ll शिकणे आनंदाचे llमुलांना शाळेशी जोडून ठेवणं महत्त्वाचं

पांगरी गावात आमची जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा. विद्यार्थी संख्या जेमतेम 34. कोरोना साथ पसरू लागली आणि शाळा बंद झाल्या. तेव्हा सगळ्या शिक्षकांप्रमाणेच मलाही आपले विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जातील ही भीती वाटू लागली. पालकांनाही ही भीती होतीच. तेव्हाच शासन, शिक्षक अशा सर्वांनीच विविध ॲप्स, बाकी डिजिटल साहित्य वापरायला सुरुवात केली. मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पांगरी इथं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. सामाजिक अंतर राखत मीही काय करता येईल याचा विचार सुरू केला. मागच्या वर्षीच पालकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. तो या लॉकडाऊनच्या काळात अगदी उपयोगी ठरला. तेव्हापासून मी ग्रुपमधून रोजच्या रोज मुलांना स्वाध्याय देणं सुरू केलं.


लॉकडाऊनच्या सुरुवातीला पालक व ग्रामस्थांची सामाजिक अंतराची काळजी घेऊन एक मीटिंग घेतली. या पुढील काळात आपल्या मुलांचा अभ्यास कसा घेता येईल यावर चर्चा केली. ऑनलाईनमुळे विद्यार्थी कुठंही गोंधळून जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यायचं ठरवलं.


पुढं शाळा होण्याची चिन्ह नव्हतीच. त्यामुळे मग जुलैपासून अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय तयार केले. या स्वाध्यायाच्या शाळेतील प्रिंटरवर चाळीस दिवसांच्या झेरॉक्स काढून दोन दिवसात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन एकेक गठ्ठा देण्यात आला. घरी गेल्यामुळे एक फायदा झाला. प्रत्यक्ष पालकांशी अभ्यासाबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली. शिवाय मुलांशीही संवाद साधता आल्याने मुलांच्या, पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तो खूप काही सांगून जात होता. सर्वांच्या भेटी तर झाल्याच शिवाय या काळात विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाच्या वह्या तपासता आल्या. नंतर हा उपक्रम दर 15 दिवसांनी सुरू केला. आता हे संच मुलं घरी सोडवतात. जी गणितं अडली असतील ती तशीच ठेवतात. आणि 15 दिवसांनी घरी गेलं की त्या त्या विषयातली अडलेल्या गोष्टीचं आम्ही शंकानिरसन करतो.

अर्थात फक्त स्वाध्याय देऊन मी थांबलो नाही. तर प्रत्यक्ष पाठपुरावा हवा, कुणाचं तरी या सगळ्यावर लक्ष हवं. म्हणून तीन ठिकाणी गट तयार केले आहेत. खांडवे वस्तीतल्या गटात 6 विद्यार्थी, पांगरी गावातल्या मंदिरात 11 तर कार वस्तीतल्या गटात 9 अशी 25 मुलं सध्या गटात बसून अभ्यास करत आहेत. कॉलेजला जाणाऱ्या दोघी-तिघी मुली या गटांचा अभ्यास घेण्यासाठी मदत करू लागल्या आहेत.
हे सगळं केलं तरी मुलांशी असलेला प्रत्यक्ष संवाद, एकत्र येणं नाही त्यामुळे ती कमतरता आम्हांला आणि मुलांनाही जाणवते आहे. सध्या तर पहिलीत नवीन आलेल्या मुलांशी आतापर्यंत आमची नीट ओळख झालेली असते. तीही यावर्षी नाही. त्यामुळे या मुलांची खरी काळजी वाटते. आता तर पालकही या स्वाध्यायासाठी येणारा खर्च उचलण्याबाबत बोलून दाखवू लागले आहेत. या सर्व उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांचीही तितकीच मोलाची साथ मिळते.
यानिमित्ताने सर्वांना विनंती नक्कीच करावीशी वाटते. प्रत्येक शिक्षकाने आपला विद्यार्थी या काळात गोंधळून जाणार नाही, याची दक्षता घेऊन ठराविक दोन ते तीनच मार्गांचा अवलंब करावा.

– संदीप जाधव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरी, तालुका – खेड, जिल्हा – पुणे

Leave a Reply