ll रक्त तपासणीः केव्हा? कशासाठी? ll लहान मुलांना होणारा कॅन्सर (भाग 2)

न्यूरोब्लास्टोमा- हा कॅन्सर नर्व्ह सेल्समुळे होतो. साधारण कुटुंबामध्ये कोणाला तरी हा ट्युमर असतो. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत हा कॅन्सर दिसून येतो. पोटात, छातीमध्ये किंवा डोक्यामध्ये होतो.
लक्षणे- पोटात असल्यास पोटात दुखते, डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन, पोटात गाठ येते.
छातीमध्ये असल्यास छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे.
आणखी काही लक्षणे


डोळे खोबणीतून बाहेर येणे, त्वचेखाली गाठ येणे, वजन कमी होणे, ताप येणे, हाडांत दुखणे
निदान- निदान मुख्यत: MRI, CT स्कॅन ह्याने होते. बायोप्सी करून नक्की केले जाते.
ट्रीटमेंट: केमोथेरपी किंवा आधी केमोथेरपी देऊन ट्युमरचा आकार लहान केला जातो आणि नंतर सर्जरी करून ट्युमर काढला जातो.
विल्म ट्युमर: हा एका किंवा दोन्ही किडनीमध्ये होतो. साधारण 3 ते 4 वर्षांच्या मुलांमध्ये होतो.
लक्षणे: पोटात गाठ येणे. ताप येणे, पोट दुखणे, मळमळणे, भूक न लागणे ही आणखी काही लक्षणे आहेत.
निदान- CT स्कॅन, MRI, बायोप्सी
ट्रीटमेंट: केमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी केल्यास पूर्ण किडनी काढली जाते.
लिंफोमा
हा लिंफोसाईट्स म्हणजे पांढऱ्या पेशींचा कॅन्सर आहे. लिंफ नोड, थायमस, टॉन्सिल ह्या अवयवात गाठ येते.
लक्षणे- ताप येणे, वजन कमी होणे, अशक्तपणा, मानेत, काखेत, जांघेत गाठी येणे
निदान- FNAC- ह्यात सुईच्या साहाय्याने गाठीतील द्रव्य काढून ते तपासतात. लिंफोमाची शक्यता वाटली तर बायोप्सी करून कन्फर्म करतात. ह्याशिवाय CT स्कॅन, MRI ह्या चाचण्या जर ह्या गाठी पोटाच्या आतमध्ये असतील तर करतात. मात्र ह्याचे अनेक प्रकार आहेत. नक्की निदान होण्यासाठी बायोप्सी करावीच लागते.
उपचार- केमोथेरपी, रेडिएशन


रॅबडोमायोसारकोमा: हा ऐच्छिक स्नायूंचा कॅन्सर आहे. लहान मुलांमधील सर्वात मोठया प्रमाणावर होणारा हा कॅन्सर आहे. वयाच्या 2 ते 6 वर्षांपर्यंत हा होतो.
लक्षणे- ह्यामध्ये जिथे स्नायू आहेत अश्या ठिकाणी गाठ येते.
निदान- बायोप्सी करून ह्याचे निदान होते
उपचार- केमोथेरपी, रेडिएशन आणि सर्जरी
रेटायनोब्लास्टोमा:
हा डोळयांच्या आतल्या पडद्याचा कॅन्सर आहे.
हा एका किंवा दोन्ही डोळ्यांना होऊ शकतो. आपण ज्याला डोळ्यातला पडदा म्हणतो, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिसतात त्याचाच हा कॅन्सर असल्याने ह्यात दृष्टी जाते. कॅन्सर असल्यामुळे वाढत जाऊन मेंदूपर्यंत जाऊ शकतो म्हणून निदान झाल्यावर डोळा काढावा लागतो.
लक्षणे-
डोळ्याच्या बाहुलीमध्ये पांढरा प्रकाश दिसणे.
डोळे वेगवेगळ्या दिशेला बघत आहेत असे वाटणे.
दृष्टी कमी होणे, डोळा लाल होणे, डोळ्याचा भाग सुजणे
निदान- डोळ्यात पांढरा प्रकाश दिसणे ह्याने निदान होतंच. MRI टेस्टमुळे तो डोळ्याच्या पुढे पसरला आहे का ते समजते. ह्यात बायोप्सी केली जात नाही.
उपचार: शक्यतो डोळा वाचवण्यासाठी केमोथेरपी किंवा रेडिएशन देऊन ट्युमरचे आकारमान कमी केले जाते आणि नंतर क्रायोथेरपी किंवा लेझर थेरपीने उरलेला ट्युमर काढून टाकला जातो.
खूप जास्त वाढला असेल पण डोळ्यापुरता मर्यादित असेल तर डोळा काढून बरा होतो. काढलेल्या डोळ्याच्या जागी कृत्रिम डोळा बसवला जातो मात्र त्यात दृष्टी नसते.
हाडांचा कॅन्सर (ऑस्टिओ सारकोमा)
हा कॅन्सर 10 ते 20 वर्षांच्या मुलांना होतो.
लक्षणे-


हाडांत दुखणे, तो भाग सुजणे
थोड्याश्या धक्क्याने हाड फ्रॅक्चर होणे
खूप थकवा आणि वजन कमी होणे
निदान: एक्सरे, सीटी स्कॅन, बायोप्सी
उपचार-
लवकर लक्षात आल्यास रेडिएशन देऊन बरा होऊ शकतो,
हाडाच्या थोड्या भागातच असेल तर ट्युमर आणि आजूबाजूचा भाग काढून टाकतात. नंतर रेडिएशन देतात.
खूपच जास्त पसरला असेल तर हात किंवा पाय कापावा लागतो व त्यानंतर रेडिएशन द्यावे लागते.
कॅन्सर पेशन्ट 5 वर्षे जगला तर तो बरा झाला असे म्हणतात. ह्यावरून ह्या रोगाचे गांभीर्य समजून येईल. लहान मुलाच्या बाबतीत 5 वर्षे म्हणजे खूपच कमी काळ असतो. त्यामुळे लहान मुलाला कॅन्सर होणे हे गंभीरच आहे. टाळण्यासाठी फारसे उपाय नाहीत मात्र फॅमिली हिस्टरी असेल तर काही जेनेटिक टेस्ट करून मुलाला कॅन्सर होण्याचा धोका किती आहे हे कळू शकते. मग जास्त धोका असल्यास मूल होऊ न देणे, दत्तक घेणे हेच उपाय असू शकतात.

– डॉ. मंजिरी मणेरीकर

 

Leave a Reply