कोणत्याही गावाचा बदल कसा होत गेला हे सांगायच झाल तर फार जुन्या काळात जायची गरज नाही. कारण, माझ्यामते गावांमध्ये पूर्वी काही जास्त बदल नाही झालेले आणि झालेही असतील तर ते क्रांतिकारक वगैरे असे बदल नव्हते. मग हे बदल टिपायचे झाले तर मागच्या मागच्या २५ – ३० वर्षातील बदल टिपावे लागतील. मोटार, टेलीफोन, टीव्ही, कॅम्पुटर आले पण गावात कुठ? हे सगळं गावात दाखल झाले पण १९९० च्या नंतरच. त्यापूर्वी आमच्या गावात एक राजदूत होती, तीही दोघांत मिळून एक. नंतर एक राजदूत आणि एक टीव्ही आला. देशाने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले आणि मग गावं सुद्धा शहरांसारखे झपाट्याने बदलायला लागली. मी ज्या बदलांचा साक्षीदार झालो किंवा ज्या गोष्टी ऐकत आलो आहे तो मागच्या २५ – ३० वर्षातील बदल मांडण्याचा प्रयत्न. माझ्या गावाच नाव पांगरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. जिंतूर – परभणी रोडवर.
पांढऱ्या मातीवर वसलेलं म्हणून पांढरी, हे नाव नंतर अपभ्रंश होऊन पांगरी झालं. आजही गावाला लागून एक शेत आहे ज्याला पांढरी म्हणून ओळखतात. गाव तसं प्राचीन. गावात एक महादेवाचं हेमाडपंथी मंदिर. आज त्याचा फक्त गाभाराच तेवढा प्राचीन आहे. बाकी नूतनीकरण केलेलं. गाव चांगलंच. पूर्वी आणि आताही. गावाची लोकसंख्या ३५०० तर मतदान १९००. गावात एकूण १५ -१६ वेगवेगळ्या जातींची ३ धर्माची लोक राहतात. गुण्यागोविंदाने. प्रत्येकाचा मुख्य व्यवसाय शेती तर काही शेत मजुरीवर अवलंबून.
प्रत्येक गाव बदलत जातं तशी माझी पांगरी सुद्धा बदलत गेली. हे बदल चांगले आणि वाईट असे दोन्ही होते. सन १९४० साली गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरु झाली. प्राथमिक शिक्षण सुरु झाले, तेव्हा माध्यमिकसाठी बाहेर गावी जावं लागायचं. पुढे गावात एक संस्था सुरू झाली. या संस्थेमुळे गावतल्या आणि जवळपासच्या दोन – तीन गावांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सोय झाली. गाव धार्मिक होते/आहे. गावातील बहुतेकांकडे जमिनी होत्या. पण मधल्या काळात व्यसनाधीनता एवढी वाढली की गावातील लोक जमिनी विकायला लागले. तालुक्याच्या ठिकाणी ज्यांना चांगल्या मोक्याच्या जागा होत्या त्या जागा विकल्या गेल्या. दारू, व्यभिचार, भांडण तंटे वाढत गेले. जिल्हा रुग्णालयात गाव रोगराई मध्ये अव्वल झाले. मी जेव्हा प्राथमिक शाळेत होतो तेव्हा शाळेचे शिक्षक जिल्हाभरातील माहिती घेऊन आम्हाला सांगायचे, आमच्या गावाची इतर गावांशी तुलना करून गावातील परिस्थिती सांगायचे तेव्हा वाईट वाटायचं. जिल्ह्यात गाव नको त्या गोष्टीसाठी गाजायला लागलं.
१९९० च्या काळात गावातील काही सज्जन लोकांनी पुढाकार घेऊन गावच्या धार्मिकतेला व्यसनमुक्ती, व्यायाम, अभ्यास, शिस्त या मूल्याची जोड दिली. वेळ लागला पण सकारात्मक बदल दिसू लागला. व्यसनाधीनतेकडे वळलेली तरुण पिढी रुळावर येत होती तर नवीन शाळकरी पिढी बदलाचे कारण बनू लागली. त्यावेळी शाळेत असणारे पुढाकार घेऊन गावात विविध कार्यक्रम राबवायला लागले. व्यसनमुक्तीची शिबिरे, मार्गदर्शनपर कार्यशाळा, गुणवंतांचा सत्कार, व्याख्याने या सारखे कार्यक्रम सुरु झाले. आणि आजही हे कार्यक्रम सुरु आहेत. बाहेरगावी असलेले गावचे लोक दिवाळीत परत येतात, गावच्या लेकीबाळी गावावर येतात तेव्हा कवितेचा पाडवा साजरा केला जातो ज्यात अनेक नामवंत कवींनी आपल्या प्रसिद्ध कविता सदर केल्या आहेत. या सर्व कार्यक्रमांचा उचित परिणाम दिसून येऊ लागला. गाव विकसित होऊ लागलं. लोकांना पुन्हा एकदा शिक्षण, संस्कार, शिस्तीचे महत्त्व कळायला लागलं. तेव्हा लोकांनी प्राथमिक शालेत सुधारणा करण्यासाठी वर्गणी जमा करून, लोक सहभागातून २,७६००० रुपये जमा करून काही कामे केली. शाळा डिजिटलकडे मार्गक्रण करू लागली.
ग्लोबलायझेशनचे परिणाम गावावर दिसू लागले. बीटी, जनुकीय तंत्रज्ञानाने विकसित बी – बियाणे, खते गावात यायला लागली, त्यामुळे उत्पन वाढून लोकांकडे पैसा आला. मोटारसायकल, टीव्ही या सारखी साधने वाढली.
गाव तालुक्याच्या जवळच असल्यामुळे शिक्षित तरुणाई तालुक्याच्या राजकारणात उतरली. गावच्या विकासासाठी झटू लागली. आमदार – खासदाराकडे प्रश्न, प्रस्ताव मांडून पाठपुरावा करू लागली. त्यामुळे गावचा विकास वेगाने झाला. तालुक्याच्या विविध राजकीय पक्षांचे नेतृत्व गावाकडे आहे. राजकारणात गावच्या व्यक्तीने पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्षपद, महानगर पालिकेत सदस्य, समित्यांचे सभापती असी पदे मिळवली. तर प्रशासनातही पोलीस, IPS, न्यायधीश, भारतीय सैन्य, शिक्षक, प्राध्यापक, पोस्ट खाते, वन खाते, प्रायवेट सेक्टर अशा विविध पदांवर स्वतःला सिद्ध केले आहे. राष्ट्रपती पदक मिळवले आहे. तालुक्यातील महत्वाच्या व्यवसायात काम करणारे बहुतेक कामगार हे माझ्या पांगरीचे आहेत. माझ्या गावकऱ्यांनी गावाला तालुका, जिल्हा लेवलला महत्त्व प्राप्त करून दिले.
मग आला कोरोना. या काळात शाळा बंद झाल्या, बहुतेकांची कामे गेले. कोरोना काळातील लॉकडाऊनने अनेक बदल घडवले. गाव सोडून शिक्षण, कामासाठी बाहेर गेलेले तरुण पुन्हा गावात परतले. शाळा, कॉलेज बंद असलेले मुले मोबाईलमध्ये गुंतली गेली, आयपीएल, क्रिकेट सट्टेबाजी, शेअर मार्केट, गेम्स यात अडकली तर बाकी अनेक पुन्हा व्यसनाधीन झाले. हे होत असतानाच लॉकडाऊनमध्ये काही सकारात्मक बदलही घडले. मुलांसाठी गावातील तरुणांनी लोक सहभागातून गावात एक ग्रंथालय सुरु केलं. लॉकडाऊन काळात गावातील छोटे शाळकरी ते म्हातारे लोक या ग्रंथालयात येऊन पुस्तकं वाचू लागले. शाळेत जाता येत नाही, अभ्यास होत नाही म्हणून गावकरी व शिक्षकांनी मिळून गावातील भिंती – भिंतीवर शालेय शिक्षणाचे फलक तयार केले. हे फलक मुलांना खेळता बागडता त्यांच्या शाळेची आठवण करून देऊ लागले. त्यांना अक्षर – मुळाक्षर, गणित, पाढे, दिशा, शैक्षणिक संज्ञा, व्यावहारिक संज्ञा, चिन्हे, भाषा, बोलीभाषा या सर्वांची माहिती देऊ लागले. मुले येता – जाता गणित – विज्ञान सुत्रे, खेळता – पळता कविता वाचू लागले. या फलकांमुळे भरकटलेल्या विद्यार्थ्यांना, अस्थिर झालेल्या मनांना एक आधार मिळाला. अभ्यासात सातत्य, शैक्षणिक वातावरण कायम राहिले.
याच काळात गावच्या फाट्यावरून जाणारा मुख्य रस्ता रुंदीकरण काम सुरु झाले. फाट्यावर असणारे १०० वर्ष जुने एकमेव वडाचे झाड तोडलं जाणार होतं. गावाने पुन्हा एकीचे प्रदर्शन करून ते झाड तोडण्याला विरोध केला. शाळकरी मुलांनी चिपको आंदोलन केलं. सुशिक्षित लोक, राजकारण्यांनी त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन झाड राखले. शेवटी संपूर्ण झाड न तोडता त्याच्या काही फांद्या तोडण्यात आल्या. तरुणांनी त्या तोडलेल्या फांद्या त्याच रोडच्या दोन्ही बाजूनी लावून आदर्श निर्माण केला. आज जिंतूर – परभणी रोडवर हा एकमेव वड उभा आहे. अशी ही माझी पांगरी तेव्हापासून वडाची पांगरी म्हणून ओळखली जाऊ लागली.
गणेश डुकरे, पांगरी, परभणी