जळगावचा आकाश धनगर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील समाजकार्य विभागाचा विद्यार्थी. एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक. कोरोनासाथीमुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून कॉलेजला पत्र आलं. यात एनएसएसच्या मुलांनी स्वयंसेवक म्हणून काम करावं असं आवाहन होतं. आकाश सांगतो, “‘नॉट मी बट यू’ हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेचा मी पाईक आहे. कोरोनाच्या संपूर्ण कालावधीत मला माझ्या परीने जे काही करता आलं ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.”
लॉकडाऊन झालं आणि सगळीकडेच भयावह परिस्थिती निर्माण झाली. लोक हतबल झाले होते. तेव्हा, घराघरात हिंडून लोकांची कोरोनाविषयीची भीती काढून टाकायचा प्रयत्न केल्याचं आकाश सांगतो. परराज्यातून खेळणीविक्रीसाठी आलेल्यांना, मजुरी, लहान-सहान कारागिरी करून पोट भरणार्यांना, तसंच फुटपाथवर राहणाऱ्या मजुरांना अन्न मिळत नाही, हे आकाशला समजलं. तेव्हा त्याने शंभर मुलांचा ग्रुप तयार करून भरारी फाऊंडेशन आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन महिने अन्नवाटप केलं. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. तसंच १०० स्वयंसेवकांकडून वैयक्तिक रक्तदान घेतलं. नंतर कोरोनामुक्त स्वयंसवेकांना प्लाझ्मा देण्यासाठी आवाहन केलं. कचरा वेचणाऱ्या महिलांना, हातमजुरी करण्याऱ्या लोकांना १५ दिवस किराणावाटप केलं. हे सगळं करताना मला कोरोना होईल, ही भीती माझ्या मनाला शिवलीच नाही, आकाश सांगतो. खरं तर, घरी नाजुक स्थिती होती. आकाशचे वडील मधुमेही, बहीण बाळंतपणासाठी माहेरी आलेली, छोटं बाळ घरात. त्यांना संसर्ग व्हायला नको म्हणून आकाश एक महिना शहरातील संभाजी नाट्यगृहात राहिला. आकाश सांगतो, शहरात घरोघरी जाऊन सर्व्हे करायचं काम मी हातात घेतलं होतं. अशातच दोन मित्रांना कोरोनाची लागण झाल्याचं कळलं. मग मात्र मी घरी जाण्याचंही टाळलं. जाणीवपूर्वकच हे घरच्यांना सांगितलंच नाही. कारण बहिणीप्रमाणेच मीही एकुलता आईवडिलांचा लाडका मुलगा असल्याने ते काळजीत होतेच. मन व्दिधा झालं. पण, आता पर्याय नव्हता.”
महसूल यंत्रणा, आरोग्यसेवा, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसंच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्सेनिक अल्बम ३० या अकरा लाख गोळ्या या मुलांनी वाटल्या. जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जैन इरिगेशनच्या माध्यमातून दोन हजार घरांत कोरोना माहितीपुस्तिकांचं वाटप केलं. आरोग्य सेतू आणि आय गॉट ॲप ही अधिकाधिक लोकांनी डाउनलोड करावीत म्हणूनही एनएसएसच्या मुलांनी प्रयत्न केले. आकाश म्हणतो, “ हा कोरोनाकाळ मला खूप काही शिकवून गेला. आपल्या गावाकडे जाण्यासाठी धडपडणाऱ्या मजुरांचे हाल पाहिले, अन्नाचं पाकीट मिळावं म्हणून भुकेने व्याकूळ झालेल्या फुटपाथवरच्या गरीब बिचाऱ्या मजुरांना पाहिलं. तसंच सारं काही जवळ असून त्याचा उपभोग घेता येत नाही अशा कमालीच्या भीतीदायक वातावरणात जगणारे लोकही पाहायला मिळाले.”
या काळात आकाशने जळगाव महानगरपालिका, अखिल भारतीय विद्यार्थी संघटना यांच्यासह 1,376 कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांची आरोग्यतपासणी करून घेण्यासाठी मदत केली. आकाश आणि बाकी स्वयंसेवक मित्रांनी रात्री जागून 5,000 मास्क घरी तयार करून परप्रांतीय, ग्रामीण भागातील मजुरांना, आरोग्यसेवा आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वाटले. आकाशच्या या कामाची दखल स्पंदन या स्वयंसेवी घेतली. आणि त्याला कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित केलं. तसंच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही युवा कार्यक्रम खेल. भारत सरकार (स्वच्छ भारत समर इंटर्नशीप प्रोग्रॅम) हा पुरस्कार मिळाला. अशी शाबासकी ऊर्जा देणारी असते. त्यामुळेच मी आजही माझ्या परीने काम करत असल्याचं आकाश सांगतो.
– वर्षा आठवले