मार्चच्या शेवटी कोविड-१९ हा भारतात आपले अस्तित्व दाखवू लागला होता. सर्व काम-काज बंद करून, लॉक-डाऊन सुरु झालं. आलेली वेळ, काळ हे कधीच कोणीच कल्पना केली नव्हती. पण जसं -जसं परिस्थितीचं गांभीर्य कळायला लागलं सगळेजणं मदतीसाठी सरसावले. अख्या मुबंईत लॉक-डाऊन काळात कॉलेजच्या मुलांनी आपल्या मित्रांचे ग्रुप बनवून जे मदतीचे काम केलं ते पाहून, वाचून थक्क व्हायला होतं. त्यांनी आतापर्यंत ३,५०,००० च्या वर रेशन किट्स लोकांना वाटल्या. ७५ लाख जेवणाचे पॅकेट्स लोकांपर्यंत पोहचवले. ३५ लाखापेक्षा जास्त आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्यांचं वाटप केलं. कोविड-१९ मधून जवळपास ७५ लोकांना बरं केलं. १०००० पीपीई किट्स आणि १२ लाख मास्क, ५०००० पॆक्षा जास्त सॅनिटायझर्स वाटले. पोलिसांसोबत पोलीस मित्र बनून रस्त्यांवर उतरले. दहिसरच्या ठाकुर रामनारायण कॉलेज of arts and commerce पदवी कॉलेजचे आठ विद्यार्थी- देवांश चौधरी, ओम गिरी, करण चौधरी, अनिकेत अग्रवाल, प्रियम वर्मा, गोपाळ रायठठ्ठा, खुशबू डोसाणी आणि विनय चौरसिया ह्यांनी मुंबई विद्यापिठाच्या NSS (National Service Scheme) युनिट सोबत मिळून सुमित राठोड सर, सुशील शिंदे सर, रवीश सिंग सर, पुराणिक सर, “मेकिंग द डिफरेन्स फॉउंडेशन”चे दिपक विश्वकर्माजी, आणि “माय ग्रीन सोसायटी”चे सुशील जाजूजी ह्यांच्या मदतीने आजूबाजूला फिरून, लोकांत मिसळून काम सुरू केलं. घरात राहून कसा अंदाज घ्यायचा? नक्की काय चाललंय कसं कळणार म्हणून वस्तीमध्ये जाऊन सर्व बघायचं ठरलं.
गोपाळ रायठठ्ठा सांगतो, “फिल्डवर काम करताना पहिल्या आठवड्यातच मला जाणवलं की, मुंबईतील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचं सगळं आर्थिक गणित बिघडलं आहे. आपली अर्थव्यवस्था इतकी नाजूक झाली होती की ती कधीही ढासळू शकेल असं वाटत होतं. आपली व्यवस्था एक आठवडाही तग धरू शकत नाही हे बघणं खरंच दुःखद होतं. आपली व्यवस्था इतक्या सहजासहजी ढासळू नये यासाठीच मला काहीतरी करावंसं वाटू लागलं. आणि मी कामाला लागलो.”
आपल्यामुळे घरच्यांच्या जीवाला धोका नको म्हणून काही मुलं जी जास्ती-जास्त लोकांच्या संर्पकात येत होती त्यांनी दहिसरला फ्लॅट भाड्याने घेऊन राहायला सुरवात केली. स्वतःची पूर्ण काळजी घेऊन, immunity बुस्टर घेऊन, ग्लोव्हस घालून सोबत डॉक्टरांची टीम असे हे सारेजण दरररोज सकाळी सात ते आठच्या सुमारास कामाला निघायचे ते एकदम रात्री १२-१२.३०ला दहिसरला परतायचे.
पहिले फक्त ५०० लोकांना रेशन द्यायचे ठरवले. पण मदत इतकी जमली की ते १००० लोकांना देऊ शकले . किराणा घेण्याच्या मदतीला कोणी नाही, मग सर्वानी मिळून मेट्रो-बोरिवलीला सामान घेतलं आणि सामान ट्रकमध्ये भरलं. लोक आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी मग त्यांनी emergency help line नंबर सुरू केला. जेव्हा रेशन देण्यासाठी ते वस्त्यांमध्ये फिरत होते तेव्हा त्याना कळलं की नुसता किराणा देऊन काय उपयोग? हे सर्व रोजंदारी करणारे. ह्यांच्याकडे तर केरोसीन घ्यायला पण पैसे नाहीत, मग हे किराणा घेऊन अन्न शिजवणार तरी कसं? मग कम्युनिटी किचनची संकल्पना पुढे आली. पहिले अंधेरी, जे बी नगरला बगरका या महाविद्यालयात सुरु केले. असं करत मुंबईमध्ये सर्व ठिकाणी कम्युनिटी किचन मुलांनी सुरू केलं. जुलैपर्यंत सर्व ठिकाणी त्याचा जास्तीजास्त फायदा स्थलांतरित कामगार घेऊ शकले.
२४ सप्टेंबरला NSS दिवस असतो, तेव्हा ५००० रेशन किट्स मुंबई विद्यापीठ आणि डोनेट कार्ट या संस्थेच्या मदतीने कांदिवलीच्या ठाकुर महाविद्यालयात मुंबईच्या डब्बेवाल्यांना देण्यात आले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ५००० गणपती मुर्तिकारांनाही रेशन किट्स देण्यात आल्या. रायगड जिल्ह्यात, सुधागड तालुक्यात लोकांना औषधे पुरवली आणि वाडा तालुक्यात एका गावाला किराणा सामान दिले. खूप साऱ्या संस्थानी पैशाची आणि इतर मदत केली, जसे केशव सृष्टी, एस्सेल वर्ल्ड, रोटरी री क्लब, वनवासी कल्याण, इंटरनॅशनल लायन्स क्लब आणि आणखीही बऱ्या. पण या मुलांनी कसलीच पर्वा न करता ती मदत लोकांपर्यंत पोहचवली. मुबंई अगदी पिंजून काढली, जिथे-जिथे गरज होती तिथं ही टीम- ८ हजर व्हायची.
ह्या मुलांच्या कामाची दखल आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांनीही घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांनी सुद्धा ह्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. बोरीवली पोलिसांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.
किती जणांच्या दुवा, आशीर्वाद आम्हांला मिळाले ह्याची तर गणतीच नाही असं टीम मेंबर गोपाळ सांगतो. समन्वय साधणे, लोकांपर्यंत पोहचणे ह्या कामासाठी त्या सगळ्याजणांनी सांघिक कार्य कसं करावं याचं एक छान उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे. आम्हाला कधीही काहीही झालं असतं पण आता मागे हटायचं नाही, करोनापेक्षा माणुसकीचा, मदतीचा झरा हा न थांबणारा आहे हे दाखवून द्यायचं हेच मनात ठेऊन आज पण ह्या टीम- ८ चं काम चालू आहे.
– मेघना धर्मेश