करोनाकाळात प्रत्यक्ष भेटींवर बंदी आली आणि सुकडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापकपद अमोल पालेकर यांनी तात्काळ २० मार्चला पालक–विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अप ग्रुप तयार केला. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, केवळ पाच जणांना जोडणारा कॉन्फरन्स कॉल सरांनी वापरला. तेव्हा शाळाव्यवस्थापन समितीतल्या नागरिकांनी मदत केली. एका वेळी पाचच व्यक्ती, त्यातले एक शिक्षक, ही मर्यादा ओलांडण्यासाठी पालेकरांनी एका मोबाईलवर दोन मुलं अशी सोय एप्रिलपासून लावून दिली. शेजारच्या हुस्नापूर शाळेच्या अनिल सावसाकडे सरांनीसुध्दा याचं अनुकरण केलं.
जिल्ह्यातील पहिली ऑनलाइन पालकसभा जूनमध्ये घेतली. शिक्षकांची प्रत्यक्ष उपस्थिती नसताना, अल्पशिक्षित, शेती करणार्या पालकांवरची जबाबदारी वाढणार होती. यवतमाळ जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत, पालकमार्गदर्शन कार्यशाळा उपयुक्त ठरली.
२०१८ मध्ये या शाळेत आल्यापासून, अमोल यांच्या धडपडीमुळे दोन वर्षांत पट २५ वरून ३१, यवतमाळला कॉन्व्हेंट शाळेत जाणारी दोन मुलं गेल्या वर्षीपासून इथे दाखल झालेली आणि शेजारच्या गावातील मुलंही याच शाळेत येण्यास उत्सुक, १ लाख ३२ हजार रुपये लोकवर्गणी, शाळेला कुंपण, स्टेज, मैदान, भिंतींना रंग, वीज, पाण्यासाठी बोअर, आरओ मशीन आणि ग्रामपंचायतीने दिलेला टीव्ही.
शाळाइमारत कॉरंटाइन केंद्र केली गेली. तेव्हा, जून महिन्यात भोंगाशाळा सुरू केली. म्हणजे काय? शाळेजवळचं पोलिसपाटील दीपक दरणेंचं घर. त्यांच्याकडच्या ध्वनिक्षेपकाचा वापर. मुलांचे ऑफलाईन वर्ग जाहीर करण्यासाठी, मुलांना हजर राहण्यासाठी नावं पुकारायला. दरणेंच्या घराच्या आवारात मुलं जमतात. इथे मुलांना गणितं, चित्रं काढण्यासाठी वापरता येईलसा, फळाही ठेवला. प्रत्येक इयत्तेचे सहा-सात विद्यार्थी असल्याने, त्यांना दूर-दूर बसवून एकेका इयत्तेचा वर्ग घेणं शक्य झालं. इतिहास,परिसर अभ्यास, वाचनकौशल्य हे ऑनलाइन. शिक्षक दिसले नाहीत तरी, ध्वनिक्षेपकाच्या भोंग्यातून त्यांचा आवाज पोचतो.

गावातल्या तरुणांनी आपले जुने मोबाइल तीन मुलांना दिले, अन्य तिघांना केवळ वर्गात वापरण्यापुरते दिले. अशा प्रकारे, आता शंभर टक्के मुलं ऑनलाइन वर्गाशी जोडलेली आहेत. प्रत्येकाला खडू दिले आहेत आणि काळे कागद गावात जागोजागी लावून ठेवले आहेत. तिथे मुलं आपापल्या सोयीने लिहितात. लहान इयत्तांमधील मुलं मराठी, इंग्रजी शब्द पटापट सांगतात. मोठ्या स्पेलिंगमध्ये लपलेले छोटे शब्द तयार करतात. दोन-दोनच्या गटानं कागदावर शब्दकोडी सोडवतात. शिक्षकमित्र, वरच्या वर्गातील मुलं त्यांचं लिखाण तपासून सुधारणादेखील करतात. गुगल मीटद्वारे होणारा अभ्यास पाचवीसाठी चार तास आणि इतर वर्गांसाठी अडीच तास चालतो. आता नोव्हेंबरपर्यंत ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. नवोदय परिक्षेची तयारी, स्कॉलरशिपचा अभ्यास ऑफलाइन चालतो.
विविध उपक्रम, दिनविशेष कार्यक्रम नित्य चालतात. मुलांची वाचनसवय टिकवणं हेही एक ध्येय आहे. वाचनप्रेरणा दिनी, मान्यवरांसह बालसाहित्य संमेलन भरवलं. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचं वाचन, कविता, मुलांच्या स्वरचित कथाही यात होत्या. भोंग्यामुळे यंदा अख्खं गावच श्रोतृवृंद म्हणून लाभलं. करोनाविषयक जागृती करणारं पथनाट्य खूपच गाजलं. शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजाननभाऊ वसू यांनी आपल्या घराचं आवार सरावासाठी दिलं. शिक्षकांनी लिखाण करून ते मुलांकडून बसवून घेतलं. चौकाचौकात सादर केलं. मुलांचा आत्मविश्वास वाढला.
बाहेरच्या गावांनी आयोजलेल्या स्पर्धांमध्येही मुलांनी बक्षिसं मिळवली. राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत दोन विजेते सुकडी शाळेचे. जिल्हापरिषद प्राथमिक, परभणीद्वारे आयोजित ‘उगवतीचे रंग’ ही एकपात्री प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धा. त्यात विद्यार्थी प्रज्वल यानं ‘मी बेरोजगार बोलतोय’ हा करोनाकाळातल्या समस्येवर प्रकाश टाकणारा प्रयोग सादर केला.
बैठ्या खेळांची शाळेतली साधनं शिक्षकांनी मुलांना घरी नेऊन दिली. मुलं त्याचा आनंद घेतात. शिक्षक घरोघरी जाऊन मुलांची अभ्यासातील प्रगती तपासतात. शाळा बंद असल्यामुळे येणारी उदासी दूर करण्यासाठीही प्रयत्न करतात. अवांतर वाचनाची १०७ पुस्तकं त्यांनी शाळेतून बाहेर काढली. प्रज्ज्वल मांढरे या हरहुन्नरी विद्यार्थ्याला ग्रंथपाल केलं. तो पुस्तकं सायकलवरून घरोघरी पोचवतो, नोंदी ठेवतो. ज्ञानरंजन हा मासिक अंक मुलं तयार करतात. यंदा त्याचं फ्लिप बुक संदीप कोल्हेंनी बनवलं.
विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली बँकसुध्दा अशाच प्रकारे सुरू आहे. मुलांना विविध व्यावसायिकांनाही सरांनी ऑनलाइन भेटवलं. शेजारच्या गावातील कुंभारकाम करणारे, गावातील मच्छीमार यांच्याकडून त्यांचं काम नि त्यासाठी लागणारं साहित्य मुलांनी समजून घेतलं. बॅण्डपथकातल्या लोकांवर आलेलं संकट समजून घेताना मुलं गंभीर झाली. कुठल्याही उपक्रमात मोजकी मुलं प्रत्यक्ष हजर आणि बाकीची आपल्या घरातून ऑनलाइन सामील होत असतात.
सोमवती ठाकरे मॅडमनी ऑनलाईनबाबत मार्गदर्शन केलं. केंद्रप्रमुख जयवंत दुबे, ढाले सर नेहमी पाठीशी उभे असतात. शाळेच्या स्टाफमध्ये पोषणआहार बनवणाऱ्या ताई पदवीधर आहेत, पालक आहेत आणि त्या शिक्षकमित्र म्हणूनही काम करतात. सर्व मुलांना त्या ओळखतात. कार्यानुभव साहित्य आणणं, शाळेची इतर कामं यासाठी तालुक्याला गेल्यावर संध्याकाळचा तास हुकतो. वेळापत्रक बदलावं लागतं. मुलं शंका विचारत राहतात. मुलांचा नेट पॅक संपला तर त्याचीही सोय शिक्षकच करत असतात. शिक्षकांना पत्नीचं सहकार्यही मिळत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव नाही, लोकसंख्या कमी, शाळेचा पट छोटा अशा ग्रामीण भागांत नित्याप्रमाणे व्यवहार व्हावेत, ही अपेक्षा मात्र आता दिसू लागली आहे.
अमोल पालेकर – प्रभारी मुख्याध्यापक, सुकडी, तालुका कळम, जिल्हा यवतमाळ
– सुलेखा नलिनी नागेश
Related