पोट दुखाया लागंल, वात पकडील पाय l ‘आम’ दवाची पिऊन, नळदुर्गाचा उपाय
येळ जवळ यायली, टाका कणगीत सोनं l रोपा रोपात नजर, काळ्या आईच त्ये देणं
भोगी येईल घरात, वशाटाच(मांसाहार) नाव सोड l वांग, गाजर, मटार, तीळ गूळ गोड गोड
केसांना लावायचं तेल विरघळलेलं नाही म्हणून तेलाची बाटली चुलीपाशी निजली आहे. बोलताना तोंडातून वाफा निघत आहेत. थंडी अजूनही अंगातून जाते न जाते तोच शेताच्या बोरीखाली बोर वेचणाऱ्याची फौज जमा झाली. गाभूळलेल्या चिंचेचा वास चुलीतून येत आहे. खोकला होऊ नये म्हणून, पेरू देखील चुलीत भाजून मग दिला जायचा खायला. शरीरातील उष्णता वाढण्यासाठी, रक्ताचा प्रवास व्यवस्थित व्हायला हवा, ही सगळी फळं, सुरळीत प्रवासाची सोय करतात. वाताचा त्रास होऊ नये म्हणून नळदुर्गाच्या पानावर तांदळाचं पीठ घालून केलेल्या वड्या उत्तम. सकाळी घरातील बाई हरभऱ्याची भाजी काढण्यापूर्वी आदल्या दिवशी त्यावर धोतर टाकते. हरभऱ्याच्या भाजीवरील दव धोतर पिऊन टाकी. तेच पाणी, एका कल्हई केलेल्या भांड्यात हवाबंद केल जातं. असं हे ‘आम’ पोटात दुखलं की, दिलं म्हणजे, पोटदुखी गायब. आता पिक अर्ध्या वयाचं झालं आहे. पुढच्या वर्षासाठी लागणारी धान्ये निवडून ठेवायला हवीत. शेतात कुठेतरी एखाद दुसरी ज्वारीची कणसं चांगली सहा फुटापेक्षावर जाऊन बियांनी लदबदली आहेत. हरभऱ्याचा शेताच्या कोपऱ्यावर असलेला डडाळा भरलेला दिसतोय. उडीदाला चांगल्या शेंगा लागल्या आहेत. तो सशक्त गहू नुसता लांबून पाहिला तरी पैलवान दिसतो. हीच ती पुढे नेणारी पिढी. धोतराची किंवा लुगडीची चिंधी लावून पिढीवर शिक्कामोर्तब केला जातो. ही पिढी म्हणजेच शाळकरी पोर.
पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तीन महिन्याची पिकं अर्ध्यावर आली असताना फळभाज्यांनी शेतं भरून जातात. अजून दीड महिन्यांनी कापणी सुरु होईल. कुंभारीण येऊन राजाला संक्रातीला लागणारी लहान मडकी देऊन जाते. भोगीच्या दिवशी हरभरा, वाटाणा, गाजर, पावटा एकत्र करून तिळाचे कूट टाकून भाजी बनवली जाते, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी जिभेला भुलावत ठेवते. पाच लहान मडक्यात ऊस, बोर, हरभरा, वाटाणा, गहू, तीळ ठेवून ववसा दिला जातो. काळ्या आईचे उपकार शेतकरी असेच मानतो. पावसाने, धरणीने, सूर्याने दिलं म्हणून ही समृद्धी आली. म्हणून राजाकडून पहिला ववसा पाण्याला, दुसरा ववसा रवीला, तिसरा ववसा सूर्याला. शेती आपल्याला कृतज्ञता शिकवते.
मकरसंक्रातीला आपल्या शेतातील वाण (ऊस, बोर, हरभरा, वाटाणा, गहू, तीळ) बायका एकमेकींना देतात. गुऱ्हाळात काढलेला गूळ आणि तीळ एकत्र करून लाडू बनवले जातात. थंडीतला गारठा काही कमी होत नाही म्हणून तिळाचे लाडू खाऊन गोड गोड बोलून शरीर उष्ण ठेवलं जातं. मकरसंक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. असं म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात. हळूहळू थंडी कमी होईल. धान्याची आरास लागायला सुरुवात होईल. मागच्या वर्षीच्या कणग्या तपासण्याची वेळ आहे. जूनं नवं झालं का? असं प्रत्येक स्त्री एकमेकीला विचारते. चैत्राची चाहूल लागली आहे. मागच्या वर्षी राहिलेला गहू आंबवून कुरडई करायची, उडीदाचं पीठ दळून पापड बनवायला हवेत. चण्याच्या आणि मटकीच्या डाळीचे सांडगे तर पाहिजेतच. खुसखुशीत तांदूळ पापड जेवताना पानाची शान वाढवतील. आता प्रत्येक घरातलं जुनं धान्य नवं व्हायला सुरुवात होईल.
पण हे नवं धान्य कसं, कुठे आणि कधी साठवलं जातं? होळीचा वसंताशी संबध आहे का? आणि पावसाशी?
ते पुढील भागात…