बापू बाविस्कर, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी (केंद्र सोयगाव), तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद.
डोंगराळ, दुर्गम भागातलं दत्तवाडी. १६५ लोकसंख्या. माडी आदिवासी समाज. शहरी वारं नाही. अशिक्षितता, मागासपणाचा विळखा. हे रूप पालटणारे, इथल्या शाळेच्या १७ मुलांसाठी दिवसरात्र तळमळणारे बापू बाविस्कर दिवाळीसाठी घरी न जाता तिथेच राहिले. करोनाची अनाठायी भीती पळवून लावणारे गावात तेच. शाळा बंद असताना ‘नेबरकट्टा’ हा उपाय काढत मोबाइल, ऑनलाइनला पर्याय देणारे तेच. लॉकडाऊन काळातला बापूंचा हा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला.
वीज नाही, नेटवर्क नाही अशा दत्तवाडीतल्या शाळेत ते रुजू झाले, २०१२ मध्ये. सर्वप्रथम त्यांनी शाळाव्यवस्थापन समितीच्या कामात पारदर्शकता आणली. समितीची बैठक पारावर घ्यायला सुरुवात केली. शाळाइमारतीची डागडुजी, त्यासंदर्भात पैशाचे व्यवहार, गणवेशखरेदी… चर्चा खुली. गैरव्यवहारांना आळा बसला. मुलांना गणवेश वगैरे दर्जेदार मिळू लागलं. रोजगारासाठी गावाबाहेर जाणार्यांच्या मुलांचं स्थलांतर त्यांनी रोखलं. पहिली ते चौथी असलेली द्विशिक्षकी शाळा पाचवीपर्यंत वाढवली. मुलांचं गैरहजर राहण्याचं प्रमाण शून्य झालं.
शाळा-गाव नातं घट्ट आहे. कसं? ‘एक दिवस शाळेसाठी’ यामध्ये प्रत्येक कुटुंबाने महिन्यातला एक दिवस शाळेला उपस्थित रहायचं. मुलांशी हितगुज करायचं. ‘गावाचं शाळेला आमंत्रण’ यामध्ये मुलाची प्रगती समाधानकारक वाटत असेल तर पालकांनी एक दिवस अख्ख्या शाळेला जेवायला बोलवायचं. दुपारच्या सुट्टीत जेवण. या भेटीत घर, परिसराचं निरीक्षण, आजारी व्यक्तीची सुश्रुषा, आरोग्यदायी सवयींबाबत चर्चा वगैरे. ‘निर्मल ग्राम स्वच्छता’ उपक्रमात परिसर, विहीर स्वच्छ करण्यासाठी सगळ्या गावाबरोबर सर राबले. गाव हागणदारीमुक्त झालं. मुलांकडून शिकून गावातली प्रत्येक व्यक्ती सही करू लागली. रात्रवाचनालयात लोक पेपर वाचू लागले. शहारापासून तुटलेल्या गावाला पंचक्रोशीतल्या घटना समजू लागल्या.
गावाला शोभेलसा शाळेच्या प्रगतीचाही आलेख. औरंगाबाद जिल्ह्यातील टॉप टेन शाळांमध्ये शाळेचा दुसरा क्रमांक. वाचनकौशल्य शंभर टक्के. मुलांची उपस्थितीही शंभर टक्के. आधिकारीवर्गाचं सहकार्य नेहमीच. अचानक लॉकडाऊन आलं. शाळा बंद. नियोजन कोसळलं. विद्यार्थी गोंधळले. मुलांना मोबाईल माहीत नाही. वार्षिक परीक्षा झालीच नाही. निकाल स्थगित. सर निवासस्थानी, दत्तवाडीबाहेर अडकलेले. करोनाबाबत मुलांना, पालकांना काहीच माहीत नव्हतं. त्यात शेजारच्या ‘सावरखेडा ब’ गावात तीन करोनाबाधित आढळले. दत्तवाडीतले पालक, गावकरी भयभीत. आपल्या गावातही साथ येईल… हवेतूनही प्रादुर्भाव होईल. अतोनात गैरसमज! मीडियादेवतेची कृपा! लोकांनी घरात कोंडून घेतलं होतं. एकमेकांना कोणी मदत करेना. दुकान बंद. लोक हलाखीत.
२०१९मध्ये तयार केलेला पालकांचा व्हॉटस्अप गृप सरांनी वापरला. ‘दार उघडलं तर, व्हायरस घरात शिरेल’ या भावनेतून लोकांची मुक्तता केली. गावात मोजकेच मोबाइलधारक. सरांनी डॉक्टरांचे व्हिडिओ पाठवले. त्यातून शारीरिक अंतर, मास्क, हात साबणाने धुणं हे गावापर्यंत पोचलं. ‘सावरखेड ब’मध्ये शिक्षकांच्या डयूट्या लागल्या. सरांना प्रवास करणं शक्य झालं. चेकपोस्टवरसुध्दा ड्यूटी होती. दुपारी ३ ते ११ ड्यूटी आणि त्याआधीचा वेळ शाळेला. दत्तवाडीत आल्यावर पालकांशी पहिली भेट घेतली. खेड्यात वीज नाही. सिंगल फेज. त्यात लोक लाइटबिल भरत नाहीत. तेवढी कमाई नाही. त्यामुळे टीव्ही-मोबाइलचा वापर फार कमी. शेतीच्या कामांना जावंच लागेल हा मुद्दा पालकांनी मांडला. सरांनी निरसन केलं. गावकऱ्यांना धीर आला. पुढे एकही करोना रुग्ण आढळला नाही. दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले. अध्यापनासाठी मार्ग काढायचा होता.
पहिल्यांदा मजकुररूपी मेसेज. साध्या मोबाइलवर पाठवलेला मेसेज वाचून मुलं दुसऱ्या दिवशी तो अभ्यास करत. शेतावरून परतल्यावर पालकही संध्याकाळी मुलांना घरी अभ्यासाला बसवत. सरांनी स्टेशनरी विकत घेऊन दत्तवाडीतल्या जाणकार व्यक्तीकडे सोपवली. पुढील सहा महिन्यांसाठी मुलांची सोय झाली. नंतर, ९ एप्रिलपासून चार तासांचा ‘नेबरकट्टा’ सुरू. अंतर ठेवून घराच्या टेरेसवर, बाल्कनीत, व्हरांड्यात, कुठे बाजेवर गोधडी टाकून साध्या तंबूत एकमेकांशेजारी राहणारी दोन-दोन, तीन-तीन मुलं बसवून गटानं अभ्यास. शाळा शंभर टक्के प्रगत असल्याने प्रत्येक मुलाला वाचनकौशल्य, पूर्ण अंकज्ञान आहे. एका गटात वेगवेगळया इयत्तेची मुलं. लहान मुलांना मोठ्या मुलांची मदत. समस्या सोडवता आली नाही, तर ती लिहून ठेवून, पालकांच्या मोबाइलवरून सरांना संपर्क करणं आणि सरांनी समस्येचं उत्तर व्हिडिओ बनवून व्हॉटस्अप ग्रुपवर पाठवणं हे रुळलं. अडीच तास अभ्यास, दीड तास खेळ. अभिनयगीत, कृतीगीत, स्पेलिंगखेळ, पाढ्यांचे खेळ, पशुपक्ष्यांचे आवाज-हावभाव, योगासनं, गप्पागोष्टी वगैरे.
‘नेबरकट्ट्या’वरचं शिक्षण जोरदार. मुलांना पाढे पाठ. इंग्रजी शब्द पाठ. घरातून मोकळ्यात यायला, खेळायला मिळतं म्हणून मुलं वेळेवर पुस्तक घेऊन बाहेर पडतात. पालक देखरेख ठेवतात. मुलांचे फोटो व्हॉटस्अप ग्रुपवर पाठवले जातात. लॉकडाऊनमध्ये बऱ्याच पालकांनी स्मार्टफोन घेतले. कारण त्यांची मोठी मुलं आठवी-नववीची, ऑनलाइन शिकतात. त्यामुळे प्राथमिकची मुलंही आपला स्वाध्याय व्हॉटस्अप ग्रुपवर पाठवतात. गटांतले विद्यार्थी एकमेकांना स्वाध्यायातल्या दुरुस्त्या सुचवतात! दिवसभर गावात असं अभ्यासमय वातावरण.
शाळेत ठेवलेलं बालसाहित्य, तक्ते आदी गोष्टी दोन्ही शिक्षक आळीपाळीने नेबरकट्ट्यासाठी नेतात. शाळाव्यवस्थापन समितीचं सहकार्य असतंच. नेबरकट्ट्यावर एकही मुलगा कॉपी करत नाही, हे सरांना चांगलं वाटतं. कॉपी न केल्याचा फायदा म्हणजे प्रत्येकाची नेमकी चूक कुठे आहे, ते समजतं. त्यावर काम करता येतं.
नियोजनाप्रमाणे प्रथम सत्राचा अभ्यास पूर्ण झाला. वेळोवेळी लहान चाचण्या घेऊन मूल्यमापन केलं आहे. हे मुलांना कागद पुरवूनच केलं. ऑनलाइन चाचणी घेतली नाही. ई-साहित्य मोजक्या ठिकाणी वापरलं. मोठा विद्यार्थ्यांची सात दिवस कार्यशाळा घेऊन उपक्रमांचे व्हिडिओ काढणं, लिंक ओपन करणं ही कामं शिकवली. या उपक्रमाची राज्याबाहेरही चर्चा झाली. ‘युवा यूथ’ या आंतराष्ट्रीय स्पर्धेतही नेबरकट्ट्याचा समावेश झाला. जगातल्या ३० पैकी दोन उपक्रम भारतातले, त्यात एक नेबरकट्टा आहे.
– सुलेखा नलिनी नागेश
Related