापसे, माळेवाडी, ता अकलुज, जि सोलापूर
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर