ll रक्त तपासणीः केव्हा? कशासाठी? ll

लहान मुलांना होणारा कॅन्सर (भाग 1)
‘चिनी कम’ सिनेमात छोट्या मुलीला कॅन्सर झालेला दाखवलाय. ‘मिली’ सिनेमात जया भादुरीला म्हणजे नायिकेलाच कॅन्सर झालेला दाखवलाय. ‘आनंद’ सिनेमा तर बऱ्याच जणांनी अनेकदा पाहिला असेल. ‘श्वास’ सिनेमात छोट्या मुलाला डोळ्याचा कॅन्सर झालेला दाखवलाय. मी टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना रक्ताचा कॅन्सर झालेली मुलं पाहिली आहेत. केमोथेरपीमुळे त्यांचे केस पूर्णपणे गळालेले असायचे. आधीच कॅन्सर म्हणजे मृत्यू हे समीकरण आपण मनात तयार केलेलं असतं. त्यात तो लहान मुलाला झाला की फारच वाईट वाटतं.


हा रोगही तसाच आहे. ह्या रोगात एखाद्या अवयवात पेशींचा गोळा तयार होतो आणि तो वाढतच राहतो. नॉर्मल पेशींचे रक्त आणि त्यातून येणारी पोषक द्रव्ये तो स्वतःकडे खेचून घेतो. कॅन्सर म्हणजे खेकडा. त्याला 6 पाय असतात. तसाच कॅन्सर 6 मार्गांनी पसरतो. म्हणजेच ब्रेस्टमध्ये सुरुवात झाली तर तो रक्तात शिरून पार लिव्हर, ब्रेन पर्यंतही जाऊ शकतो. म्हणूनच सगळे त्याला घाबरतात. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे हा चाळीशीच्या पुढचा रोग आहे. तरी लहान मुले आणि तरुणांनाही तो होऊ शकतो.
लहान मुलांमध्ये ठराविक प्रकारचे कॅन्सरच दिसून येतात.
1 ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर
2 मेंदू आणि मज्जारज्जूचे कॅन्सर
3 न्यूरॉब्लास्टोमा (नर्व्हचा कॅन्सर)
4 विल्म ट्युमर (किडनीचा कॅन्सर)
5 लिंफोमा (लिंफ नोडचा कॅन्सर)
6 रॅबडोमायोसारकोमा (ऐच्छिक स्नायूंचा कॅन्सर)
7 रेटायनोब्लास्टोमा (डोळ्याच्या पडद्याचा कॅन्सर)
8 बोन म्हणजे हाडाचा कॅन्सर
रक्ताचा कॅन्सर: ह्यासाठी साधी टेस्ट म्हणजे CBC. पांढऱ्या पेशी लाखाच्या घरात असतात. हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स कमी होतात. लहान मुलांतील ब्लड कॅन्सर साधारण 6वर्षे वयापर्यंत होतो. हिरड्या सुजणे, ऍनिमिया, रक्तस्त्राव, तोंडात आणि घशात इन्फेक्शन, ताप, अशक्तपणा, डोकेदुखी ही लक्षणे असतात. CBC मध्ये शक्यता वाटली तर बोन मॅरो टेस्ट कन्फर्म करण्यासाठी आवश्यक आहे. एकदा निदान झाल्यावर तो पुढे कोणत्या अवयवात गेलाय हे बघायला वेगवेगळ्या हाडांचे एक्सरे(जिथे दुखत असेल त्या), मेंदूसाठी डोक्याचा सीटी स्कॅन, पाठीतून पाणी काढून तपासणी वगैरे करावी लागते.
उपाय: ह्याला केमोथेरपी हाच उपाय आहे. प्लेटलेट्स कमी असतील तर त्या द्याव्या लागतात. बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे बरा होण्याची शक्यता वाढते.
मेंदू आणि मज्जारज्जूचे कॅन्सर- मेंदूचा ट्युमर नवजात बाळात किंवा त्यानंतर लगेचच समजून येतो. ह्याची लक्षणे म्हणजे खूप गंभीर डोकेदुखी, टाळू वर फुगणे, अचानक मळमळणे व उलट्या होणे, अचानक डोळ्यांनी दिसणे कमी होणे.
निदान न्यूरोलीजिस्ट वेगवेगळ्या चाचण्या करून सीटी स्कॅन, MRI किंवा पॅट स्कॅन करायला सांगतो.
पाठीतील पाणी काढून किंवा बायोप्सी करून निदान कन्फर्म केले जाते.
उपाय- ह्यावर सर्जरी, रेडिएशन, प्रोटॉन बीम थेरपी हे उपाय आहेत.

Leave a Reply