ll मोट हाकलतो एक, जीव पोसतो कितीक ll

 

जूनच्या सुरुवातीला पूर्व मान्सून सुरू होतो. जोराचा वारा, धुळीचे लोट आकाशात नाचताना दिसतात. पाऊस कधी येईल हे शेतकरी अचूक जाणतो. नक्षत्र म्हणजे ‘न क्षरति’ जे नाश पावत नाही ते नक्षत्र. सत्तावीस नक्षत्रापैकी पावसाळ्याची एकूण नऊ नक्षत्र. मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त. हा खरिपाचा हंगाम. ८ जूनला मृग नक्षत्राचा पाऊस येतो. त्याअगोदर काही दिवस जोराचा वारा सुरू होतो, आकाशात वीज कडाडते, आभाळ काळकुट्ट होतं अन मन सुध्दा. पाऊस पडला म्हणजे शेतात चिखल व्हायला सुरुवात होते. चिखल झाल्यावर पेरणी करणं अवघड. काही दिवसात पाऊस येईल असा अंदाज घेऊन शेतात धूळपेरणी केली जाते. शेतात पाबर चालताना नृत्य करते असाच भास होतो. बियांना ओलावा मिळाला म्हणजे रुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पाऊस पडला. पहिल्या पावसात जमीन अधीर होऊन पाणी पिऊ लागली. झाडांची नवजात पालवी पहिल्या पावसात चिंब नाहत आहेत.

महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर हा पक्षांच्या विणीचा हंगाम. पक्षी पावसाचे पाणी चोचीत झेलत गाणी म्हणत आहेत. जोरात वीज पडायला लागली म्हणजे आजोबा घराच्या बाहेर किंवा शेताच्या झोपडी बाहेर लोखंडी अवजार ठेवायला लावत.जेणेकरून वीज आकर्षित होणार नाही. उन्हाळ्यात घरातील पाळीव जनावरांसाठी भक्कम गोठा बांधला जातो. पाऊस वाऱ्यापासून रक्षण व्हावं म्हणून आता संबंध पावसाळा ते तिथेच राहतात. गाईला वासरू झालं आहे. शेतात कामाला जाताना डोक्यात प्लॅस्टिकच्या गोणीची खोळ केली जाते. चौकोनी प्लास्टिकच्या गोणीचा वरील भाग दुसऱ्या भागात खोचून खोळ तयार होते. हीच शेतकऱ्यांची छत्री. पावसाच्या पाण्यावर चालणारा हंगाम शेतकऱ्यासाठी वर्षभर अन्नाची सोय करण्याचा अवसर.

कुणाची शेतं मोठी कुणाची लहान. प्रत्येकाच्या गरजेनुसार पेरणी केली जाते. ताटात भाकरी रोज लागते म्हणून ज्वारीच्या ओळी जास्त पेरल्या जातात. तेलासाठी भुईमुग, सूर्यफूल, करडई कडधान्ये उडीद,तुर, मुग,चवळी,राजमा ह्यांच्या दोन दोन ओळी पेरल्या जातात. कधी ज्वारीच्या मध्ये पावट्याची एखादी ओळ कधी शेताच्या आजूबाजूने. मधे मधे मका पेरला जातो. जेणेकरून ताट मोठी झाल्यावर पक्षी त्यावर बसून शेतातील किडे खातात. मका भराभर वाढतो अन् जनावरांसाठी कोवळा चारा मिळतो.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर टोकलेल्या फळभाज्या जमीन भेदून वाढू लागल्या आहेत. आता त्यांना मांडव घालण्याची गरज आहे. मांडवाच्या आधाराने वेली सरसर वाढतात. पहिल्या पावसामुळे त्याचा जोश अजून वाढला आहे. पावसाने सगळ्याच सृष्टीला आई बनवलं प्रत्येक गोष्टीतून अभ्रक जन्माला येतं. आठवड्यात निसर्ग फुलायला लागतो. गावातील ओढ्यांजवळ, परसबागेतील डबक्यात बेडकांची डराव डराव सुरू झाली आहे. त्यांच्या मिलनाची हीच वेळ. बांधावर गवत उगवून येत आहे. झाडाचा हिरवा रंग डोळ्यांना वेगळाच भासत आहे. सकाळी कामाला गेलेली मंडळी संध्याकाळी येताना चिंब भिजून येत आहेत.अजूनही काही ठिकाणी पेरणी चालूच आहे. यंदा चांगलं पीक मिळेल अशी आशा सालाबादप्रमाणे शेतात बाळगून आहे. शेतात पेरलेले सोनं हळूहळू डोकं वर काढत आहे. सकाळची कोवळी किरणं कोंबावर पडलेली पाहून बळीराजाला त्यांची नजर काढावी असं नक्की वाटत असणार. आता पाऊस सारखा अंगाशी खेळत आहे. नदी नाले तांबूस चहा सारखे दुथडी भरून वाहात आहेत.

हळूहळू पाऊस वाढत जाईल. दिवसांमागे शेतातील वनस्पती वाढत जातात, त्याच अन्नातील भाग बनत जातात. नदीला पाणी वाढून मासे सापडायला लागतात. दिवसभर पाण्यात भिजून शेतकरी आजारी पडतो, पण निसर्गात औषधं तयार असत. ते औषधं प्रत्येक शेतकरी जाणतो. पिढ्यानपिढ्या ते पुढे जात असत.

Leave a Reply