ll रक्त तपासणीः केव्हा? कशासाठी? ll पुरुषांमधील ऍनिमिया

खूप वर्षे झाली. माझ्या एका काकांना रक्त कमी आहे म्हणून रक्त द्यावे लागले असे मला कळले. पुरुषांमध्ये रक्ताची कमी हे गंभीर लक्षण आहे असे मी शिकले होते. त्यामुळे माझ्या मनात कॅन्सरच्या शंकेची पाल चुकचुकली आणि ती खरीही ठरली. त्यांना जठराचा कॅन्सर झाला होता आणि स्टूलमधून रक्त जात होते. दुसरे माझे एक काका मला म्हणाले, “अगं, माझे हिमोग्लोबिन कमी होतंय.” मी जिथे काम करत होते त्या लॅबमध्ये मी त्यांचे स्टूल तपासले तर त्यातून रक्त जात होते. त्यांना पाईल्सचा त्रास असल्याचे निदान झाले आणि ऑपरेशन करावे लागले. नंतर माझ्या एका शिक्षकांना युरिनमधून रक्त जातंय असं कळलं आणि त्यांना मूत्राशयाचा कॅन्सर निघाला.
पुरुषांमध्ये मासिक पाळीमधील रक्तस्रावाचा प्रश्नच नसतो आणि त्यांचे खाणेही व्यवस्थित असते.
त्यामुळे पुरुषांमध्ये ऍनिमिया असेल तर डॉक्टर त्याकडे धोक्याचा इशारा म्हणूनच बघतात.
गुदद्वार (स्टूलमधून), मूत्रमार्ग (युरिन), तोंड (रक्ताची उलटी, खोकल्यातून येणारा कफ )अश्या अनेक मार्गांनी रक्त शरीराबाहेर जाऊ शकते. शिवाय काही रोगांत- उदा किडनीचे रोग – रक्त कमी तयार झाल्याने ऍनिमिया होतो.


ह्यातली सर्व कारणे स्त्रियांनाही लागू आहेत पण पाळी चालू असेपर्यंत योनीमार्गातून होणारा रक्तस्त्राव आणि आहारातील कमतरता हीच मुख्य कारणे असतात. ती नाहीत हे सिद्ध झाल्यास ह्या गंभीर कारणांचा विचार करावा लागतो.
ऍनिमियामध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टेस्टसबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ऍनिमिया हे अनेक आजारांमधील एक लक्षण आहे.
पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन 13 ग्राम पेक्षा कमी असेल तर ऍनिमियाचे निदान होते. त्यानंतर त्याचे कारण शोधण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात. CBC म्हणजे कम्प्लिट ब्लड काऊंट ही टेस्ट करावीच लागते.
त्यानंतरच्या टेस्ट मी आजारांप्रमाणे सांगते.
1) आधी एक त्यातल्या त्यात साधा ऍनिमिया म्हणजे अल्कोहोलीक लोकांना होणारा ऍनिमिया: अल्कोहोलमुळे फॉलिक ऍसिडचे शोषण होत नाही आणि ऍनिमिया होतो. ह्यात दारू पिण्याची हिस्टरी आणि CBC ह्या टेस्ट निदानास मदत करतात. रक्तातील फोलेटची पातळी निदान कन्फर्म करतात.
2) वेगवेगळ्या इन्फेक्शन मुळे होणारा ऍनिमिया:
युरिन इन्फेक्शनमध्ये युरिन मधून तांबड्या पेशी जातात, डिसेंटरी, जंत ह्यामुळे स्टूलमधून रक्त जाते. टी बीमध्ये फुप्फुसे खराब झाली की थुंकीतून (खोकल्यावर येणाऱ्या कफातून) रक्त जाते. ह्यासाठी लक्षणांनुसार युरिन, स्टूल थुंकीची तपासणी केल्याने निदान होते. मलेरिया मध्ये तांबड्या पेशींचा नाश झाल्याने ऍनिमिया होतो. रक्त स्लाईडवर घेऊन तपासल्यास निदान होते.
3) किडनीचे आजार: किडनी एरिथ्रोपॉएटिन नावाचे एक हॉर्मोन तयार करते जे तांबड्या पेशी तयार करण्यास मदत करते. किडनीच्या रोगात (बराच काळ झाल्यास) ह्यामुळे ऍनिमिया होतो. युरिया, क्रिऍतटीनिन ह्या टेस्टस मधून किडनीच्या रोगाचे निदान होते. तसेच किडनी स्टोनमध्ये युरिन मध्ये रक्त जाऊन ऍनिमिया होतो. ह्याचे निदान एक्सरे, अल्ट्रासाउंड ह्याने होते.
4) वेगवेगळे कॅन्सर: जठर, लहान व मोठे आतडे ह्यांच्या कॅन्सरमध्ये अन्नपचन नीट होत नाही व स्टूलमधून रक्त जाते. ह्या कारणांनी ऍनिमिया होतो. रक्त असलेले स्टूल डांबरासारखे काळे असते आणि लॅबमध्ये रक्ताची टेस्ट पॉझिटिव्ह येते. कॅन्सरचे निदान तोंडातून वा गुदद्वारातून दुर्बीण घालून त्या साहाय्याने बायोप्सी करून होते. कोलायटीस, क्रोन्स डिजिज इ मध्येही ऍनिमिया होतो. त्यांचे निदान सुद्धा बायोप्सीने होते. घसा व अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये अन्न गिळू न शकल्याने ऍनिमिया होतो. सर्वांचे निदान बायोप्सीने होते.
जठरातील आणि आतड्यातील अल्सर मध्येही स्टूल मधून रक्त जाऊन ऍनिमिया होतो. तोंडातून दुर्बीण घालून तपासणी व बायोप्सीमुळे निदान होते.
मूत्राशय, किडनीच्या कॅन्सरमध्ये युरिन मधून रक्त जाऊन ऍनिमिया होतो. ह्याचे निदानही अल्ट्रासाऊंड आणि बायोप्सीने होते.
5) रक्ताची उलटी: काही वेळा अल्सर फुटणे, अल्कोहोलमुळे अन्ननलिकेच्या शिरा तुटणे ह्यामुळे रक्ताची उलटी होते. ह्यात बरेचदा आधी निदान झालेलेच असते आणि ह्यानंतर मृत्यू येतो. पेशन्ट जिवंत राहिल्यास दुर्बिणीतून तपासणी करून निदान होते.
6) रक्ताचा कॅन्सर: वयस्कर व्यक्तींमध्ये सहज CBC केल्यास पांढऱ्या पेशींचे काऊंट लाखाच्या वर असेल तर ल्युकेमियाचे निदान होते. बोन मॅरो टेस्टने कन्फर्म होते.
अश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या आजारांत पुरुषांना ऍनिमिया होतो.
लॅबमध्ये पुरुष पेशन्टचे हिमोग्लोबिन कमी आले तर आधी पुन्हा सॅम्पल घेऊन कन्फर्म करावे लागते. त्याला काय त्रास होतोय वगैरे विचारून पुढील टेस्ट करण्याचा सल्ला घ्यावा लागतो. त्यामुळे लवकर निदान होऊन उपचारांनी रोग बरा होण्याची शक्यता वाढते.

– डॉ. मंजिरी मणेरीकर

 

Leave a Reply