ll धडपडणारी मुलं ll‘उतनाही डालो थाली में व्यर्थ ना जाये नाली में’…

 

नांदेडचा दीपक बालाजी पवार हा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी. त्याचे वडील पोलिस दलात कार्यरत असून तोही छोटेखानी किराणा दुकान चालवतो. दरम्यान, त्याच्यावर ओढवलेल्या अपघाताच्या प्रसंगातून तो बेघर, मनोरुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी आपल्या सहकारी मित्रांसह पुढे आला आहे. दररोज रात्री मंगल कार्यालय, हॉटेल तसंच अन्य कार्यक्रमातील उरलेलं अन्न हे भुकेल्यापर्यंत पोचवण्याचं काम त्याने सुरू केलं आहे. यासोबतच मनोरुग्णांची स्वच्छता, बेघरांना वृद्धश्रमापर्यंत पोचवण्याचं कामही तो करतो. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबातील सदस्यही त्याच्यासोबत आहेत. या सगळ्यात दीपकला अनंत अडचणींना तोंडही द्यावं लागतं.


आपल्या अनुभवाबद्दल दीपक म्हणाला, “नांदेड शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, गर्दीच्या ठिकाणी बेघर, मनोरुग्ण, अंध, दिव्यांगाची संख्या मोठी आहे. यात काही जणांना घर असूनही केवळ मुलांशी जमत नसल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. तर काही जण इतर जिल्हा, परराज्यातूनही इथं चुकुन आले आहेत. बरेच जणांना आपण कुठून आलो हेच आठवत नाही. कित्येक दिवसांपासून त्यांनी दाढी, कटिंग, चांगले कपडे, अंघोळही केली नाही. अशा व्यक्तींच्या जवळ गेल्यावर त्यांची विचारपूस केल्यावर त्यांना भरुन येतं. महेश तेलंग, निरज मुदीराज, संतोष मेटकर, प्रथमेश कांबळे या सहकाऱ्यांसह सुरवातीला त्यांची कटिंग, दाढी, अंघोळ आणि चांगले कपडे घालून त्यांच्या मर्जीनुसार वृद्धाश्रमात सोडतो.

हे सर्व करत असताना आर्थिक चणचणही भासत होती. यावर उपाय म्हणून आम्हीच या गोष्टी शिकून घेतल्या. त्यामुळे दाढी, कटिंगवर होणारा खर्च वाचला. यांच्या जेवणासाठी कधी घरातून तर कधी मंगल कार्यालय, हॉटेल, अन्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन याठिकाणी उरलेले अन्न जमा करतो. त्याची पॅकिंग करून ते भुकेल्यापर्यंत पोचवतो. यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्थाही केली आहे. आता लोक स्वत:हून जास्तीचं अन्न तयार करून ते आम्हाला देतात. परंतु, वृद्धश्रमात सोडलेल्या व्यक्तींवर आजारपणात उपचार करण्यासाठी असो वा दिव्यांग, अंध व्यक्तीला बाहेरील जिल्हा व राज्य असलेल्या आश्रमात सोडण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागतं. त्यामुळे काम करताना मर्यादा येते.”
‘मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या’, ‘उतना ही डालो थाली में व्यर्थ ना जाये नाली में, कोई भुका ना सोपाये’, कुठे जरी कार्यक्रमाचे उन्न उरले असेल तर, नक्की संपर्क करा, आम्ही घेऊन जाऊ, हे सांगायला दीपक विसरत नाही.

– शरद काटकर,नांदेड

Leave a Reply