ll रक्त तपासणीः केव्हा? कशासाठी? ll युरिन इन्फेक्शन

रेखा, माझी मदतनीस मला सांगत होती, ताई मधून मधून लघवीच्या जागी जळजळ होते, सारखं सारखं लघवीला जावं लागतं. कधी कधी दुखतं सुद्धा तिकडे आणि पोटातही दुखतं.
हीच तक्रार माझ्या काही मैत्रिणींची आणि वयस्कर काकूंचीही असते.
याचं कारण म्हणजे मूत्रमार्गाचे इन्फेक्शन. (Urinary tract infection).
इन्फेक्शन म्हणजे बॅक्टरीयाचा संसर्ग. मूत्रमार्ग या शब्दात बरेच अवयव येतात. किडनीज(मूत्रपिंडे), युरेटर (मूत्रवाहक नलिका), युरिनरी ब्लॅडर (मूत्राशय) आणि युरेथ्रा (मूत्र उत्सर्जक नलिका).
ह्यापैकी किडनीमध्ये लघवी तयार होते आणि ती मूत्राशयात साठवली जाते. मूत्राशय भरलं की आपल्याला ती बाहेर टाकण्याचे वेग येतात. त्यावेळी जर योग्य परिस्थिती नसेल तर आपण ते टाळतो. मात्र एक मर्यादेनंतर आपण ती थोपवू शकत नाही. मग मात्र कंट्रोल जाऊ शकतो.
हे झालं निरोगी माणसाच्या बाबतीत.


नैसर्गिकरित्या मूत्रमार्गात एकही बॅक्टरीया नसतो. मात्र स्त्रियांमध्ये योनीमार्गाचे तोंड, मूत्रनलिकेचे तोंड आणि गुदद्वार हे तिन्ही अगदी जवळ जवळ असतात आणि योनीमार्ग आणि गुदमार्ग ह्या दोन्हीमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टरीया असतात. त्यांना उपकारक बॅक्टरीया म्हणतात. मात्र ते मूत्रमार्गात शिरून तिथे वाढल्यास उपकारक न राहता अपायकारक होतात. आणि मग त्रास सुरू होतात.
ह्याचा अर्थ हे इन्फेक्शन युरेथ्रा पासून सुरू होऊन वर जाते. पुरुषांमध्ये युरेथ्रा हा पेनिस मध्येच असतो त्यामुळे तो गुदद्वारापासून लांब असतो. स्त्रियांमध्ये मात्र शौचानंतर तो भाग साफ करताना युरेथ्रा मध्ये जंतू जाऊ शकतात. त्यानंतर पाणी कमी पिणे, वेग येताच लगेच लघवीला न जाणे वगैरे कारणांनी इन्फेक्शन वाढते.
जेव्हा एखाद्या ठिकाणी बॅक्टरीया वाढतात तेव्हा रक्तातील पांढऱ्या पेशी तिथे जातात तसेच थोड्या तांबड्या पेशीही जातात. त्या भागाला सूज येते त्यामुळे दुखणे सुरू होते. हे सर्व शरीराचे इन्फेक्शन कमी करण्याचे उपाय आहेत पण त्यामुळे काही लक्षणे दिसतात.
1 लघवी करताना दुखणे, जळजळणे
2 जास्त वेळ लघवीला जावे लागणे
3 पोटात, ओटीपोटात दुखणे
4 पांढरट, दुर्गंध येणारी लघवी होणे
5 शरीर संबंधाच्या वेळी दुखणे
6 ताप येणे, थकवा
7 उलटी येणे
पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, मुतखडा ह्या कारणांनी मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होऊ शकते. तसेच डायबेटिस हे कारण सर्वांनाच लागू आहे. लघवीमध्ये शुगर असेल तर बॅक्टरीया भराभर वाढतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो.
Cystitis किंवा मूत्राशयाचे इन्फेक्शन: युरेथ्राच्या इन्फेक्शनवर लवकर उपाय न झाल्यास ते मूत्राशयापर्यंत पोचते.
माझ्या लॅबमधली टेक्निशियन लग्नानंतर हनिमूनला जाऊन आली. काही दिवसांतच मला विचारू लागली मॅडम पोटात खूप दुखते, लघवीला जळजळते. तिची लघवी तपासली तर पस सेल्स खूप जास्त होत्या. पोटात दुखणे हे लक्षण मूत्रशयापर्यंत संसर्ग गेल्याचे दाखवते. ह्याला नावच मुळी हनिमून सिस्टायटीस असं आहे. प्रथमच शरीर संबंध झाले की योनीमार्गातील जंतू सहज मूत्रमार्गात जातात आणि मूत्राशयापर्यंत पोचतात.
पायलोनेफ्रायटीस म्हणजे किडनीचे इन्फेक्शन. हे बरेचदा स्टोनमुळे होते. पण मूत्राशयापासूनही होऊ शकते. हे मात्र खूप गंभीर असते.
ह्यामुळे किडनी फेल होऊ शकते. त्यामुळे वेळीच उपचार घेणे चांगले.
निदान:
1 युरिन रिपोर्ट: ह्यामध्ये सकाळची पहिली लघवी लॅबमध्ये दिल्यास त्यात पस सेल्स आणि तांबड्या पेशी असल्या तर इन्फेक्शन असू शकते.
2 युरिन कल्चर: ह्यासाठी निर्जंतुक डबीत लघवीचे सॅम्पल सुरुवातीचे आणि शेवटचे सोडून मधले (mid stream) द्यावे लागते. ह्यामध्ये कोणत्या बॅक्टरीयाचे इन्फेक्शन आहे आणि त्यावर कोणती अँटी बायोटिक उपयुक्त आहेत ते समजते.
या दोनच टेस्ट साधारणपणे आवश्यक असतात पण जर औषधांनी बरं वाटत नसेल तर
Cystoscopy, सोनोग्राफी किंवा CT स्कॅन सुद्धा करावा लागतो.
उदा. स्टोन असेल तर यामुळे समजतो आणि मग तो काढला की इन्फेक्शन आपोआप बरे होते.
उपचार:
1 पाणी जास्त पिणे
2 अँटी बायोटिक: कल्चर आणि सेन्सिटीव्हीटी टेस्ट करून जी अँटिबायोटिक उपयुक्त आहेत तीच डॉक्टर लिहून देतात. त्यांचा सांगितलेला डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. जरा बरे वाटल्यावर औषधे सोडून दिल्यास जंतू पुन्हा पुन्हा वाढतात.
अर्धवट उपचार सोडल्यास बॅक्टरीया त्या औषधांना रेझिस्टंट होतात त्यामुळे पुन्हा इन्फेक्शन झाल्यास वरची अँटीबायोटिक घ्यावी लागतात. ती खूप महाग असतात.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावे?
1 शौचानंतर आणि पाळीच्या वेळी स्वच्छता: ही अतिशय महत्त्वाची आहे. पॅड वेळोवेळी बदलणे, शौचानंतर गुदभागाला लागलेला हात मूत्रमार्गाला लागू न देणे. ह्यासाठी स्त्रियांना आपल्या गुप्त भागाची माहिती असणे गरजेचे आहे. हे लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे.
3 पाणी जास्त पिणे: ह्यामुळे जास्त लघवी तयार होऊन चुकून थोडे जंतू वर आले असतील तर निघून जातील.
युरिन इन्फेक्शनला उन्हाळे लागणे असंही म्हणतात. उन्हाळ्यात लघवी कमी तयार होते म्हणून इन्फेक्शन लगेच होते.
4 मूत्र उत्सर्जनाचे वेग आल्यावर लगेच जाणे, शरीर संबंधाआधी आणि नंतर लगेच मूत्र विसर्जन करणे आणि तो भाग पाण्याने धुवून साफ करणे.
5 खूप घट्ट आणि नायलॉन किंवा सिंथेटिक अंतर्वस्त्रे न घालणे. कॉटनची अंतर्वस्त्रे घातल्याने मूत्रमार्गाजवळ ओलसरपणा साठून राहत नाही.
सारांश: स्त्रियांना मूत्रमार्गाचे इन्फेक्शन वारंवार होते. पहिल्यांदा होईल तेव्हाच नीटपणे उपचार घ्यावेत आणि नंतर ते टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. ह्यामुळे पुढची गुंतागुंत टळू शकते.

– डॉ मंजिरी मणेरीकर

 

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading