ll शिकणे आनंदाचे llपरदेशी सरांची शाळा टीव्ही संचावर

 

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात धामडकीवाडी हा आदिवासी पाडा. लोकसंख्या २००. पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता असा नाहीच. आडवळणाची वाट. मूलभूत सोयीसुविधाही नाहीत. पण जिल्हा परिषदेची शाळा आहे. पहिली ते चौथीचे २१ विद्यार्थी इथे शिकतात.
पाड्यावर तशी शिक्षणाविषयी अनास्थाच. त्यात कोरोनामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. ऑनलाईन शिक्षणाचा विचार पालकांच्या गावीही नाहीच शिवाय मोबाईलसाठी संपर्कही कठीणच. कोणाकडे स्मार्ट फोनही नाही. पण कुठल्याही परिस्थितीत मुलांना शिक्षणापासून दूर जाऊ द्यायचं नाही, असं परदेशी सरांनी ठरवलं.
प्रमोद परदेशी इथल्या जिल्हा परिषद शाळेतले प्रयोगशील शिक्षक.


सध्याच्या परिस्थितीत तीन दूरचित्रवाणी संचाच्या माध्यमातून सरांचे विद्यार्थी शिकत आहेत. एका संचापुढे ७ विद्यार्थी. पुढची परिस्थिती ओळखून सरांनी वेळीच अभ्यासक्रमावर आधारित चित्रफिती तयार केल्या. स्वाध्याय आणि गृहपाठासाठी प्रश्नावली तयार करून त्याच्या हजारो नकला तयार केल्या. परदेशी सरांनी स्वतःच्या खिशातले हजारो रुपये कागदांवर खर्च केले आहेत.
सहकारी शिक्षक दत्तू निसरड आणि अन्य समविचारी मंडळींची यात साथ लाभली. तांत्रिक साहाय्य अभिनव अजमेरा आणि पेहचान प्रगती फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा यांचं. पिंप्री सदो इथले जुने केबल व्यावसायिक अमजद पटेल यांची भेट शिक्षकांनी घेतली. टाकाऊ व्हीसीआर आणि इतर तत्सम यंत्रसामग्री संकलित केली. शाळेमध्ये मुख्य प्रसारण केंद्राची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली. पाड्यावर फक्त तीन टीव्ही संच आणि त्यातही दोन बंद अवस्थेत. पटेल यांच्या मदतीने बंद टीव्ही संच दुरुस्त करून त्यांच्यापर्यंत प्रसारणासाठी केबल जोडण्यात आली.
पावणे दोन महिने झाले, सकाळी १० वाजता शाळेत चित्रफीत लावली जाते. यावेळी टीव्हीवर अन्य कोणतीही वाहिनी सुरू असेल तर ती आपोआप बंद होते. विद्यार्थ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. संध्याकाळीही थोडा वेळ प्रसारण. दूरदर्शनवरचा ‘टिली मिली’ कार्यक्रमही मुलांना पाहता येतोय.


अभ्यासाशिवाय महापुरुषांवरील संदेश देणारे चित्रपट, कार्टून कथा, गप्पा यामुळे विद्याार्थी संचापुढून हलत नाही.
परदेशी सर आणि निसरड सर दोघेही नियमितपणे मुलांच्या घरी जातात. पालकांशी फोनवरून चर्चा, स्वाध्यायासाठी आवश्यक अध्ययन साहित्य वितरण, आरोग्यविषयक प्रबोधन.
चौथीतील रेश्मा आगीवले सांगते, ‘टीव्हीवरची शाळा आणि प्रत्यक्षातली शाळा यामध्ये फरक नाही. शाळेत जसं शिकवतात तसंच आम्ही सध्या शिकतोय. बालचित्रपट, गृहपाठ यामुळे शाळेतच असल्यासारखं वाटतं.
‘परदेशी सरांचा हा उपक्रम ‘धामडकीवाडी प्रारूप’ म्हणून ओळखला जात आहे.

-प्राची उन्मेष, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक

Leave a Reply